रामजी पांगेरा
रामजी पांगेरा शिवरायांचा पराक्रमी मावळा
१६७२ च्या दरम्यान मुघली सरदार दिलेरखान पुण्याच्या दिशेने निघाला. महाराजांनी मुघलांशी झालेला तह मोडून जी मुसंडी बादशाही मुलुखात मारली होती त्याला शह देण्यासाठी दिलेर पठाणाची ही खेळी होती. वाटेत येईल ते जिंकायचे असा त्याचा बेत होता. खानाकडे प्रचंड सैन्य आणि दारूगोळा होता. दिलेरखानाने वाटेतला कणेरगड घेण्याचे ठरविले, त्याने गडाला वेढा घातला. कणेरगडावर मराठी शिबंदी फारच थोडी होती, पण जे होते ते निर्भीड आणि निधड्या छातीचे वीर होते आणि त्यांचे नेतृत्व करीत होते रामजी पांगेरे.
रामजी पांगेरे यांनी याआधी प्रतापगडच्या युद्धात मर्दुमकी दाखविली होती. रामजी पांगेरे यांना कळले होते की, खान लवकरच गड काबीज करणार. पण त्यांनी ठरविले की गड सहजासहजी खानाला द्यायचा नाही आणि अवघ्या सातशे मावळ्यांना घेऊन एका सकाळी रामजी मोघली फौजेवर तुटून पडले. हत्यारांच्या आणि 'हर हर महादेव' च्या सिंहगर्जनेने अवघा आसमंत दणाणून उठला. पाच-पाच पठाणांना एक-एक मावळा भिडत होता आणि शरीरावर असंख्य वार झेलत होता. त्यादिवशी जणू कणेरगडाच्या पायथ्याशी रुद्र अवतार धारण केलेले अनेक शिवशंकर तांडव करीत होते. मुघल सैन्याला अचंबित करून सोडणारा मराठ्यांचा आवेश होता. या युद्धात बाराशे हून अधिक मुघली सैन्य कापले गेले तर बहुतेक मराठे आपले कार्य सिद्धीस नेऊन धारातीर्थी पडले. कणेरगडाचे किल्लेदार रामजी पांगेरे या युद्धात कामी आले.
त्यांचा युद्धातील आवेश पाहून नक्कीच दिलेर खानाला पुरंदरच्या 'त्या' वीराची आठवण झाली असणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा