Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग सातवा.




वाढदिवसाचा दरबार :
१२ मे १६६६ रोजी बादशहा औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आग्रा येथे खास दरबार भरविण्याचे ठरले होते. योगायोग असा की ११ मे १६६६ रोजी शिवाजीराजे मलुकचंदसराई येथे येऊन पोहचले होते. तेथून आग्रा शहर अतिशय जवळ होते. शिवाजीराजे आणि औरंगजेब यांची भेट वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष खास दरबारात घडवून आणावी असा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याचा विचार होता. १२ मे रोजी स्वतः रामसिंग शिवाजीराजांकडे गेला आणि त्यांचे स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी ‘दिवाण-इ-आम’ या दरबारात नेण्याचे त्याने ठरविले. परंतु शिवाजीराजे तेथे पोहोचण्याअगोदारच ‘दिवान-इ-आम’ मधील औरंगजेबाचा वाढदिवस समारंभ संपला होता आणि खास अमीर उमराव लोकांसाठी असलेल्या ‘दिवाण-इ-खास’ या दरबारामध्ये औरंगजेब गेला. त्या काळी दिवाण-इ-खास ‘घुसलखाना’ या नावाने प्रसिद्ध होता. घुसलखाना याचा अर्थ स्नानगृह. या शब्दामुळे काही इतिहासकारांचा गैरसमज होऊन औरंगजेब व शिवाजीराजे यांची भेट स्नानगृहात झाली असा हास्यास्पद निष्कर्ष त्यांनी काढलेला आढळतो. दिवाण-इ-खालसा घुसालखाना नाव पडण्याचे कारण की सम्राट अकबर स्नान आटोपले की लगेच या दरबारामध्ये हजर होत असे म्हणून दिवाण-इ-खासला रूढ अर्थाने घुसलखाना हे नाव प्राप्त झाले होते.
औरंगजेब ‘दिवाण-इ-खास’ मधेय आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अमीर उमरावांनी बादशहाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या.


शिवाजीराजे-औरंगजेब भेट :
‘दिवाण-इ-खास’मध्ये आल्यानंतर अमीर उमरावांची कुर्निसात करून बादशहाला भेटवस्तू अर्पण करण्यास सुरुवात केली. याचवेळी रामसिंग शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांना घेऊन ‘दिवाण-इ-खास’मध्ये दाखल झाला. शिवाजीराजे आणि संभाजीराजे दोघांनीही औरंगजेबास नजर-निसार सादर केली. याच क्षणी औरंगजेबाने शिवाजीराजांना फजित करण्याचे ठरविले होते. वास्तविक पहाता बादशहाने शिवाजीराजांना मोठया सन्मानाने भेटीसाठी बोलविले होते आणि खास पत्र पाठवून ‘तुमचा बहुत सन्मान होईल’ असे आश्वासनही दिले होते. जयसिंगाचा मुलगा रामसिंग यालाही वाटत होते की बादशहाकडून शिवाजीराजे आणि संभाजीराजेंना सन्मानाची वागणूक मिळेल. परंतु शिवाजीराजांना फजित करण्याची आणि त्याचा स्वाभिमान डिवचण्याची ही संधी आपोआप चालून आली असे समजून औरंगजेबाने शिवाजीराजांस पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे करण्याचे रामसिंगास फर्माविले. या रांगेत सिंहगड जिंकण्यात अपयशी ठरलेला जसवंतसिंग शिवाजीराजांच्या पुढे होता. त्याच्याकडे लक्ष जाताच शिवाजीराजे संतापाने थरथरू लागला. औरंगजेब अशाप्रकारे आपला अपमान करून पंचहजारी सरदारांच्या रांगेत जसवंतसिंगासारख्या क्षुद्र सरदाराच्या मागे उभे करील असे शिवाजीराजांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. रामसिंग त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु औरंगजेबाने मात्र शिवाजीराजांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. उलट अमीर उमरावांना खिलत देण्याचा उपक्रम सुरु केला. हा सारा प्रकार शिवाजीराजांना उद्वेगजनक वाटल्यास नवल नाही. रामसिंगला त्यांनी बजावले की मला शोभेसा सन्मान मिळाला पाहिजे. एवढे बोलून शिवाजीराजे सिंहासनाकडे पाठ करून घुसलाखान्याच्या बाहेर पडला. हे लक्षात येताच औरंगजेबाने रामसिंगाला शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांना घेऊन जाण्यास सांगितले.


शिवाजीराजे नजरकैदेत :
दरबारात अपमान झालेला पाहून शिवाजीराजे रागाने निघून गेले हे औरंगजेबाच्या लक्षात आले. रामसिंगाला बोलवून शिवाजीराजांची समजूत काढण्यास त्याला फर्माविले. पण अशा मलमपट्टीमुळे शिवाजीराजांच्या स्वाभिमानी मनाला झालेली जखम भरून येणे शक्य नव्हते. त्यांचा क्रोध थोडाही कमी झाला नव्हता. तेव्हा औरंगजेबाने तीन सरदारांबरोबर शिवाजीराजांसाठी खिलतपाठविली पण शिवाजीराजांनी खिलत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
आपण केलेला अपमान शिवाजीराजांना जिव्हारी लागला आहे हे औरंगजेबाने ओळखले. आता शिवाजीराजांच्या संदर्भात कोणता उपाय योजावा असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्याने ठरविले की शिवाजीराजांना नजरकैदेत ठेवावे आणि त्याच्या निवासस्थानाभोवती कडक पहारा ठेवावा. शिवाजीराजे पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकणे शक्य नव्हते. तथापि रामसिंगाबरोबर संभाजीराजे बादशहाच्या दरबारात गेले तेव्हा रत्नजडीत कट्यार, मोत्याचा कंठा आणि पोशाख देऊन औरंगजेबाने त्यांचा सन्मान केला. वरकरणी हे नाटक करीत असताना शिवाजीराजांना ठार मारण्याचा कटही औरंगजेबाने रचला होता. शिवाजीराजांच्या पहाऱ्यावर असलेल्या फुलदखानाला ‘गुप्तपणे शिवाजीराजांस मारून टाका’ असा इशारा बादशहाने दिला होता. शाही दरबारातील आप्तस्वकीयांकडून आणि ज्येष्ठ सरदारांकडून शिवाजीराजांना ठार मारावे असा आग्रह औरंगजेबाकडे चालू होता. शायिस्तेखानची पत्नी म्हणजे औरंगजेबाची मामी जहानआरा बेगम, जाफरखान, मुर्ताजाखान इ. सरदारही शिवाजीराजांचा निकाल लावावा असे औरंगजेबाला आग्रहाने सांगत होते. या साऱ्या गोष्टीचा कानोसा लागल्यावर रामसिंग अत्यंत संतप्त झाला. शिवाजीराजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपण तो सहन करणार नाही असे रामसिंगाने जाहीर केले आणि शिवाजीराजांच्या रक्षणासाठी आपली प्रतिष्ठा त्याने पणास लावली.
औरंगजेबाला शिवाजीराजांचे पुढे काय करावे हे समजेनासे झाले. एक तर शाही दरबारातील ज्येष्ठ सरदार आणि जहान आरा बेगम शिवाजीराजांना कडक शिक्षा दयावी यासाठी औरंगजेबाकडे आग्रह करीत होते. दक्षिणेत खुद्द मिर्झाराजे जयसिंग शिवाजीराजे आग्ऱ्याला नजरकैदेत असल्याचे समजल्यापासून अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यातच औरंगजेबाच्या मनात असा विचार आला होता की, शिवाजीराजांना कैदेत ठेवून आपण स्वतः दक्षिणेची स्वारी करावी आणि शिवाजीराजांचा सर्व प्रदेश जिंकून घ्यावा. पण हा बेत ज्यावेळी जयसिंगाला समजला तेव्हा त्याने प्रखर विरोध केला. त्याने औरंगजेबास कळविले की, ‘शिवाजीराजांना कैदेत ठेवून आपण दक्षिणेत स्वारी काढली तर येथील मराठे बिथरतील आणि मग आपला हेतू तर साध्य होणार नाहीच पण नामुष्की पदरात येईल.’ जयसिंगाकडून हा इशारा मिळाल्यानंतर औरंगजेबाने स्वारीचा बेत सोडून दिला. जसे दिवस जातील तसे त्याची अस्वस्थता वाढू लागली. शिवाजीराजांना खुष करून त्याचे मन रमवावे म्हणून औरंगजेबाने मोठी मनसब देण्याचे आमिष दाखविले. परंतु स्वाभिमानी शिवाजीराजांनी मनसबीचे आमिष झुगारून दिले. त्यामुळे औरंगजेब अधिकच संतप्त झाला. शिवाजीराजांना काबुलच्या मोहिमेवर पाठवून तिकडेच त्याचा निकाल लावावा असा एक अफलातून विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला. परंतु जयसिंग त्यामुळे अतिशय बिथरून जाईल आणि दक्षिणेतील मराठे सूड उगविल्याशिवाय रहाणार नाहीत असे वाटल्यामुळे त्याने तो अफलातून विचार सोडून दिला. नेमके काय करावे हे त्याला नक्की समजेना. त्याने एकच गोष्ट केली. ती म्हणजे शिवाजीराजांभोवतीचा पहारा कडक केला.शिवाजीराजेही कैदेमध्ये अत्यंत बेचैन अवस्थेत होते. आपल्यामुळे रामसिंगाची परिस्थिती अवघड झाली आहे याची खंत त्यांना वाटत होती. कारण औरंगजेबाने शिवाजीराजांचा जामीन म्हणून रामसिंगाला मुक्रर केले होते. रामसिंगाची अवस्था अधिक अवघड होऊ नये म्हणून त्याची जामीनकी काढून घ्यावी असा प्रस्ताव शिवाजीराजांनी औरंगजेबापुढे मांडला पण त्याची प्रतिक्रिया भलतीच झाली. औरंगजेबाने जामीनकी तर काढून घेतली नाहीच उलट रामसिंगाचाच आणखी एक पहारा शिवाजीराजांभोवती बसविला. आपल्याबरोबर दक्षिणेतून जी मंडळी आली आहे ती विनाकारण आपल्याबरोबर उत्तरेत अडकून पडली आहे याची खंतही शिवाजीराजांना वाटत होती. म्हणून आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी दयावी असा आणखी एक प्रस्ताव शिवाजीराजांनी मांडला. तो मात्र औरंगजेबाने तातडीने मान्य केला आणि शिवाजीराजांबरोबर आलेल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासंबंधी परवाने देण्याबद्दल त्याने हुकुम काढला.

शिवाजीराजांचे अलौकिक साहस :
शिवाजीराजांबरोबर आलेली बरीच मंडळी बादशहाकडून परवाने मिळताच दक्षिणेकडे परतू लागली. त्यामुळे शिवाजीराजांना हायसे वाटले. संभाजीराजे आणि काही निवडक लोक आपल्याजवळ राहतील असा त्याचा मनोदय होता. निवासस्थानाभोवातीचा पहारा तर कडक होताच, बाहेर कोठेही जाण्यास मज्जाव होता आणि पहारा कडक असल्यामुळे कोणाशीही संपर्क साधणे शिवाजीराजांना शक्य नव्हते. अशा या बिकट परिस्थितीत एक विलक्षण साहस करण्याचा शिवाजीराजांनी बेत रचला. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अलौकिक साहस करताना शिवाजीराजे आपल्या नियोजित कृतीबाबत बारीकसारीक तपशील निश्चित करीत असावे. या कृतीचे परिणाम काय होतील याचाही ते बारकाईने विचार करीत असावे. एखादे लोकविलक्षण साहस करायचे असेल तर त्याचे नियोजन ते स्वतः पूर्ण विचाराअंती सूत्रबद्ध करीत असे. अफझलप्रसंग, शाहिस्तेखानप्रसंग, पन्हाळ्यातून सुटका, कारतलबखानाचे युद्ध या सर्व घटना बारकाईने पाहिल्यास शिवाजीराजांचे लोकविलक्षण साहस सूत्रबद्ध नियोजानावरच आधारलेले होते हे समजून येते.
आग्ऱ्याला निवासस्थानाभोवतीचा पहारा अधिक कडक होत असलेला पाहून त्यामध्ये ढिलाई कशी आणता येईल याचा विचार शिवाजीराजांनी सुरु केला. आपण आजारी असल्याचा बहाणा त्याने केला. हकिमाकडे जाऊन औषध आणण्याची जबाबदारी त्यांनी हिरोजी फर्जंदवर सोपविली. मदारी मेहतर या एकनिष्ठ सेवकास पाय रगडण्यासाठी ठेवले. शिवाजीराजांची बतावणी पाहून पहारेकऱ्यांना शिवाजीराजे खरोखरच आजारी आहे असे वाटू लागले. आपली बतावणी यशस्वी होत आहे हे पाहून शिवाजीराजांनी आणखी एक युक्ती योजली. आपल्याला साधुसंतांचे व फकीरांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून मिठाईचे पेटारे पाठविण्याचे ठरविले. सुरुवातीला काही दिवस पहारेकरी हे पेटारे तपासून पाहत असत. पण पुढे-पुढे कडक तपासणी करण्याचे त्यांनी सोडून दिले. अशा प्रकारे पहाऱ्यांमध्ये क्रमाक्रमाने ढिलाई प्राप्त झाली. या संधीचा फायदा घेऊन एकेदिवशी शिवाजीराजांनी संभाजीराजांसह पलायन केले.


पेटाऱ्याची कथा :
शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका करून घेतली हे स्पष्ट करणारा नेमका पुरावा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. जेधे शकावलीमध्ये अशी नोंद आहे की ‘श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ या दिवशी आग्ऱ्यातून महाराज पेटारीयात बैसोनी पळाले.’ म्हणजे १९ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटाऱ्यात बसून शिवाजीराजे आणि संभाजीराजे पळाले असा अर्थ होतो. बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यात बसूनच सुटका करून घेतली असे मानतात. समकालीन साधनांमध्ये हि याच आशयाचे पुरावे मिळतात. समकालीन पाश्चात्त्य प्रवासी थेवेंनॉट याने आपल्या वृत्तांतामध्ये शिवाजीराजे टोपलीत बसून पळून गेले असा उल्लेख केला आहे. भिमसेन सक्सेना या दरबारी लेखकाने ‘मिठाईच्या पेटाऱ्यातूनच शिवाजीराजे व संभाजीराजे निसटले असे लिहून ठेवले आहे.’ वखारवाल्यांच्या कागदपत्रांतूनही शिवाजीराजे पेटाऱ्यातून निसटले अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. मराठी बखरीमध्ये पेटाऱ्यांचीच कथा रंगतदार करून सांगितलेली आढळते. फारसी तवारिखकार खाफीखान याने शिवाजीराजे व त्यांचा मुलगा दोघेही टोपल्यात बसून निसटून गेले असे लिहून ठेवलेले आढळते. या सर्व समकालीन साधनांचा मतितार्थ हाच की कैदेतून पळून जाण्यासाठी शिवाजीराजांनी मिठाईच्या पेटाऱ्याचा उपयोग केला. पण या अनुमानाला दोन मोठे अपवाद आहेत. ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथाचा कर्ता साकी मुस्तैदखान हा लिहितो की, ‘आजारी पडण्याचा बहाणा करून शिवाजीराजे २७ सफर (१९ ऑगस्ट) रोजी मुलासह पळून गेले.’ मुस्तैदखान हा औरंगजेबाचा दरबारी लेखक असल्यामुळे त्याचे विधान विचारात घेणे आवश्यक आहे. आणखी एक समकालीन पाश्चात्य प्रवासी बर्निअर याने लिहून ठेवले आहे की ‘शिवाजीराजांच्या पलायनामागे खुद्द औरंगजेबाचाच हात होता  शिवाजीराजांच्या सुटका नाट्याची मिमांसा करताना या विधानाचाही विचार करणे आवश्यक आहे.
शिवाजीराजांची आग्रा भेट आणि सुटका समजावून घेण्यासाठी आणखी महत्त्वाच्या साधनाचा विचार करावा लागतो. ते साधन म्हणजे राजस्थानी भाषेतील समकालीन पत्रे. या पत्रांमधून शिवाजीराजे उत्तरेत आल्यापासून आग्र्याला जाईपर्यंत त्याच्या विषयीची अनेक उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीराजांची सुटका झाल्यानंतरचेही उल्लेख या कागदपत्रांमध्ये आहे. २३ ऑगस्ट १६३३ च्या एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की ‘रात्र एक दिड घटका राहिली असता पहारेकऱ्याने शिवाजीराजांस पाहिले होते. परंतु नंतर अचानकपणे ते कसा निसटले हे त्याला समजले नाही’ ३ सप्टेंबरच्या पत्रात असा उल्लेख आहे की ‘४ घटिका दिवस वर आला तेव्हा शिवाजीराजे निसटल्याचे समजले’ या दोन्ही पत्रांचा अर्थ असा की शिवाजीराजे पहाटेच्या अंधारात पहारा शिथिल असताना निसटून गेले असावे. म्हणजेच पहारेकरी बेसावध असतानाच शिवाजीराजे संभाजीराजांसह निसटले असले पाहिजे. कदाचित पहारेकऱ्यांनाच त्यांनी वश करून घेतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पहारेकऱ्यांना वश करून आणि अगोदर जमवून ठेवलेले परवाने उपयोगात आणून शिवाजीराजांनी सुटका करून घेतली असावी असे म्हणता येईल. शिवाजीराजे पेटाऱ्यातून निसटले हा निष्कर्ष खुद्द बादशहानेच काढला असावा हे ३ सप्टेंबरच्या राजस्थानी पत्रावरून दिसून येते.


औरंगजेबाचा संताप :

शिवाजीराजे एवढ्या मोठ्या कडक पहाऱ्यातून एकाएकी नाहिसे झाल्याचे वर्तमान पहाराप्रमुख फुलादखान याचेकडून औरंगजेबाला समजले. तेव्हा औरंगजेब अत्यंत संतप्त झाला. फुलादखानाने औरंगजेबास सांगितले की ‘आम्ही वरचेवर कोठडीत जाऊन पाहत होतो पण एकाएकी गहजब झाला. शिवाजीराजे गायब जाहले. पळाले, की जमिनीत घुसले, की आसमानामध्ये गेले हे काहीच कळले नाही. देखत-देखत नाहिसे झाले. काय हुन्नर जाहला न कळे.’ हे सर्व ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकात भिडली त्याने ताबडतोब शिवाजीराजांचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अडीच लाख स्वार पाठविले. सभासदाने दिलेली माहिती कदाचित अतिशयोक्तीची असली तरी शिवाजीराजांचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठविली ही गोष्ट मात्र खरी. शिवाजीराजे कैदेतून पाळले म्हणून औरंगजेबाने रामसिंगास जबाबदार धरले. त्याला बोलावून त्याचा पाणउतारा केला आणि त्याची मनसब एकदम कमी केली. शिवाजीराजांबरोबर आलेल्या मराठयांपैकी जे लोक अद्याप परत गेले नव्हते आणि आग्रा किंवा जवळपास मुक्कामाला होते त्यांची त्वरेने धरपकड करण्यात आली. त्यामध्ये रघुनाथपंत कोरडे, दत्ताजी त्रिंबक, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आणि कवींद्र परमानंद ह्यांचा समावेश होता. जवळजवळ ८ महिने हि मंडळी औरंगजेबाच्याच कैदेमध्ये होती. पुढे एप्रिल १६६७ मध्ये या साऱ्यांची सुटका करण्यात आली.


शिवाजीराजे राजगडकडे परत :
शिवाजीराजांना शोधण्यासाठी औरंगजेबाने फौजेची अनेक पथके वेगवेगळ्या मार्गांनी पाठविली. बहुधा शिवाजीराजे वेषांतर करून हुलकावण्या देत असावे. कारण कोणत्याही तुकडीला त्यांना शोधून काढता आले नाही. संभाजीराजे बरोबर असल्यामुळे शिवाजीराजांना त्यांची काळजी वाटत होती. एक तर ते वयाने लहान होते. तप बरोबर असल्यामुळे शिवाजीराजांचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते. तेव्हा शिवाजीराजांनी असा विचार केला की संभाजीराजांना मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे मार्गक्रमण करावे. मथुरेत असलेले शिवाजीराजांचे निष्ठावंत सेवक कृष्णाजीपंत व काशीपंत यांच्या स्वाधीन संभाजीराजांना करून शिवाजीराजांनी निर्धास्तपाणे दक्षिणेचा मार्ग स्वीकारला.
शिवाजीराजे कोणत्या मार्गाने राजगडला परत आले याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. आग्र्याहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजीराजांनी स्वीकारला असावा असे मत सर जदुनाथ सरकार यांनी दिलेले आहे. या मताप्रमाणे आग्रा-मथुरा-वाराणसी-प्रयाग-गोंडवण-हैद्राबाद या मार्गाने शिवाजीराजे राजगडाकडे परतले असावे. परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रांवरून असे दिसते की शिवाजीराजे ज्या मार्गाने आग्र्याला गेले त्याच मार्गाने राजगडाकडे परतले कारण आग्र्याहून निसटल्यावर ते नरवरच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख एका राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे. आग्ऱ्याला जाताना ते राजगड-औरंगाबाद-हंडिया-भोपाळ-सिरोज-नरवर-ग्वाल्हेर-घोलपूर-आग्ऱ्याया मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते. बहुधा त्याच मार्गाने ते राजगडकडे परत आले असावे १२ सप्टेंबर १६६६ रोजी निवडक लोकांसह शिवाजीराजे राजगडला सुखरूप पोहचले. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल २४ दिवसांनी ते राजगडला पोहचले. जर ते गोंडवण-हैद्राबाद मार्गाने आले असते तर त्यांना अधिक दिवस लागले असते. शिवाजीराजे राजगडला सुखरूप पोहोचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ. इतर सर्व अधिकारी , राजगडवरील सर्व सेवक आणि मावळे यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. राजमाता जिजाबाई ह्यांना औरंगजेबाच्या पोलादी पिंजऱ्यात अडकलेला आपला पुत्र तेथून निसटून सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही. शिवाजीराजे राजगडाला सुखरूप पोहचल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर १६६६ मध्ये कृष्णाजी पंताने संभाजीराजांना राजगडावर आणले. ते येईपर्यंत शिवाजीराजे राजगडला आल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली असावी. कारण जेधे शाकावलीत असा उल्लेख आहे की ‘मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १५८८ (२० नोव्हेंबर १६६६) रोजी शिवाजीराजे संभाजीराजांसह वर्तमान राजगडास आले.’ राजगडास आल्यानंतर शिवाजीराजांनी सवड न घेता आगामी मोहिमेची तयारी सुरु केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा