किल्ल्यांची व्यवस्था :
अमात्यांनी आज्ञापत्रात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ या एका वाक्यात किल्ल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. गड, कोट्यांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली आणि राज्यविस्तार केला. कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा महाराजांनी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिवकालामध्ये किल्ल्यांचे ३ प्रमुख प्रकार होते. १) गिरिदुर्ग २) स्थलदुर्ग ३) जलदुर्ग. यामध्ये शिवाजी महाराजांनी गिरीदुर्गांचे महत्त्व वाढविले. त्यांच्या बहुतेक राजकीय हालचाली गिरीदुर्गावरूनच झालेल्या आढळतात. आपल्या राजधानीसाठी प्रथम राजगड आणि नंतर रायगड या गिरीदुर्गांचीच निवड महाराजांनी केली होती. स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत भिडल्यानंतर जलदुर्गांची उभारणीही महाराजांनी केली. १६६७ मध्ये मालवणजवळ सिंधुदुर्ग हा किल्ला बांधून महाराजांनी आपली सागरी राजधानी येथे केली. स्वराज्यामध्ये एकंदर दोनशेचाळीस किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यासाठी तीन अधिकारी नेमले जात. हवालदार, सबनीस आणि कारखानीस. अशा या तीन अधिकाऱ्यांकडे किल्ल्यांचा कारभार सोपविलेला असे. हे तिन्ही अधिकारी एकाच दर्जाचे असून कोणताही निर्णय घेताना तिघांचीही संमती आवश्यक मानली जात असे. गडावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. हे सर्व अधिकारी पगारी होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढाऊ शिबंदी ठेवली जात असे. याशिवाय किल्ल्याच्या कामासाठी व किल्ल्यावरील लोकांच्या सोयीसाठी सुतार, लोहार, पाथरवट, चांभार, रसायनवैद्य, शस्त्रवैद्य, ज्योतिषी इ. लोक नेमलेले असत. परंतु गरजेपेक्षा अधिक माणसे किंवा बाजारबुणगे किल्ल्यावर ठेवायचे नाहीत अशी शिवाजी महाराजांची सक्त सूचना होती.
आरमार :
आज्ञापत्रामध्ये अमात्यांनी आरमाराविषयी स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे. ‘ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ अशा मोजक्या शब्दात अमात्यांनी आरमाराचे महत्त्व विशद केले आहे. इ.स. १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी आरमाराचा पाया घातला. भिवंडी, कल्याण व पनवेल या ठिकाणी लढाऊ जहाजे बांधली १६६५ मध्ये शिवाजी महाराजांजवळ ८५ लहान व ३ मोठी गलबते होती. नंतर ५ वर्षात महाराजांनी आरमारी सामर्थ्य एवढे वाढवले की १६७० मध्ये महाराजांच्या आरमारात १६० जहाजे असल्याचा उल्लेख सापडतो. सभासदांच्या माहितीप्रमाणे महाराजांच्या आरमारात ४०० जहाजे होती. दर्यासारंग आणि मायनाक या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येकी दोनशे जहाजांचे आरमार होते. आरमाराचे सुभे केलेले असून प्रत्येकी सुभ्यामध्ये पाच गुराबा व पंधरा गलबते असत. महाराजांचे आरमारी सामर्थ्य एवढे वाढले की, पोर्तुगीजांना, इंग्रजांना आणि सिद्दींना या आरमाराची भीती वाटू लागली होती. ‘समुद्रामध्ये महाराजांनी एक लष्कर उभारले,’ असे सभासदाने अभिमानाने लिहून ठेवले आहे. आरमाराचे महत्त्व ओळखणारा मध्ययुगातील ते एक महान राज्यकर्ते होते. म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ-सरकार यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते.
अर्थव्यवस्था :
सस्वराज्याची बांधणी करताना भक्कम अर्थव्यवस्था उभारण्याचे अलौकिक कार्यही शिवाजी महाराजांनी पार पाडले. त्यांच्या मृत्यूसमयी खजिन्यामध्ये किती दौलत होती याची यादीच सभासदाने व इतर बखरकारांनी दिलेली आहे. महसूलाचे उत्पन्न हे सर्वात मोठे उत्पन्न होते. स्वराज्यातील जमिनीची मोजणी करून त्यावर सारा निश्चित करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांच्याकडे सोपविले. जमीन मोजणीसाठी पगारी अधिकारी नेमले होते. जमिनीची प्रथम प्रतवारी ठरवून त्या जमिनीतून येणाऱ्या पिकाचा अंदाज घेतला जात असे. त्यावर शेतसारा ठरविण्यात येत असे. या पद्धतीला ‘अण्णाजी पंताची धारा’ असे नाव मिळाले होते. शेती व्यवसायाला उत्तेजन देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिले. गरीब शेतकऱ्यांना नांगर बैल आणि बी-बियाणे पुरविण्याच्या आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना केलेल्या होत्या. दुष्काळाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना सारा माफ केला जात असे.
राज्याच्या उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन म्हणजे चौथाई, सरदेशमुखी. हि साधने शिवपूर्वकालापासूनच अस्तित्त्वात होती. सरहद्दीवरच्या दुबळ्या राज्यकर्त्यांकडून त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा वसूल करून घेणे म्हणजे चौथाई होय. या चौथाईच्या मोबदल्यात दुर्बल राज्यकर्त्यांना सुरक्षितता लाभत असे आणि या सुरक्षिततेपायी छोटे राज्यकर्ते स्वखुषीने चौथाई देण्यास तयार असत. शिवाजी महाराजांनी चौथाई पद्धतीचा पुरस्कार करून राज्याचे उपन्न वाढविले. चौथाईप्रमाणे दुसरे साधन म्हणजे सरदेशमुखी होय. सुभ्यातील एकूण उत्पन्नाच्या १/१० भागाला सरदेशमुखी असे म्हणत. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणामध्ये अनेक सरदेशमुख होते. महसूल गोळा करण्याचा मोबदला म्हणून १/१० भाग ते आपल्याकडे ठेवत असत. स्वराज्याची स्थापना आणि विस्तार झाल्यानंतर सरदेशमुखीचे अधिकार शिवाजी महाराजांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे स्वराज्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कर म्हणजे उत्पन्नाची साधनेच होती करांमध्ये प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार होते. शिवाय प्रासंगिक कर बसविण्याचा अधिकारही महाराजांनी राखून ठेवला होता. इनामपट्टी, मिरासपट्टी, देशमुखपट्टी यासारखे कर प्रत्यक्ष कर होते. अप्रत्यक्ष कारमध्ये चुंगी, वांगी, फसकी, पळकी, उरीदलाली, सेवाधारा यासारखे कितीतरी कर होते. धान्य, फळफळावळ, कापडचोपड, गुरेढोरे यांच्या विक्रीवरही कर लादलेले होते. मिठावरही कर होता. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आणि कारागीरांवरही कर होते. विणकराला मागपट्टी, चांभाराला पायपोशी तर तेल्याला तेलपट्टी याप्रकारचे कर द्यावे लागत. बलुतेदारांना कारूक नावाचा कर द्यावा लागत असे. करांचे ओझे गरिबांवर पडू नये याची काळजी घेतली जात असे. राज्याभिषेक प्रसंगी सिंहासनपट्टी नावाचा प्रासंगिक कर महाराजांनी बसविलेला आढळतो. करामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढत असे. म्हणून कर देणाऱ्या व्यक्तींच्या अडीअडचणींचाही विचार केला जात असे. उदा. दुष्काळाचे वर्ष असेल किंवा शत्रूंच्या स्वारीमुळे मुलुख, उध्वस्त झाला असेल तर कर माफ केले जात. शेतकऱ्यांप्रमाणे स्वराज्यातील व्यापारी वर्गही संपन्न असला पाहिजे, त्यांच्या व्यापाराला विस्तारित क्षेत्र मिळाले पाहिजे याकडेही महाराजांचे विशेष लक्ष असे. बारदेशातील मीठ तेथील व्यापारी स्वराज्यात कमी दराने विकत असत. त्यामुळे स्वराज्यातील मीठाचा व्यापार बुडू लागला तेव्हा या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी बारदेशी मीठावर महाराजांनी जबरदस्त आयातकर बसविला. त्यामुळे स्वराज्यातील व्यापाऱ्यांचे मीठ चांगले खपू लागले व हा व्यापार उर्जितावस्थेत आला. अशाप्रकारे व्यापाराच्या उत्कर्षाबाबत शिवाजी महाराज प्रयत्नशील असले तरी व्यापार हा सचोटीचा असला पाहिजे त्यामध्ये ग्राहकांची लुबाडणूक होता कामा नये याकडेही त्यांचे लक्ष होते.कोकणात नारळ, सुपारीच्या व्यापारामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्याने शिवाजी महाराजांनी सुभेदाराची कानउघडणी केली होती.
उत्पन्नाचा मोठा भाग संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला जात असे. किल्ले बांधणे, दुरुस्त करणे, आरमार वाढविण, युद्ध साहित्याची खरेदी करणे यावर बराच खर्च केला जात असे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाटबंधारे बांधणे गरीब शेतकऱ्यांना बैल, नांगर, बी-बियाणे पुरविणे, गरजू शेतकऱ्यांना कर्जे देणे, मुर्दमकी गाजविणाऱ्या सैनिकांना बक्षिसे देणे यावरही खर्च केला जात असे.
स्वराज्याच्या आर्थिक उत्पन्नाची अनेकविध साधने महाराजांनी निर्माण केली असली तरी तिजोरीवरचा ताण सारखा वाढत रहात असे. त्याचे कारण म्हणजे महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले होते. ते निर्माण करीत असताना आदिलशहा मुघल यासारख्या बलाढ्य शत्रूबरोबर सातत्याने संघर्ष करावा लागत असे. किल्लेबांधणीवर, लष्करावर, हत्यारांच्या खरेदीवर बराच खर्च करावा लागत असे. त्यामुळे राज्याचे उत्पन्न अपुरे पडत असे. अशा वेळी मुघल प्रदेशातील सधन शहरावर स्वारी करून लूट करणे, तसेच केवळ पैशाच्या लोभाने किनारपट्टीवर वखार टाकणाऱ्या पाश्चात्यांच्या वखारींची लूट करणे हे उपाय शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेले होते. सुरतेची त्यांनी दोन वेळा लूट केली. तसेच राजापूर, धरणगाव, हुबळी इद्यादी ठिकाणी वखारीवर हल्ले केले. व्यापारी पेठ लुटल्या. त्यामागे स्वराज्याचे उत्पन्न वाढविणे आणि शत्रूंना दहशत बसविणे असा दुहेरी हेतू शिवाजी महाराजांनी साध्य केला होता. राज्याभिषेक प्रसंगी शिवराई नावाचे चलन महाराजांनी सुरु केले. त्याशिवाय सोन्याचे होनही सिंहासनारूढ झाल्यानंतर सुरु केले. याशिवाय विजयनगरपासून बहमनी-मुघल सत्तेपर्यंत सर्वांची नाणी स्वराज्यामध्ये व्यवहारासाठी चालू होती.
लष्करी व्यवस्था :
स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करण्यासाठी कार्यक्षम लष्कराची नितांत आवश्यकता होती. शिवाजी महाराजांचे लष्कर अत्यंत आटोपशीर होते. अष्टप्रधानापैकी दोन प्रधान सोडले तर प्रत्येक प्रधानाने युद्धशास्त्र पारंगत असले पाहिजे आणि युद्धप्रसंगी रणांगणावर आले पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. दहा सैनिकांवर नाईक नावाचा अधिकारी असे. त्यानंतर चढत्या क्रमाने हवालदार, जुमलेदार, हजारी आणि सरनौबत असे अधिकारी असत. शिवाजी महाराजांचे अश्वदल अत्यंत प्रभावी होते. ज्याकडे स्वतःचे घोडे होते त्याला बारगीर असे म्हणत. पंचवीस बारगीरांवर एक हवालदार असे. त्यानंतर क्रमाक्रमाने जुमला बारगीर, हजारी बारगीर आणि सरनौबत असे अधिकारी होते.
शिवाजी महाराजांचा लष्करी तळ अत्यंत साध्या प्रकारचा असे. बहुतेक सैनिक उघडयावर रहात असत. महाराजांसाठी एखादा तंबू असे किंवा पुष्कळप्रसंगी झाडाला कापड टांगून सावली तयार करून महाराज आश्रय घेत असत. स्वारीच्या वेळी बायकापोरे न घेण्याचा त्यांचा दंडक असे. स्वारीचे प्रसंगी कधीकधी प्रत्येक घोडेस्वाराकडे दोन घोडे असत. त्यामुळे जलद गतीने आक्रमण करणे सोयीचे असे.महाराजांचे हेरखाते विलक्षण कार्यक्षम होते. स्वतः शिवाजी महाराजच वेष पालटून हेर बनत असत. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. परप्रांतीय लोकही शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी करत. उदा. वल्लभ गंगादास हा सुरतेचा व्यापारी शिवाजी महाराजांसाठी हेरगिरी करत होता. काही पोर्तुगीजही महाराजांचे हेर होते. हेरांनी खात्रीची बातमी आणल्यास व चातुर्य दाखविल्यास त्यांना भरपूर बक्षीस देण्यात येत असत. हेरांना शिवाजी महाराजां भरपूर पगार देत असे असा उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळतो.
धार्मिक धोरण :
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण अत्यंत सहिष्णुतेचे होते. सर्व धर्म श्रेष्ठ असून परमेश्वर हा एकच आहे असा महान विचार महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये आढळतो. ते पत्रात लिहितात की, ‘मशिदीमध्ये परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी भक्तजन बांग देतात तर मंदिरामध्ये घंटानाद करतात. ही सृष्टी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेले एक उत्कृष्ट चित्र आहे.’ अशाप्रकारचे मौलिक विचार शिवाजी महाराजांचे होते. स्वराजामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा महाराजांनी दिलेली होती. साधुसंतांचा आदर करणे, सांस्कृतिक परंपरा जतन करणे आणि धर्मास्थानांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे महाराज मानत असत. हिंदू मंदिराप्रमाणे मुसलमानांच्या धर्मस्थानांनाही त्यांनी उदारपणे देणग्या दिलेल्या आढळतात. सभासदाने आपल्या बखरीमध्ये महाराजांनी धर्मदाय व्यवस्था कशी लावली होती त्याचे वर्णन केलेले आहे, ‘मुलखात देव देवस्थान जागोजागी होती त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक, स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले....’सर्व धर्मांना श्रेष्ठ मानत असल्यामुळे शिवाजी महाराज सहिष्णू वृत्तीचे होते. म्हणूनच आपल्या पदरी कितीतरी मुसलमान सरदार त्यांनी नेमले होते. दौलतखान हा आर्मारचा प्रमुख होता. तर मदारी मेहतर हा महाराजांचा आवडता सेवक होता. शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाची समकालीन दरबारी लेखकांनी स्तुती केलेली आढळते. खाफीखान लिहितो की, ‘शिवाजीने आपल्या सैनिकांकरिता असा सक्त नियम केला होता की, सैनिक ज्या-ज्या ठिकाणी लुटालूट करण्यास जातील तेथे-तेथे त्यांनी मशिदीस, कुराणग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देऊ नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ त्याच्या हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकराचे स्वाधीन करीत असे.’
शिवाजी महाराजांनी अनेक मंदिर बांधण्यास उत्तेजन दिले. रायगडावर जगदिश्वराचे मंदिर बांधले. सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदिर बांधले. दक्षिणेच्या स्वारीत जिंजीच्या शिवमंदिराची पुनर्स्थापना केली. तेथील दीपोत्सव सुरु केला. शिवाजी महाराजांनी अनेक साधुसंतांना वर्षासने दिलेली आढळतात. चिंचवडचे मोरया गोसावी, पारगावचे मौनीबुवा, केळशीचे बाबा याकुत या सत्पुरूषांवर महाराजांची श्रद्धा होती.संत तुकारामाचाही महाराजांना आदर होता. समर्थ रामदास स्वामींविषयी त्यांच्या मनात विलक्षण श्रद्धा होती. म्हणूनच युवराज संभाजींना सज्जनगडावर पाठविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे कार्य परस्परपूरक होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कार्यासाठी मावळ भागातील सर्वसामान्य लोकांना प्रेरित केले, त्यांना स्वातंत्र्याचा मंत्र सांगितला आणि त्यांचा स्वाभिमान जागृत केला. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे जीवनाविषयी व देशकार्याविषयी उदासीन झालेल्या जनतेला रामदास स्वामींनी क्षत्रियांची कर्तव्ये सांगितली आणि प्रपंचाचा अर्थ समजावून सांगितला. बलोपासना आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी समर्थांनी सामान्य लोकांना प्रेरणा दिली, मारुतीची मंदिरे स्थापन केली आणि आखाडे स्थापन करण्यास उद्युक्त केले.
शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा एक विशेष म्हणजे अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता त्यांना मान्य नव्हती. शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जिजाबाई जेव्हा सती जाण्याची तयारी करू लागल्या तेव्हा महाराजांनी त्यांना त्या विचारापासून परावृत्त केले. परधर्मात गेलेल्या स्वकीयांना शुद्धीकरण करून पुन्हा आपल्या धर्मात सामावून घेण्याचा त्यांचा दृष्टीकोन निश्चितच पुरोगामी होती. शिवाजी महाराजांवर रागावून नेताजी पालकर मुघलांकडे गेला होता. औरंगजेबाने त्याचे धर्मांतर करून त्याला मुसलमान केले आणि मुघलातर्फे लढण्यासाठी काबुलच्या सरहद्दीवर पाठविले. काही वर्षांनी नेताजी पालकरला पश्चात्ताप झाला आणि तो शिवाजी महाराजांकडे परत आला. महाराजांनी उदारपणे क्षमा केली. एवढेच नव्हे तर त्याचे शुद्धीकरण करून त्याला हिंदू धर्मामध्ये घेतले. मुघलाकडे बरीच वर्षे असलेला आणि मुसलमान बनून मुघलांतर्फे काबूलकडे लढणारा हा पराक्रमी पुरुष आपल्याकडे विश्वासाने परत आला म्हणून शिवाजी महाराजांनी सुरु केलेली परंपरा भावी काळातील छत्रपतींनी चालू ठेवली याचे पुरावे इतिहासामध्ये मिळतात.
संस्कृती रक्षणाचे आणि आत्मसन्मान वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही शिवाजी महाराजांनी केलेले आढळते. तत्कालीन मराठी भाषेमध्ये, विशेषतः राजकीय पत्रव्यवहारामध्ये फारसी शब्दांचा भरणा एवढा वाढला होता की मराठी भाषा झाकाळून गेली होती. भाषेचा शुद्धीकरण करण्यासाठी रघुनाथ पंडिताकडून ‘राज्यव्यवहारकोश’ महाराजांनी तयार करवून घेतला. राज्याभिषेकापासून नवीन कालगणना सुरु केली. व्याकरण, ज्योतिष या विषयावरील ग्रंथ लिहून घेतले. जातीजातीमधील तंटेबखेडे दूर करण्यासाठी महाराजांनी विशेष प्रयत्न केलेले आढळतात. ब्राह्मण आणि प्रभू या दोन उच्च जातींमध्ये वर्षानुवर्षे कलह चाललेला होता. शिवाजी महाराजांनी गागाभट्टाच्या सहाय्याने तो कलह दूर केला आणि या दोन्ही जातीत सामंजस्य निर्माण केले. गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेले आढळतात.न्याय व्यवस्था :
न्यायव्यवस्थेबाबत शिवाजी महाराजांनी पंचायतपद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिलेले आढळते. पंचायतपद्धती हि परंपरागत न्यायपद्धती होती. रूढीपरंपरेप्रमाणे चालत आलेले कायदे आणि प्रत्येक जातीनिहाय रूढ असलेले कायदे यांचा विचार करून गावपंचायत न्यायदान करीत असे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दगाबाजी करणे किंवा शत्रूपक्षाला जाऊन मिळणे यांची चौकशी करण्याचे काम सुभेदाराकडे किंवा देशाधिकाऱ्याकडे असे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाकडे न्यायाधीश हा एक प्रधान होता. स्वराज्यातील न्यायदानाची जबाबदारी न्यायाधीश या प्रधानावर असे. अत्यंत महत्त्वाचे खटले प्रत्यक्ष महाराजांसमोर चालत असत. गोतसभेचे काही निवाडे महाराजांच्या उपस्थितीत झालेले आढळतात. धर्मविषयक खटले पंडितराव या प्रधानापुढे चालत असत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्रह्मवृंद त्या-त्या भागातील धर्मविषयक न्यायनिवाडे करीत असत. नैतिक गुन्हयाविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्याची स्थापना केली त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात व एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती. स्वराज्याशी बेईमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत. अफजलप्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांनी बेईमानीचे फळ दिले होते. स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रूपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही महाराज शिक्षा करीत असत आणि साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत. खाफीखान लिहितो की, ‘शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत.’
नूतन सृष्टीचा जनक :
केवळ ३०-३५ वर्षांच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर विस्तार करण्याचे अलौकीक कार्य शिवाजी महाराजांनी केले. शेकडो वर्षे पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. अस्मिता जागृत केली. स्वाभिमान शिकविला आणि नवा महाराष्ट्र उभा केला. केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर राज्यातील सर्व सामान्य जनता सुखी पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते. सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहचू नये, शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपली पाहिजे, स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे, साधुसंतांना निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे, सर्व जातींना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये होते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धिस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते. महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव स्वराज्याच्या रुपात पहात होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे ‘महाराजांनी नूतन सृष्टीच निर्माण केली.’समारोप :
“शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निःस्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व धर्मांना समान लेखले, साधुसंतांचा यशोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा