जयसिंगाची स्वारी :
शिवाजीराजांचे वाढते सामर्थ्य पाहून दिल्ली दरबारात मोठी खळबळ माजली होती. विशेषतः आपला मामा शायिस्तेखान याला शिवाजीराजांनी अवमानीत केले, मुघल फौजेचा पराभव केला या गोष्टीचा औरंगजेबाला अतिशय संताप आलेला होता. त्यातच जसवंतसिंगही पराभूत होऊन परतला होता. शिवाजीराजांचा बंदोबस्त कसा करावा या विचाराने औरंगजेब उव्दिग्न झालेला असतानाच शिवाजीराजांनी सुरत शहर लुटल्याची बातमी त्याला कळली. त्यामुळे तर त्याच्या संतापात अधिकच भर पडली. शाहजादा मुअज्जमलादक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठविले होते. परंतु औरंगाबादला जाऊन तो स्वस्थ बसून राहिला तेव्हा शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पराक्रमी आणि तोलामोलाचा सरदार पाठवावा लागेल याची औरंगजेबाला खात्री पटली आणि म्हणून आपल्या दरबारातील ज्येष्ठ सरदार मिर्झाराजे जयसिंग याची औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध नेमणूक केली. जयसिंगाबरोबर दिलेरखान या पठाण सरदारालाही पाठविण्याचे औरंगजेबाने ठरविले. जयसिंगावर वचक असावा हा त्यामागील हेतू होता. याशिवाय दाऊदखान, कुतुबऊद्दीन, सुजनसिंग रामसिंग इ. अनेक लहानमोठे सरदार जयसिंगाच्या मोहिमेत सामील झाले. मुघल दरबारात निकोलाय मनुची हा इटालियन तोफखान्याचा अधिकारी होता. त्यालाही जयसिंगाबरोबर दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याची औरंगजेबाने आज्ञा केली.
स्वतः मिर्झाराजे जयसिंग पराक्रमी सरदार आणि कुशल सेनानी म्हणून प्रसिद्ध होता. आतापर्यंत त्याने काढलेल्या मोहिमांमध्ये त्याला कोठेही अपयश आले नव्हते. त्याने स्वारीची कडेकोट तयारी केली. प्रचंड मोठे सैन्य, तोलामोलाचे सरदार, तोफखाना अशा तयारीनिशी जयसिंग दक्षिणेच्या स्वारीवर निघाला. ९ जानेवारी १६६५ रोजी जयसिंगाने नर्मदा नदी ओलांडली आणि १० फेब्रुवारी रोजी तो औरंगाबादला पोहचला. शाहजादा मुअज्जाम याच्याबरोबर बोलणी करून त्याने शिवाजीराजांच्या प्रदेशावर मोहीम काढली. ३ मार्च १६६५ रोजी तो पुण्यात येऊन दाखल झाला.
जयसिंगाचे राजकारण :
दिल्लीहून निघण्यापूर्वी जयसिंगाने औरंगजेबाकडून ३ अटी मान्य करून घेतल्या होत्या. एक म्हणजे मोहिमेला लागेल तेवढा पैसा दक्षिणेच्या सुभ्यातून खर्च करण्याचा अधिकार त्याने मागून घेतला होता. दक्षिणेतील मुघल किल्लेदारांना जयसिंगाचे हुकुम मानले पाहिजेत ही अटही त्याने मान्य करून घेतली होती. जयसिंगाची तिसरी मागणी म्हणजे मुघल फौजेतील अधिकाऱ्यांना रजा देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकारही त्याने मान्य करून घेतला होता. या ३ मागण्यांचा अर्थ असा की दक्षिणेच्या मोहिमेचे संपूर्ण सूत्रसंचालन जयसिंगाच्याच ताब्यात राहणार होते.
पुण्यात आल्यानंतर जयसिंगाने आपल्या मोहिमेची पद्धतशीर आखणी केली. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजीराजांच्या प्रदेशाच्या भौगोलिक सीमा, डोंगर-दऱ्या, किल्ले यांची त्याने बारकाईने माहिती जमा केली. त्यानंतर शिवाजीराजांचे शत्रू आपल्या गोटात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. जावळीचे मोरे आणि जव्हारचे राजे शिवाजीराजांचे शत्रू होते. त्यांच्याशी जयसिंगाने सख्य जोडले. पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांनी शिवाजीराजांना कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये म्हणून त्याने दबाव आणला.
आदिलशहा शिवाजीराजांना आतून मदत करील याची शक्यता वाटल्यामुळे काही अफगाणांना व्यापाऱ्यांच्या वेषामध्ये त्याने विजापूरला पाठविले आणि आदिलशहाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. अशाप्रकारे राजकीय डावपेच पूर्ण केल्यानंतर जयसिंगाने आपली ठाणी मजबूत करण्यावर भर दिला. वास्तविक पाहता शिवाजीराजांचे स्वराज्य आकाराने अत्यंत लहान होते. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि कुलाबा या जिल्ह्यांतील काही परगणेच शिवाजीराजांच्या ताब्यात होते. जे परगणे ताब्यात होते त्या प्रदेशातील सर्व किल्लेही शिवाजीराजांच्या ताब्यात नव्हते. तेव्हा अशा या लहान प्रदेशाची नाकेबंदी करणे जयसिंगाला मूळीच अशक्यप्राय नव्हते.
‘चहूबाजूंनी कडेकोट नाकेबंदी’ (Strict Blockade System)या डावपेचाचा उपयोग करून शिवाजीराजांना कोंडीत पकडावयाचे अशी व्यूहरचना त्याने केली. काही निवडक तुकड्या शिवाजीराजांच्या महत्त्वाच्या किल्ल्याकडे पाठवून त्या किल्ल्यांना वेढे घालण्याची व्यवस्था केली. महत्त्वाच्या किल्ल्यांची नाकेबंदी केल्यावर त्याने टेहाळणीसाठी महत्त्वाच्या घाटावर आणि घाटाखाली खडी फौज ठेवली. शिवाजीराजांच्या लहानशा स्वराज्याची कडेकोट नाकेबंदी केल्यानंतर शिवाजीराजांचा एकेक किल्ला जिंकून घ्यावयाचा अशी योजना त्याने आखली आणि त्याप्रमाणे सासवडजवळ असलेल्या पुरंदर या किल्ल्याला त्याने वेढा घातला. वेढयाचे आधिपत्य दिलेरखान याच्याकडे दिले आणि इतर लष्करी हालचाली जयसिंगाने आपल्या नियंत्रणाखाली सुरु केल्या. जयसिंगाच्या आदेशाप्रमाणे मुघल फौजांनी तुंग, तिकोना, लोहगड या किल्ल्यांच्या आसपासचा प्रदेश, बेचिराख केला. शिवाजीराजांची राजधानी राजगड या किल्ल्याच्या आसमंतातील प्रदेशही जाळून-पोळून उध्वस्त केला. जयसिंगाच्या या चौफेर आक्रमणामुळे शिवाजीराजांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. पुरंदरचा वेढा चालू असताना आणि मुघली फौजा लुटालूट करीत असताना जयसिंगाने सासवड येथे आपला तळ ठोकला होता. पुरंदरचा किल्ला जिंकण्यासाठी दिलेरखानचे निकराचे प्रयत्न चालू होते पण त्याला लवकर यश येईना.
पुरंदरचा तह :
दिलेरखानाने पुरंदरचा वेढा रेंगाळत ठेऊन आपला मोहरा पुरंदरजवळ असलेल्या रुद्रमाळ किंवा वज्रगड या किल्ल्याकडे वळविला. हा किल्ला जिंकण्यास त्याला फारशी यातायात करावी लागली नाही. १३ एप्रिल १६६५ रोजी दिलेरखानने वज्रगड जिंकून घेतला. हा किल्ला ताब्यात आल्यामुळे मुघलांचा एक मोठा फायदा झाला. कारण रुद्रमाळ या किल्ल्यावर त्यांना तोफा चढविणे सोयीचे झाले. या तोफांचा सरळ मारा पुरंदर किल्ल्याकडे जात असल्यामुळे किल्ल्यावरील मराठ्यांची कोंडी झाली. पुरंदर किल्ल्याच्या तटावर तोफांचा मारा चालू असताना पुरंदरचा निष्ठावंत हवालदार मुरारबाजी प्रभू याने निवडक लोकांनिशी हल्ल्याचा मुकाबला केला. तोफांचा मारा चालू असतानाच मुघलांची एक तुकडी किल्ला चढून वर आली आणि तेथे हातघाईची लढाई झाली. या लढाईत मुरारबाजीने विलक्षण पराक्रम गाजविला. लढत असताना वर्मी घाव लागून मुरारबाजी पडला. त्याचा हा पराक्रम पाहून खुद्द दिलेरखानाने उद्गार काढले की, “असा शिपाई खुदाने पैदा केला.” मुरारबाजी पडल्यावरही तेथील मराठे लढतच राहिले. अखेरीस जून १६६५ मध्ये पुरंदर मुघलांच्या ताब्यात आला. पुरंदर मुघलांच्या ताब्यात गेल्याची वार्ता समजल्यानंतर शिवाजीराजांनी आपल्या राजकारणाचे सूत्र बदलले. जयसिंगाचा लढा अशाप्रकारे चालू राहिल्यास आपले लहानसे स्वराज्य मुघलांच्या घशात जाईल आणि स्वराज्य वाचविणे आपल्याला फार अवघड होईल, याचा अंदाज शिवाजीराजांना आला म्हणून नाईलाजाने शरणागती पत्करून जयसिंगाबरोबर तह करण्याचे त्यांनी ठरविले.
११ जून १६६५ रोजी शिवाजीराजे आणि जयसिंग यांची भेट झाली. २ दिवस बोलणी करून १३ जून १६६५ रोजी शिवाजीराजे आणि जयसिंग यांच्यात तह झाला. हा तह ‘पुरंदरचा तह’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्या.
१. लहानमोठे १२ किल्ले आणि एक लाख होण उत्पन्नाचा मुलूख एवढ्यावर शिवाजीराजांनी संतुष्ट राहावे. बादशहाची अवज्ञा अगर बादशाही मुलुखाची लूट करू नये.
२. शिवाजीराजांचे २३ किल्ले आणि बालाघाट आणि निजामशाही तळकोकण मिळून चार लाख होनांचा मुलूख शिवाजीराजांकडून घेऊन मोगली साम्राज्याला जोडण्यात यावा.
३. दख्खन सुभ्याच्या अमलात हुकुम होईल तेव्हा शिवाजीराजांनी कामगिरीवर हजर व्हावे.
४. पाच हजार स्वारांची मनसब घेऊन संभाजीराजे आणि ‘दुसरा शिवाजीराजे’ म्हणून प्रख्यात असलेल्या नेताजी या उभयतांनी दख्खनच्या सुभेदाराबरोबर राहावे.
५. तळकोकणातील ४ लाख होण उत्पन्नाचा आणि विजापूरी बालाघाटातील ५ लाखांचा मुलूख जर बादशहाने शिवाजीराजांना दिला, आणि विजापूरकरांचा मुलूख जिंकल्यावर ह्या मुलुखाचा ताबा बादशाही फर्मानाने कायम शिवाजीराजांकडे करून दिला, तर मग दरसाल तीन लाखांच्या हप्त्याने शिवाजीराजांनी बादशहाला ४० लाखांची खंडणी द्यावी.
तहाचे एकूण स्वरूप लक्षात घेतले तर त्या तहामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यावर मुघलांची बळकट पकड निर्माण झाली असे दिसून येते. जयसिंगाने तह करण्यापूर्वी या तहाच्या मसुद्यास औरंगजेबाकडून परवानगी मिळवली होती आणि ही परवानगी मिळवताना या तहाचे ३ फायदे जयसिंगाने औरंगजेबाच्या नजरेस आणून दिले होते. एक म्हणजे या तहातील अटींप्रमाणे ४० लाख होण मराठ्यांकडून मिळणारे होते. दुसरा फायदा म्हणजे आदिलशहा आणि शिवाजीराजे यांच्यामधील वैमनस्य वाढणार होते. तिसरा फायदा म्हणजे आदिलशहाच्या ताब्यातील दुर्गम डोंगराळ प्रदेश जिंकून मुघलांना मिळवून देण्याचे काम शिवाजीराजांकडे सोपविले होते. तहाचा साक्षेपाने विचार केल्यास या तहामुळे शिवाजीराजांची स्वतंत्रता जवळजवळ संपुष्टात येऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे मुघलांची सेवा पत्करली होती. अर्थात प्रत्यक्षात शिवाजीराजांनी कोणतीही मनसबदारी पत्करली नसली तरी शिवाजीराजांचा मुलगा संभाजीराजे यांना मनसबदारी पत्करावी लागली होती. त्यामुळे शिवाजीराजांच्या कोणत्याही हालचालीवर दडपण राहणे स्वाभाविक होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीराजांकडून जे २३ किल्ले मुघलांनी घेतले होते ते मोक्याच्या ठिकाणी असून लष्करीदृष्ट्या महत्वाचे होते. हे किल्ले ताब्यात आल्यावर शिवाजीराजांच्या हालचालींना संपूर्ण प्रतिबंध करता येईल आणि जे १२ किल्ले शिवाजीराजांकडे आहेत त्या किल्ल्यांची सतत टेहळणी करता येईल असा जयसिंगाचा हिशेब होता. परंतु औरंगजेबाला मात्र १२ किल्ले शिवाजीराजांकडे राहू देणे धोक्याचे वाटले. म्हणून शिवाजीराजांचे सर्वच किल्ले ताब्यात घ्यावे असा आग्रह त्याने धरला होता. परंतु या १२ किल्ल्यामुळे शिवाजीराजे काही शिरजोर होणार नाही, अशी ग्वाही जयसिंगाने औरंगजेबाला दिली होती. थोडक्यात पुरंदरचा तह म्हणजे शिवाजीराजांच्या चिमुकल्या स्वराज्यावर पडलेले फार मोठे सवत होते. शिवाजीराजांचे सर्व सरदार कुटुंबीय मंडळी आणि निष्ठावंत सेवक हवालदिल झाले होते. शिवाजीराजांकडे केवळ १२ किल्ले ठेवल्यामुळे ते आदिलशहाविरुद्ध आपल्याला मदत करतील आणि दक्षिणेत मुघलांचे पूर्ण वर्चस्व वाढेल हे तहाच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते. जयसिंगचे हे सूत्र शेवटी औरंगजेबानेही मान्य केले आणि शिवाजीराजांना ताबडतोब आदिलशहाविरुद्ध मोहीम काढण्यास भाग पाडा असा तगादा त्याने सुरु केला.
शिवाजीराजांपुढे आव्हान :
पुरंदरचा तह हे शिवाजीराजांपुढे मोठे आव्हान होते. कारण या तहाप्रमाणे ४० लक्ष होण खंडणी १३ वर्षामध्ये मुघलांना देण्याचे शिवाजीराजांवर बंधन होते. याचा अर्थच असा की १३ वर्षे शिवाजीराजांवर मुघलांचे बंधन राहणार होते. बराच मोठा मुलूख आणि किल्ले शिवाजीराजांनी या तहाने गमाविले होते. उरलेले स्वराज्यातील १२ किल्ले म्हणजे मुघलांच्या दृष्टीने एखाद्या देशमुखचा किंवा जहागिरदाराचा प्रदेश होता. शिवाजीराजांना संपूर्ण वर्चस्वाखाली आणण्यामध्ये जयसिंगाने कोणतीच कुचराई केली नव्हती. शिवाजीराजांनी सुद्धा आपल्या काळजावर मोठा धोंडा ठेऊन विषण्ण मनःस्थितीत हा तह मान्य केला होता. पुरंदरच्या तहाने शिवाजीराजांचे लहान शत्रू ही शेर बनले. ऑगस्ट १६६५ च्या एका इंग्रजी पत्रात उल्लेख आहे की, “आपला देश शिवाजी इतक्या गरिबीने शत्रूच्या हवाली करतो आहे त्याअर्थी काही विशेष घडले असलेच पाहिजे.” थोडक्यात पुरंदरच्या तहामुळे शिवाजीराजांचे चिमुकले स्वराज्य रौद्र स्वरूपाच्या संकटात सापडले होते.
सप्टेंबर १६६५ मध्ये औरंगजेबाकडून पुरंदरच्या तहाला मान्यता आली. त्याचप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीराजांसाठी कृपेचे फर्मान आणि पोशाख जयसिंगाकडे पाठविला. २७ सप्टेंबर रोजी शिवाजीराजांनी स्वतः जयसिंगाकडे जाऊन कृपेचे फर्मान स्विकारले. शिवाजीराजांसाठी त्यांच्या आयुष्याचा हा एक अत्यंत दुर्देवी क्षण ठरला. पुरंदरचा तह झाल्यानंतर आणि शिवाजीराजांनी औरंगजेबाचे फर्मान स्वीकारल्यानंतर जयसिंगाने आदिलशाहीविरुद्ध मोहीम हाती घेतली. तहातील अटीप्रमाणे या मोहिमेत जयसिंगाला मदत करण्यासाठी शिवाजीराजे बांधले गेले होते. जयसिंगाने आपल्या नेहमीच्या रणनीतीनुसार आदिलशाहीचे सरदार फोडण्यास सुरुवात केली. कित्येक सरदार आदिलशाही सोडून जयसिंगाला येऊन मिळाले. रुस्तुमजमा या निष्ठावंत सरदाराने मात्र आदिलशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला. नोव्हेंबर १६६५ मध्ये जयसिंगासमवेत शिवाजीराजेही विजापूरच्या मोहिमेवर निघाले. जयसिंग आणि शिवाजीराजे संयुक्तपणे विजापूरवर चालून येत आहे हे पाहून अली आदिलशहा खडबडून जागा झाला. आपले राज्य वाचविण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न करायचे ठरविले. राजधानीच्या रक्षणाची त्याने एवढी कडेकोट तयारी केली की जयसिंग व शिवाजीराजांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. आत्मरक्षणासाठी आदिलशहाने विजापूरच्या आसमंतात चारी बाजूंनी खडी फौज ठेवली. जयसिंगाच्या मोहिमेला अडथळा यावा म्हणून विजापूरच्या परिसरातील ४-५ मैलांचा टापू स्वतःच उध्वस्त करून टाकला आणि सर्वत्र पाण्यामध्ये विष पेरून ठेवले अशाप्रकारे विषारी तटबंदी विजापूरच्या आसमंतात उभी केल्यामुळे मुघलांची फौज त्या टापूपर्यंत येणे महाकठीण होते. तशात विजापूर पासून १२ मैल अंतरावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात मुघलांचा दणदणीत पराभव झाला. त्या लढाईत मुघलांचे चौदा हजार सैन्य गारद झाले असा उल्लेख एका समकालीन पत्रात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत पत्रात शिवाजीराजांनीच मुघलांचा घात केला म्हणून त्यांना अपयश आले असाही उल्लेख आलेला आहे. शिवाजीराजांनी दगाफटका करून मुघलांना फसविले असे मात्र घडलेले नाही उलट आपले सर्व सैन्य घेऊन जयसिंगाबरोबर त्यांनी मोहीम हाती घेतली होती. ताथवड व फलटण ही दोन ठाणीही मुघलांना जिंकून दिली होती. एक गोष्ट मात्र खरी ती म्हणजे या मोहिमेमध्ये शिवाजीराजांचे मन नव्हते आणि त्यांना स्वारस्यही वाटत नव्हते.
विजापूर मोहीम फसल्यानंतर शिवाजीराजांनी पन्हाळा किल्ला जिंकून घेण्याची योजना जयसिंगापुढे मांडली. जयसिंगाने, मान्यता दिल्यावर शिवाजीराजांनी पन्हाळ्यावर हल्ला केला पण त्याला यश आले नाही. बहुधा याचवेळी नेताजी पालकर आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. नेताजी पालकर आदिलशहाकडे निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. औरंगजेबाने त्याचे सक्तीने धर्मांतर केले. महमद कुलीखाँ असे नाव ठेऊन त्याला काबूलकडे मोहिमेवर पाठविले.
विजापूरच्या मोहिमेत जयसिंगासारखा महाप्रतापी सरदार आणि शिवाजीराजांसारखा चतुर युद्ध सेनानी एकत्र असतानाही यश मिळाले नाही हे पाहून औरंगजेबाला या मोहिमेविषयीच संशय वाटू लागला. जयसिंगावर त्याचा विश्र्वास होता, पण शिवाजीराजांविषयी मात्र त्याला खात्री वाटत नव्हती. शिवाजीराजा हा धूर्त राजकारणी असल्यामुळे अंत:स्थपणे त्याच्या काही हालचाली चालत असतील असा संशय जयसिंगालाही येत होता. शिवाय दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा मुघलांनविरुद्ध एक झाले आहे, असा दाट संशय जयसिंगाला आला होता आणि औरंगजेबालाही त्याने तसे कळविले होते. दिल्लीहून औरंगजेबाचा जयसिंगावर वारंवार दबाव येत होता. त्यामुळे त्याने शेवटी शिवाजीराजांनाच औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठवून देण्याचे ठरविले. औरंगजेबाची संमती येताच मिर्झाराजे जयसिंगाने शिवाजीराजांची रवानगी उत्तरेकडे केली.
शिवाजीराजे उत्तरेकडे :
पुरंदरचा तह झाल्यापासूनच शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या भेटीस जावे असा जयसिंगाचा आग्रह चालू होता. विजापूरच्या मोहिमेत यश न आल्यामुळे जयसिंगाने आपला विचार पक्का केला आणि औरंगजेबाच्या भेटीस जाण्यसाठी शिवाजीराजांचे मन वळविले. शिवाजीराजांनाही उत्तर भारतात जाऊन तेथील मुघली राजवट पाहण्यची मनापासून इच्छा होती. औरंगजेबालाही दक्षिणेच्या राजकारणात तुफान माजविणाऱ्या शिवाजीराजांना पाहण्यची इच्छा होती. प्रत्यक्ष भेटीत शिवाजीराजांच्या मनातील अंत:स्थ हेतू जाणून घेता येतील असे बादशहाला वाटत होते.
५ मार्च १६६६ रोजी शिवाजीराजे संभाजीराजेंसह उत्तरेकडे म्हणजे आग्र्याकडे निघाले. प्रयाण करण्यापूर्वी शिवाजीराजांनी स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाबाई ह्यांच्याकडे सुपूर्त केली. मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत मुजुमदार यांच्यावर स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली. शिवाजीराजांनी आपल्यासमवेत निवडक मराठा सरदार घेतले होते. त्यामध्ये निराजी रावजी, त्रिंबकजी सोनदेव, माणको हरी, द्दत्ताजी त्रिंबक, राघोजी मित्र, दावलजी गाडगे आणि हिरोजी फर्जंद हे प्रमुख सदर होते. एकूण लष्कर ३००० आणि मावळे १००० दिमतीसाठी बरोबर घेतले होते.
औरंगाबाद शहरात ज्या दिवशी शिवाजीराजांनी प्रवेश केला त्या दिवशी त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यांना पहाण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्याचे वर्णन भीमसेन सक्सेना याने आपल्या ‘तारिखे दिल्कशा’ या ग्रंथात करून ठेवलेले आहे. औरंगाबादचा मुघल अधिकारी सफशिकन खान हा मोठ्या आढ्यतेणे शिवाजीराजांशी वागला तेव्हा शिवाजीराजांनी त्याला चांगली समज दिली. औरंगाबादेत काही दिवस शिवाजीराजांनी मुक्काम केला आणि त्यानंतर आग्र्याकडे प्रयाण केले. आग्र्याकडे जात असतांना मध्ये एका मुक्कामात शिवाजीराजांना औरंगजेबाचे एक पत्र मिळाले. या पत्रात औरंगजेबाने म्हटले होते की, “तुम्ही विश्र्वासाने आमच्याकडे यावे, भेट झाल्यावर आपला मोठा सत्कार करण्यात येईल आणि माघारी जाण्याविषयी निरोप दिला जाईल.” या पत्रावरून असे स्पष्ट दिसते की भेट झाल्यावर शिवाजीराजांना परत पाठविण्याचे आश्र्वासन औरंगजेबाने दिले होते परंतु औरंगजेबाच्या मनात नेमके काय आहे याबाबत स्वतः शिवाजीराजे साशंक होते. एकतर मुघलांच्या राजधानीत जाऊन भर दरबारात मुघल बादशहाची भेट घ्यावयाची म्हणजे शिवाजीराजांच्या दृष्टीने एक कसोटीचा प्रसंग. कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि कसल्याही प्रकारचा अवमान सहन करण्याची शिवाजीराजांची अजिबात तयारी नव्हती. त्यांचा तो स्वभावच नव्हता. म्हणून मुघल दरबारात भेटीच्या वेळी नेमके काय घडेल याविषयी ते साशंक होते. शिवाजीराजांच्या या आग्राभेटीकडे दक्षिणेतील लहानमोठ्या राज्यकर्त्यांचे, एवढेच नव्हे तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या पाश्र्चात्यांचेही लक्ष लागलेले होते कारण या भेटीनंतर दक्षिणेतील राजकारणाचे रंग बदल्याची दाट शक्यता होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा