Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग दुसरा






ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजीराजे केवळ १२ वर्षांचा होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीराजांनी मलिक अंबरचा विश्र्वास संपादन केला आणि काही वर्षांतच ते मातब्बर सरदार झाले. त्यांचे वडील मालोजी व चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजींनी जिर्णोध्दार केला तसेच शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूंच्या सोयीसाठी एक तलाव बांधला. औरंगाबाद मध्ये मालपूरा आणि विठपुरा अशा दोन पेठ आहेत. हि नावे मालोजी विठोजी यांच्यावरून पडली असावीत असे मानले जाते. श्रीगोंदयाचे शेख महंमद या संतास मालोजींनी बारा बिघे बागायती जमीन दान म्हणून दिली होती. श्रीगोंदयाचे जी पेठ मालोजींनी बसविली तिला मकरंदपुरा असे म्हणतात. मालोजींस मकरंद अशी पदवी मिळाली होती हे ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होते.

शहाजीराजांचा उत्कर्ष :

विठोजी भोसल्यांच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीराजांवर आली. मोलोजीची पंचहजारी शहाजीराजांना मिळाली. लहान वयातही हि जबाबदारी शिरी घेण्याची कुवत शहाजीराजांमध्ये होती. शहाजीराजांची हि कुवत पाहून निजामशाहीतील सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव याने आपली कन्या जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजांबरोबर केला. या संदर्भात बखरीत दिलेली रंगपंचमी सणाच्या कथा निराधार असून शहाजीराजांच्या विवाहाप्रसंगी मोलीजी हयात नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. शहाजीराजांचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. इ.स.१६२० पासून शहाजीराजांच्या कर्तबगारीला बहर आलेला दिसून येतो.

मलिक अंबरचे कर्तृत्व :
मलिक अंबरचे कर्तृत्व :
बबुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहषद निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगर बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले.
राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतर मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंडयाच्या किल्ल्यात सुरक्षित ठेवून दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीराजांचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले.
अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावाला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला. अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडली आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे सहकार्य मिळाले.


भातवडीची लढाई :
भातवडीची लढाई :
अकबरानंतर जहागीर मुघल सम्राट झाल्यावर त्याने दक्षिण भारतात राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न सुरु केले. लखुजी जाधवराव मुघलांना मिळाल्यामुळे निजामशाहीची बाजू लंगडी पडली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन विजापूरच्या आदिलशहाला जहांगीर निजामाविरुद्ध चिथावले. त्यामुळे मलिक अंबर अडचणीत येईल असा जहांगीरचा कयास होता. परंतु धूर्त मलिक अंबरने गोवळकोंडयाच्या कुतुबशहाबरोबर तह करून आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर थेट बीदरपर्यंत चढाई करून आदिलशाही फौजेचा मोठा पराभव केली. त्यानंतर मलिक अंबरने थेट विजापूरपर्यंत मोहिम काढून आदिलशहाच्या राजधानीलाच वेढा दिला. परंतु मुघलांची मदत मिळाल्यामुळे आदिलशहाने निकराचा लढा दिला. तेव्हा नाईलाज होऊन मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठविला आणि अहमदनगरकडे त्याने प्रयाण केले. या संधीचा फायदा घेऊन आदिलशहा व मुघल यांच्या फौजांची मलिक अंबरला भातवडीजवळ गाठले. ऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मलिक अंबरने आदिलशाही व मुघल फौजांची पराभव केला. या लढाईत मलिक अंबरप्रमाणे शहाजीराजांनीही मोठा पराक्रम गाजविला. शहाजीराजांचा भाऊ शरीफची यानेही या लढाईत मोठा पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली.
भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु मलिक अंबर व शहाजीराजे यांच्यामध्ये अचानक बेबनाव निर्माण झाला. परिणामी शहाजीराजांनी निजामशाही सोडून आदिलशाहीचा आश्रय घेतला. तथापि या संघर्षात मलिक अंबरला यश मिळू शकले नाही. त्यामुळे विजापूरच्या दरबारात शहाजीराजांचे वर्चस्व वाढले. शहाजीराजांमुळे अनेक मातब्बर मराठयांना आदिलशाहीच्या दरबारात मानाच्या जागा मिळाल्या.

स्वतंत्र वृत्तीचे शहाजीराजे :
१६२७ मध्ये दक्षिणेतील आणि उत्तरेतील राजकारणात दोन महत्वपूर्ण घटना घडल्या. १४ मे १६२७ रोजी मलिक अंबरचा मृत्यू झाला व त्यामुळे निजामशाहीची जबरदस्त हानी झाली. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल सम्राट जहांगीर मृत्यू पावल्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या दोन घटनांचा उत्तरेतील व दक्षिणेतील राजकारणावर दूरगामी परिणाम झाला.
शहाजीराजे जरी आदिलशाहीमध्ये मानाचे स्थान मिळवून होते, तरीपण अंतर्यामी निजामशाहीची त्यांना ओढ होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाही पोरकी झालेली पाहून शहाजीराजांचे मन निजामशाहीकडे ओढ घेऊ लागले. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहिम आदिलशाहा मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मुहमदशहाशी शहाजीराजांचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजीराजांनी १६२८ च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. या सुमारास मुघलांची चाकरी सोडून लखुजी जाधवराव हाही निजामशाहीत दाखल झाला. वास्तविक पहाता लखुजी जाधवराव व शहाजीराजे भोसले हे दोन बलाढ्य सरदार निजामशाहीस मिळाल्यामुळे या राजवटीचा उत्कर्ष होण्याची मोठी संधी प्राप्त झाली होती. परंतु प्रत्यक्ष निजामशाही मध्ये अंतर्गत कटकरी, हेवेदावे इतके वाढले होते की शाहीदरबारात संशयाचे वातावरण निर्माण झाले प्रत्यक्ष निजामशहाला लखुजी जाधवरावांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू बसवंत यांच्यावर निजामशाहीने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीराजांना निजामशाहीचा वीट आला आणि त्यांनी निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीराजांचा मनोदय ओळखून बादशाह शहजहानने शहाजीराजांस पंचहजारी देऊ केली. त्याचा मुलगा संभाजीराजे यालाही दोन हजारी व चुलतभाऊ मालोजी याला दोन हजारी असा सरंजाम आल्यावर बंडखोर पठाण सरदार दर्याखन याचे पारिपत्य करण्याची जबाबदारी शहाजीराजांवर शहाजहानने सोपविली. या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई प्रसूत होऊन शिवाजीराजांचा जन्म झाला. मात्र पावसाळा सुरु होईपर्यंत शहाजीराजांना शिवनेरी जाण्याची सवड मिळाली नाही. पावसाळा सुरु झाल्यावर शहाजीराजे शिवनेरी गेले आणि पुत्रमुख त्यांनी पाहिले.इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात विशेषतः बालाघाट प्रदेशात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडला. समकालीन साहित्यामधून या भीषण दुष्काळाची वर्णन आढळतात. 'बादशहानामा' या ग्रंथात या भीषण दुष्काळाचे तपशीलाने वर्णन आलेले आहे. शहाजीराजे मुघलांकडे गेल्यानंतर निजामशाही जवळजवळ मोडकळीस आली. मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान याने निजामशाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. उलट कटकारस्थानांना कंटाळून ऑक्टोबर १६३१ मध्ये फत्तेखानाने निजामशाहीला ठार मारले. त्यामुळे निजामशाहीची अवस्था मोठी दयनीय झाली. आता निजामशाही मुघलांच्या आहारी जाणार हे शहाजीराजांच्या लक्षात आले आणि म्हणून कोकणात असलेला निजामशहाचा एक वारस शोधून काढून शहाजीराजांनी त्याची प्रतिष्ठापना जुन्नर येथे केली. निजामशाही वाचविण्याचे त्याने प्रयत्न सुरु केले. शहाजीराजांच्या या हालचाली मुघलांना धोकादायक वाटल्या. तरीपण आपण मुघलांशी एकनिष्ट आहोत असे शहाजीराजे वरकरणी भासवत होते.


शहाजीराजांचा स्वतंत्र लढा :
मुघलांकडे असतांना शहाजीराजांनी नाशिक, त्र्यंबक, संगमनेर व जुन्नर हे परगणे आपल्या वर्चस्वाखाली आणून कोकण पर्यंतचा प्रदेश हुकमतीखाली आणला. त्यानंतर शहाजीराजांनी स्वातंत्र्य पुकारले. बादशहानाम्यामध्ये असा उल्लेख आहे की, “शहाजीराजांनी निजामशहाचा एक नातलग हाती धरून त्याला निजामशाहीतील एका बळकट गडावर नेऊन ठेवले आणि स्वातंत्र्य पुकारले”. यावरून असे स्पष्ट दिसते की नाममात्र बादशहा गाडीवर बसवून शहाजीराजांना स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा असावी.
स्वतंत्र झाल्यावर आणि आपली बाजू बळकट झाल्यावर महत्वाकांक्षी शहाजीराजांनी नजर दौलताबाद किल्ल्याकडे वळली. कारण हा किल्ला ताब्यात आला तर शहाजीराजांचा मोठा फायदा होणार होता. आपल्या पूर्वजांचे मूळ गाव असलेले वेरूळ आणि मराठवाड्याचा बराचसा प्रदेश शहाजीराजांच्या वर्चस्वाखाली येणे शक्य होते.
यावेळी दौलताबादचा किल्ला फत्तेखानाच्या ताब्यात होता. आदिलशहाच्या मदतीने दौलताबाद किल्ला जिंकण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी सुरु केला. शहाजीराजांच्या हालचाली पाहून फत्तेखानाने मुघल सरदार महाबतखान यास दौलताबादचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी बोलाविले. महाबतखानाने जून १६३३ मध्ये दौलताबादचा किल्ला जिंकला. फत्तेखानाने शरणागती पत्करली. निजामशाहीचा नामधारी वारस मुघलांच्या ताब्यात आला. शहाजहानने या नामधारी वारसाची हुसेनशहाची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरील तुरुंगात केली. अशाप्रकारे निजामशाही पूर्णपणे संकटात आली. तरीपण हताश न होता निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी सुरु ठेवला. शहाजीराजांची झुंज जवळजवळ ३ वर्षे चालू होती. शेवटी प्रत्यक्ष शहाजहान बादशहाला शहाजीराजांचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत यावे लागले.

शेवटचा लढा :
दौलताबाद मुघलांच्या ताब्यात गेल्यावर जुन्नरच्या गडावर बंदोबस्तात ठेवलेल्या निजामशाहीच्या वारसास शहाजीराजांनी नगर जिल्ह्यातील पेमगड या ठिकाणी ठेवले. आदिलशहाकडून मुरारपंत आणि मातब्बर सरदार रणदुल्लाखान शहाजीराजांच्या मदतीसाठी आले. आदिलशहा व शहाजीराजे एकत्र आलेले पाहून शहाजहानला चिंता वाटू लागली. या सुमारास आदिलशाहीच्या दरबारातच सुंदोपसुंदी सुरु झाली. खवासखान आणि मुस्तफाखान या दोन सरदारांमध्ये संघर्ष सुरु झाला. त्यात खवासखान आपल्या रक्षणासाठी उत्तरेतून शहाजहान बादशहाला बोलाविले. जानेवारी १६३६ मध्ये शहाजहान नर्मदा ओलांडून दक्षिणेत आला. निजामशाही नष्ट करण्याचा त्याचा अंतस्थ हेतू होता. दक्षिणेत येताच त्याने कुतूबशहास सामोपचाराने आपल्याकडे वळविले. आदिलशहाच्या वतीने रणदुल्लाखान मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव झाला. अशाप्रकारे कुतुबशहा व आदिलशहा यांना नामोहरम करून शहाजहानने आपला मोहरा शहाजीराजांकडे वळविला. ६ मे १६३६ रोजी शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण तह झाला. हा तह दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. या तहातील २ कलमे महत्वाची असून एका कलमाप्रमाणे आदिलशहा हा शहजहानचा मांडलीक झाला. दुसऱ्या कलमाप्रमाणे निजामशाही खालसा करून ते राज्य मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावे असे ठरले.

या तहामुळे शहाजीराजांना आदिलशहाचा असलेला आधार तुटला. निजामशाही वाचविण्यासाठी आता दोन बलाढ्य शत्रूशी आपल्याला सामना द्यावा लागेल याची शहाजीराजांना जाणीव झाली. ज्या रणदुल्लाखानाने शहाजीराजांना मदत केली त्यालाच आदिलशहाने शहाजीराजांविरुद्ध पाठविले. शहाजहानने खान झमान यास शहाजीराजांविरुद्ध चालून जाण्यास सांगितले. अशा बिकट परिस्थितीतही निकराची झुंज देण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी सुरु केला. गनिमीकाव्याने लढण्यासाठी त्यांनी डोंगराळ प्रदेशाची निवड केली. प्रथम त्यांनी सिंहगड व राजगड या किल्ल्यांचा आश्रय घेतला. रणदुल्लाखान आणि झमान पाठलागावर होतेच. तेव्हा शहाजीराजांनी कोकणात उतरून माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. मुघलांनी माहुलीच्या किल्ल्याला वेढा दिला. शहाजीराजांनी शर्थीची झुंज सुरु केली. परंतु निजामशाहीच्या वारसाच्या-मुर्ताजाच्या- आईने शहाजहानशी तहाची बोलणी लावल्यामुळे अखेर शहाजीराजांना शरण जाणे भाग पडले. ऑक्टोबर १६३६ मध्ये शहाजहानने माहुलीचा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला आणि आदिलशहाची चाकरी पत्करून तो कर्नाटकाकडे निघून गेला. या घटनेबरोबर निजामशाहीचाही अंत झाला.

शहाजीराजांचे कार्य :
शहाजीराजांचे कार्य :
कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी शहाजीराजांनी आपल्या पुणे जहागीरीची व्यवस्था लावली. दादाजी कोंडदेव यास कारभारी नेमले. जिजाबाई व बालशिवाजीराजे यांना पुणे जहागिरीत ठेवले. आदिलशहाने कर्नाटकातील छोट्या मोठ्या हिंदू राजवटींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची कामगिरी शहाजीराजांवर सोपविली होती. शहाजीराजांनी या लहान मोठ्या राजवटींवर आपले वर्चस्व निर्माण केले, त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या. परंतु एकही राज्य खालसा केले नाही त्यामुळे महंमद आदिलशहास शहाजीराजांचा वारंवार  संशय येत होता. शिवभारतकाराने असे म्हटले आहे की , ‘कर्नाटकातील हे छोटे मोठे राजे माझ्या ऐवजी शहाजीराजांनाच मोठे मानतात अशी खंत आदिलशहाला वाटत होती.’
शिवाजीराजांनी स्वराज्य कार्य सुरु केल्यावर त्याला प्रतिबंध करण्यासाठी आदिलशहाने जुलै १६४८ मध्ये शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांकडून सिंहगडचा किल्ला परत मिळाल्यावर शहाजीराजांची सुटका करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या कान्होजी जेधे या देशमुखास शिवाजीराजांच्या सहकार्यासाठी जावे असे सांगितले. सुटका झाल्यानंतर शहाजीराजे पुन्हा कर्नाटकात येऊन आदिलशहाच्या वतीने कारभार पाहू लागले. जरी आदिलशहाला शहाजीराजांचा वारंवार संशय येत असला तरी तो शहाजीराजांना वचकून होता. शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न चालू असतांना शहाजीराजांची त्यांना आतून मदत होत होती का? असा एक प्रश्न इतिहासात निर्माण होतो. जरी शिवाजीराजांना प्रत्यक्ष मदत शहाजीराजांनी केल्याचा स्पष्ट पुरावा मिळत नसला तरी शिवाजीराजांच्या कार्यात त्यांनी कधीही अडथळे आणले नाहीत हि गोष्ट लक्षणीय मानली पाहिजे. इ. स. १६६१ मध्ये दक्षिणेतील हिंदू नायकांना एकत्रित करून उठाव करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला असावा हेडच कागदपत्रांवरून सिद्ध होते. या कटाच्या संशयावरून आदिलशहाने शहाजीराजांस पुन्हा कैद केले होते. पण जुलै १६६३ मध्ये त्यांची परत सुटका केली. त्यानंतर केवळ ५-६ महिन्यातच कर्नाटकातील होद्देगिरी याठिकाणी शिकारीला जात असतांना घोड्यावरून पडून २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजांचा मृत्यू झाला.
शहाजीराजांच्या कार्याचे मूल्यमापन अनेक इतिहासकारांनी केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी तर स्वराज्य स्थापनेची मूळ कल्पना व योजना शहाजीराजांचीच होती असा निष्कर्ष काढला. बहुतेक इतिहासकार शहाजीराजांचे कार्य शिवाजीराजांना पूरक ठरले असा निष्कर्ष काढतात. राजवाडे म्हणतात, “शिवाजीराजांचा पूर्वावतार जो शहाजीराजे त्यांच्या कर्तबगारीवर शहाजीराजांचा पश्चादवतार जो शिवाजीराजे त्यांनी आपल्या कर्तबगारीची इमारत उठविली.”(राधा माधव विलास चंपू, पृष्ठ ३६.)
शहाजीराजांच्या चरित्राचे साक्षेपी अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शहाजीराजे हे स्वतंत्र बाण्याचे आणि स्वाभिमानी वृत्तीचे पुरुष होते. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, ‘मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र होता. कर्नाटकांतील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजीराजे जाणून होते. करतां, मिंधेपणाचा गंध हि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही. असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाईव शिवाजीराजे यांच्या द्वारा शहाजीराजांनी चौथ्यांदा  स्थापिण्याचा उद्योग बंगळूराहून पुणे प्रांती करविला. निजामशाही टिकविण्यासाठी शहाजहानविरुद्ध त्यांनी जो लढा दिला त्यावरून त्यांच्या स्वतंत्र स्वाभिमानी वृत्तीची कल्पना येते. त्यांनी जे डावपेच खेळून मुघलांविरुद्ध लढा दिला ते डावपेच शिवाजीराजांना   स्वराज्यकार्यात मार्गदर्शक ठरले यात काही शंका नाही.’


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा