रयतेचा कौल :
आग्ऱ्याहून परत आल्यानंतर शिवाजीराजांनी प्रथम आपल्या जवळच्या शत्रूंना सामोपचाराने आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे आदिलशहा आणि कुतुबशहा यांनी शिवाजीराजांबरोबर तह करून सलोखा जोडला होता. बारदेशच्या स्वारीनंतर पोर्तुगीजही नरमले होते. त्यांनी शिवाजीराजांना आशिया खंडातील श्रेष्ठ राजा मानून त्यांच्याशी सलोखाचा तह केला. इंग्रज, डच, आणि फ्रेंच यांनी तर नरमाईचेच धोरण स्वीकारले होते. फक्त मुघलांचा शिवाजीराजांना प्रखर विरोध होता. तरीपण आग्ऱ्याहून सुटून शिवाजीराजे दक्षिणेत आल्यानंतर औरंगजेबाने शिवाजीराजांशी वरकरणी सलोखा प्रस्थापित केला. शाहजादा मुअज्जम हा इ. स. १६६७ च्या प्रारंभी दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादेस रुजू झाला. तो ऐषारामी प्रवृत्तीचा होता. आणि मराठयांनबरोबर त्याला संघर्षही नको होता. एकूण शिवाजीराजांच्या दृष्टीने इ.स. १६६७-६८ हे वर्ष बऱ्याच प्रमाणात शांततेचे गेले. सतत लढाया आणि पेचप्रसंग सुरु असल्यामुळे स्वराज्यात सुधारणा करण्याइतकी सवड शिवाजीराजांना मिळाली नव्हती. विशेषतः शायिस्तेखानाच्या स्वारीनंतर आणि त्यानंतर जयसिंग-दिलेरखान यांच्या स्वारीमुळे स्वराज्यातील बराच मुलुख उध्वस्त झाला होता. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली होती. मुघलांनी काही गावेच्या गावे जाळून-पोळून भस्म केल्यामुळे लोक परागंदा झाले होते. गावेच्या गावे ओस पडली होती. लोकांची परिस्थिती शोचनीय झाल्यामुळे महासूलाचे उत्पन्न खूप घटले होते. अशाप्रकारे स्वराज्यामध्ये बिकट संकट निर्माण झाले होते. आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्यापूर्वी आपल्या ताब्यात असलेल्या राज्याची घडी बसविणे, रयतेला कौल देऊन त्यांचे पुर्नवसन करणे आणि स्वराज्याच्या परिसरात शांतता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे याची शिवाजीराजांना पूर्ण कल्पना होती. परंतु जयसिंगच्या स्वारीनंतर मुघलांशी राजकारण करण्यामुळे शिवाजीराजांना स्वराज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अवसर सापडला नाही. आग्ऱ्याहून परतल्यानंतर १६६७ च्या अखेरीपर्यंत बरेच स्थीरस्थावर झाले आणि शिवाजीराजांना स्वराज्यात सुधारणा करण्यासाठी उसंत मिळाली.
आपल्या सहकाऱ्यांपैकी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांना शेती सुधारणा आणि पुनर्वसन याकडे लक्ष देण्यास सांगितले. शिवाजीराजांनी रयतेला अभय दिले. परगंदा झालेल्या रयतेला आपापल्या गावी परत बोलावून ज्याच्या त्याच्या जमिनी ज्याला त्याला परत केल्या. लावणी-संचणीसाठी लोकांना उत्तेजन दिले. पडीत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती जाहीर केल्या. स्वराज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतसारा निश्चित करण्याचे काम अण्णाजी दत्तो याचेकडे सोपविले. जे शेतकरी गरीब असतील त्यांना बी-बियाणे, नांगर पुरविणे, नांगरणीच्या कामासाठी बैल मिळवून देणे, इ. शेतकऱ्यांच्या हिताची कामे करून शिवाजीराजांनी रयतेचा विश्वास संपादन केला. आपल्या लष्कराला शिवाजीराजांनी असे आदेश दिले की शेतकऱ्यांना उपद्रव देऊ नये, त्यांच्या उभ्या पिकांची हानी करू नये, कोणी उपसर्ग केला तर राजे सहन करणार नाही, महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, ‘रयतेचा वाटा रयतेला मिळालाच पाहिजे’, अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचाही मोह धरता कामा नये. अशा प्रकारे स्वराज्यातील रयतेला संपूर्ण दिलासा देऊन शिवाजीराजांनी लोकांचा विश्वास तर संपादन केलाच, पण त्याचबरोर हे राज्य रयतेचे राज्य आहे अशी भावना लोकांच्या मनात त्यांनी निर्माण केली. परिणाम असा झाला की, गावागावातून मावळे आणि इतर लोक स्वराज्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास तयार झाले.
कोकण भागात प्रभाव :
बागलाण भागात मुघलांची पीछेहाट शिवाजीराजांनी केली होती. परंतु याच काळात कोकणामध्ये शिवाजीराजांच्या लहानसहान शत्रूंनी शिवाजीराजांच्या प्रदेशात घुसखोरी सुरु केली. विशेषतः जव्हार आणि रामनगर येथील राजे शिवाजीराजांच्या प्रदेशात अधिक्षेप करू लागले. जंजिऱ्याचे सिद्दी हे तर शिवाजीराजांच्या दृष्टीने अस्तनीतील शत्रू होते. त्यांनी किनाऱ्यावरच्या प्रदेशात मोठा उपद्रव सुरु केला होता. सिद्दींची चढाई पाहून पोर्तुगिजांनाही नवे अवसान आले आणि त्यांनीही कोकणात उपद्व्याप सुरु केले. या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिवाजीराजांनी मोरोपंतावर सोपविली होती. मोरोपंत खास सैन्यदल घेऊन कोकणात उतरले. प्रथम त्यांनी चौल आणि वसई ही पोर्तुगिजांची ठाणी आपल्या प्रभावाखाली आणली. त्यानंतर इ.स. १६७२ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी जव्हार जिंकून घेतले आणि पाठोपाठ रामनगरही ताब्यात घेतले. जव्हारचा राजा मुघलांच्या आश्रयाला गेला तर रामनगरचा राजा पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेला. अशाप्रकारे कोकणात आपला प्रभाव निर्माण करून मोरोपंतांनी मोहीम यशस्वी केली.
दोन शाही राजवटी :
आग्ऱ्याहून परत आल्यानंतर शिवाजीराजांनी गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. इ.स. १६७२ पर्यंत या संबंधामध्ये कोणताही बिघाड झाला नाही. पण या वर्षी म्हणजे १६७२ मध्ये दोन्ही शाही राजवटींचे सुलतान मरण पावले आणि राजकारणाचे रंग पालटू लागले. २१ एप्रिल १६७२ रोजी गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला कुतुबशहा मृत्यू पावला. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७२ रोजी विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मृत्यू पावला. या दोन्ही सुलतानांनी शिवाजीराजांशी सलोख्याचे संबंध जोडलेले होते. नवीन येणाऱ्या सुलतानाबरोबरही सलोखा कायम ठेवावा असे शिवाजीराजांचे धोरण होते. गोवळकोंड्याच्या सुलतानपदावर अब्दुल्ला कुतुबशहाचा जावई तानाशहा हा अब्दुल हसन हे नाव धारण करून विराजमान झाला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजीराजांनी निराजी पंतास गोवळकोंड्यास पाठविले. अब्दूल हसनने निरोजीपंताचे स्वागत करून मराठयांशी सलोख्याचे संबंध यापुढेही अबाधित रहातील असे अभिवचन दिले आणि दरवर्षी एक लाख होन खंडणी देण्याचेही त्याने मान्य केले.
विजापूरच्या आदिलशहाबाबत मात्र सलोख्याच्या संबंधाला उजाळा मिळू शकला नाही. कारण विजापूरच्या सुलतान पदावर सिंकंदरशहा विराजमान झाला पण तो अल्पवयी असल्यामुळे राजकारणाची सूत्रे विजापूर दरबारातील खवासखान नावाच्या सरदाराकडे गेली. खवासखान हा शिवाजीराजांचा पक्का विरोधक होता. अली आदिलशहाने शिवाजीराजांबरोबर जे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते ते त्याला अजिबात मान्य नव्हते. म्हणून दरबाराची सूत्रे आपल्या हाती आल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. मुघलांची मदत घेऊन शिवाजीराजांचा कायमचा बंदोबस्त करता येईल असे त्याला वाटत होते. शिवाजी महाराजांविरुद्ध उठाव करून प्रथम औरंगजेबाची कृपा संपादन करावी म्हणजे मुघल फौजा आपल्या मदतीला येतीलच असा सल्ला दियानत पंडीत या हस्तकाने त्याला दिला होता. खवासखानाने मराठयांच्या प्रदेशावर स्वारी करण्याचे ठरविले. अर्थात त्यामुळे सलोखा संपला आणि संघर्ष सुरु झाला.बहलोल खानाची स्वारी :
विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर शिवाजीराजांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजीराजांनी पाठविले. मोठया हिकमतीने कोंडाजी फर्जंदने ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. या स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान’ या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. खवासखानाने बहलोलखान नावाच्या सरदारास मोठया तयारीनिशी शिवाजीराजांविरुद्ध पाठविले. मुघल सरदार दिलेरखान याची मदत बहलोल खानाला मिळावी म्हणून खवासखानाने प्रयत्न सुरु केले. बहलोल खानची स्वारी येत आहे हे समजल्यावर शिवाजीराजांनी प्रतापरावाला बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले आणि त्याला निर्वाणीची आज्ञा केली की, ‘बहलोलखान स्वराज्यामध्ये उपद्व्याप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा निर्णायक पराभव करावा. आणि त्याला ठार मारून कायमचा बंदोबस्त करावा. शिवाजी महाराजांचा हा निर्वाणीचा इशारा मिळाल्यावर प्रतापराव गुजर आणि आनंदराव मोठया तयारीनिशी विजापूरी प्रदेशात घुसले. एप्रिल १६७३ मध्ये प्रतापरावाने बहलोलखानास उमराणीजवळ गाठले. याठिकाणी घनघोर युद्ध होऊन बहलोल खानाचा दणदणीत पराभव झाला. खान पकडला गेला. त्याने प्रतापरावची मनधरणी करून क्षमा मागितली. ‘या उपरी त्रास देणार नाही, आम्ही तुमचे आहोत’ अशा शब्दात खानाने विनविण्या केल्या. उदार अंतःकरणाच्या प्रतापराव गुजराने बहलोल खानाला सोडून दिले. ही गोष्ट समजताच शिवाजी संतप्त झाला. तुम्ही खानाला का सोडून दिले? म्हणून प्रतापरावाला दोष दिला.
खानाचा पराभव केल्यानंतर प्रतापरावाने हुबळीपर्यंत मजल मारून इंग्रजांची वखार लुटली. प्रतापरावाचे कर्नाटकात पराक्रम चालू असतांना देशावरचे मोक्याच्या ठिकाणचे किल्ले घेण्याचे सत्र मराठयांनी सुरूच ठेवले होते. १६७३ च्या पावसाळ्यापर्यंत परळी आणि सातारा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठयांनी जिंकून घेतले. मराठयांचे हे सारे पराक्रम ऐकून आदिलशहाचा सूत्रधार खवासखान अतिशय संतप्त झाला. बहलोल खानाची त्याने निर्भत्सना केली. तेव्हा पन्हाळा जिंकून घेण्याचा निर्धार बहलोल खानाने केला. त्यासाठी त्याने कोल्हापूरजवळ छावणी केली. ही बातमी समजताच शिवाजीराजांनी प्रतापरावाला बोलविले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की ‘बहलोलखानाला बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड न दाखविणे’ शिवाजीराजांनी निर्वाणीचा संदेश दिल्यानंतर प्रतापराव बहलोलखानाचा निकाल लावण्याचा मनसुबा रचून कोल्हापूरकडे निघाले. ज्याला आपण क्षमा केली होती तोच आपल्यावर उलटलेला आहे हे पाहून प्रतापराव उद्विग्न झालेला होते. संतापाने ते बेभान झालेले होते. कोल्हापूरच्या दक्षिणेस चाळीस मैलावर असलेल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावाने बहलोल खानाला गाठले. या दिवशी तारीख होती २४ फेब्रुवारी १६७४. नेसरीच्या खिंडीपर्यंत पोहचल्यावर आपल्या सैन्याची पाहणी करीत असलेल्या बहलोल खानाला त्याने पाहिले. खान दिसल्यावर प्रतापराव बेभान झाले. आणि कोणताही विचार न करता बरोबर असलेल्या केवळ ६ सैनिकांना घेऊन तो बहलोल खानच्या सैन्यात मोठया त्वेषाने घुसले. हे ७ मराठे वीर कापाकापी करत बरेच अंतर चालून गेले. पण बहलोल खानाचे सैन्य प्रचंड होते. हे ६ वीर आणि प्रतापराव लढता-लढता धारातिर्थी पतन पावले. नारायण शेणवी याने मुंबईकर इंग्रजांना ४ एप्रिल १६७४ रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये प्रतापरावाचे साहसाची माहिती कळवलेली आढळते. प्रतापरावला मारल्यामुळे बहलोल खानाला मोठा हर्ष झाला परंतु त्याचा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण आनंदरावाने मोठया त्वेषाने खानाच्या फौजेवर हल्ला केला त्याने बहलोल खानास माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीस धावून आला. आदिलशाही आणि मुघली फौजा एकत्र आल्या. तेव्हा गनिमी कावा लढवून आनंदरावाने आपला मार्ग बदलला व तो थेट बंकापूरपर्यंत गेला. बंकापूराजवळ असलेले संपगाव आनंदरावने लुटले. हे संपगाव बहलोल खानाच्या जहागिरीत मोडत असल्याने आनंदरावाने लुटले. बंकापूरजवळ झालेल्या लढाईत आदिलशाही सैन्याचा संपूर्ण पराभव झाला. विजय संपादन करून आणि मोठी लूट घेऊन आनंदराव जेव्हा शिवाजीराजांकडे आला तेव्हा त्याची पाठ थोपटून शिवाजीने त्याला हंबीरराव हा किताब दिला आणि त्याला सेनापती पदावर नेमले. प्रतापराव पडल्याचे दुःख शिवाजीराजांना फार झाले. प्रतापराव गेल्यामुळे आपली एक बाजू गेली असे उद्गार शिवाजीराजांनी काढल्याचे सभासद बखरीत नमूद केलेले आहे.
बहादुरखानाची स्वारी :दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीला धावून आला याचा उल्लेख वर केलेला आहे. परंतु बहलोल व दिलेर एकत्र येऊनही मराठयांविरुद्ध त्यांना यश मिळू शकले नाही. उलट मराठयांचे पराक्रम वाढत चालले. इ.स. १६७३ च्या ऑक्टोबर महिन्यात शिवाजीराजांनी पांडवगड जिंकून घेतला आणि तेथून थेट त्यांनी कारवारपर्यंत धडक मारली. शिवाजीराजांचे हे सर्व पराक्रम ऐकून औरंगजेबाची चीड वाढत चालली. दिलेरखानावरचा त्याचा विश्वास उडाला. शाहजादा मुअज्जम कडून कोणतीच कामगिरी होत नव्हती. त्यामुळे दक्षिणेत राजकारण हा औरंगजेबाच्या चिंतेचा विषय झाला होता. तेव्हा जानेवारी १६७३ मध्ये बहादूरखान या विश्वासू सरदारास दक्षिणेच्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठविले. दिलेरखान व बहादूरखान दोघे एकत्र आले आणि मराठयांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची योजना त्यांनी मांडली. परंतु कोणत्या बाजूने आक्रमण करावे याचा निर्णयच त्यांना लवकर घेता आला नाही दरम्यान एका चकमकीत शिवाजीराजांनी मुघलांचे एक हजार सैन्य गारद केले. त्यामुळे तर बहादुरखानाचे धाबेच दणाणले. दिलेरखानाला वारंवार अपयश आलेले पाहून औरंगजेबाने त्याला उत्तरेत बोलाविले. त्यामुळे मराठयांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची जबाबदारी एकटया बहादुरखानावर पडली. बहादूरखान लोभी वृत्तीचा असल्यामुळे त्याला काहीतरी आमिष दाखविले की त्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तो गप्प बसले अशी शिवाजीराजांची खात्री होती. आणि म्हणून, “बहादूरखान पेंडीचे गुरु आहेत, त्याचा गुमान काय?” असे मतप्रदर्शन शिवाजीराजांनी केल्याचे सभासदाने नमूद करून ठेवलेले आहे.
बहलोलखानाला पराभूत केल्यानंतर शिवाजीराजांनी दिलेरखान व बहादूरखान यांचीही वात लावली. आदिलशाही दरबार व दिल्लीचा दरबार शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे भयचकीत झाला. औरंगजेब अधिक अस्वस्थ झाला आणि विजापूरच्या खवासखानाची झोप उडाली. पोर्तुगिजांनी तर केव्हाच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. डच, फ्रेंच आणि इंग्रज आपला व्यापार सांभाळण्यासाठी शिवाजीराजांना मान देऊ लागले होते. कुतुबशहाशी तर शिवाजीराजांचे चांगले सख्य होते. जंजिऱ्याचे सिद्दी काहीतरी कुरपत काढून मराठयांच्या प्रदेशात घुसखोरी करीत होते. परंतु किनारी प्रदेशात शिवाजीराजांनी एवढी चोख व्यवस्था केली होती की सिद्दीही नामोहरम होऊन स्वस्थ बसले. थोडक्यात इ. स. १६७४ च्या पूर्वार्धात शिवाजीराजांचे सर्व शत्रू नामोहरम झाले होते आणि नरमले होते. राज्याभिषेक करण्यासाठी हीच मोठी संधी आहे असा विचार करून शिवाजीराजांनी गागाभट्टाशी विचारविनिमय करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा