Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवरायांचे मावळे सरसेनापती प्रतापराव गुजर





सरसेनापती प्रतापराव गुजर


वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे,प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ,दिपोजी राउतराव विठ्ठल,पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर,सिद्दी हिलाल व विठोजी होय.प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता.त्यांचे व बेलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली.

          बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

           शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळाले होतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा