मित्रांनो हजारो वर्ष निसर्गाचे वार झेलत सर्व सजीवसृष्टीवर छायेच्या रूपात आपले कृपाछत्र धरणार्या एखाद्या विशाल वृक्षाची सुरवातहि सुरावातीस एका छोट्याश्या बीजापासून होते. त्याचप्रमाणे पुढच्या हजारो पिढ्यांच्या हृद्यावर स्वत:ची मोहोर ऊमटवणार्या युगपुरूषाच्या चरित्राचे बीजहि ईतिहासात दडलेले असते आणि तसेहि " जेंव्हा जेंव्हा अनाचार , अधर्म माजतो तेंव्हा तेंव्हा मी अवतार घेतो ! " हे गीतेतील वचन सर्वांच्या परिचयाचे आहेच न मग आपल्या सर्वांचे मनोदैवत छत्रपती शिवराय तरी त्याला कसे अपवाद असणार म्हणून शिवचरित्र सुरू करण्याआधी जरा त्याआधीच्या ईतिहासात डोकावून पाहूया !
तेराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. उत्तरेमध्ये सुलतानशाही तेराव्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इ. स. १२९५ मध्ये दिल्लीचा सुलतान जलालउद्दीन खिलजीयांचा पुतण्या अल्लाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचे राजे रामदेवराव यादव यांचा पराभव करून रामदेवरावांस आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अल्लाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालउद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकाविली. खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इ. स. १३१७ मध्ये मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली त्यानंतर काही वर्षातच म्हणजे इ. स. १३२४ मध्ये दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. महंमद तघलकाच्या काळात दक्षिणेतील मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला. परंतु तघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही.
इ. स. १३४७ मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता. एकसंघी बहमनी राज्य सुमारे दिडशे वर्षे टिकून राहीले.याकाळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने (इ. स. १३३६ ते १५६५) बहामनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकवून धरली परंतु महाराष्ट्रात मात्र बहामनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहामानींची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते.अशा परिस्थितीत इ. स. १४९० च्या सुमारास एकसंघी बहमनी राज्याला तडा गेला आणि त्याची पाच शकले झाली. पाच स्वतंत्र शाही राजवटी प्रथापित झाल्या. निजामशाही (अहमदनगर), आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (गोवळकोंडा), बरीदशाही (बिदर) आणि इमादशाही (वऱ्हाड). दक्षिणेत एकसंघी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारुकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती. ही राजवट इ. स. १६०१ पर्यंत म्हणजे मुगलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून रहिली.
बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या पाच शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. ह्या संघर्षात इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इ. स. १५२६ मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजे लोदी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली, दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इ. स. १५१० मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली, पोर्तुगीजांनंतर पुढे डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या. आणि काही बंदरांवर घट्ट पकड निर्माण केली. अशाप्रकारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. इ. स. १५६५ मध्ये आणखी एक निर्णायक स्वरुपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालीकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने सोळाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटींपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इ. स. १६३६ मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहा बरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. हि घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतूबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या.
सामाजिक परिस्थिती :
सामाजिक परिस्थिती :
एकसंघी बहमनी साम्राज्याच्या कालखंडात (इ. स. १३४७ ते इ. स. १४९०) दक्षिणेतील, विशेषत: महाराष्ट्रातील समाजजीवन तेजोहीन बनले होते. क्षात्रवृत्तीच्या मराठ्यांना बहमनी राजवटीत कोणतेही राजकीय स्थान मिळू शकले नाही. फारसी भाषा ही राजदरबारी भाषा असल्यामुळे व्यवहारामध्ये तिचा उपयोग सुरु झाला. फारसीबरोबर दख्खनी, हिंदी व उर्दू भाषेचे महत्त्व वाढले. शिक्षणव्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य समाज निरक्षर राहिला या समाजामध्ये अज्ञान वाढले. अंधश्रद्धा वाढल्या. बहमनी राजवटीतील लोकांच्या धर्मश्रद्धा अत्यंत चिवट होत्या. चातुर्वर्ण्य, जाती, उपजाती, यांचे प्राबल्य सर्व समाजावर होते. जातीव्यवस्थेमुळेहिंदू समाज एकसंघी राहू शकला नाही . हलकी कामे करणाऱ्या जातींनी अस्पृश्य समजण्यात येऊ लगले. परिणामी हा समाज पूर्ण दरिद्री व अज्ञानी राहिला. स्पृश्य जातीकडून अस्पृश्य जातीवर अन्याय होत असे. त्यामुळे अस्पृश्यांचे जीवन अधिकच केविलवाणे झाले होते. जाती व्यवस्थेच्या या दुष्परिणामामुळे हिंदू धर्मियांचे संघटन होऊ शकले नाही. शस्त्र आणि शास्त्र यापासुन बहुजन समाज वंचित राहिला. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. बालविवाह, विषमविवाह, सतीची चाल, विधवांना उपेक्षित स्थान, निरक्षरता, पुरुषजातीचे वर्चस्व यामुळे स्त्रियांचे जीवन पराधीन झालेले होते. बहमनी राजवटीत महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन फारसे बदलले नाही. परंपरागत गावकीचे अधिकार पाटील-कुलकर्णी आणि देशमुख-देशपांडे यांच्याकडे अबाधीत राहिले होते. वतनदारांच्या दृष्टीने केवळ राज्यकर्ते बदलले होते, त्यांच्या अधिकारात कोणताही बदल झाला नव्हता. बहमनी राज्यकर्त्यांनी परंपरागत ग्रामीण जीवनात कसलाही हस्तक्षेप केला नाही. महसुल गोळा करण्याचे काम वतनदाराकडे ठेवणे त्यांना सोयीचे वाटले. प्रांताचे अधिकारी आणि वरिष्ठ अंमलदार ही पदे मात्र विश्वासातील मुसलमानाकडे राहतील याची खबरदारी बहमनी राज्यकर्त्यांनी घेतली. लष्करामध्ये स्थानिक हिंदुंना कसलेही स्थान नव्हते. एवढेच नव्हे तर दक्षिणेत स्थायिक झालेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये विशेष स्थान राहिले नाही. तुर्कस्थान, अरबस्थान, इराण या देशातून आलेल्या मुसलमानांना राजकारणामध्ये स्थान मिळू लागले आणि त्यातूनच पुढे परदेशी मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष पेटू लागला.बहमनी राज्यकर्त्याची महाराष्ट्रातील समाज जीवनावर घट्ट पकड असतांनाही, वारकरी संप्रदायाचे भक्ती मार्गातून समाज सुधारणा घडविण्याचे आणि समाज संघटन करण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. संत भानुदास, दामाजी, कान्होपात्रा, सेना न्हावी यांसारख्या संतानी ज्ञानेश्वर नामदेवापासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे चालू ठेवली. वारकरी संप्रदायाचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यामुळे साज्जीवनात स्थैर्य कायम राहिले. एकसंघी बहमनी राजवटीत सूफी पंथाचे अनेक साधू दक्षिण भारतात स्थायिक झाले. राजाश्रयाच्या आधाराने त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. परंतु हा प्रसार विशेषतः शहरी भागापुरता मर्यादित राहिला.
शाही राजवटीतील महाराष्ट्र :
शाही राजवटीतील महाराष्ट्र :
मागे सांगितल्याप्रमाणे पंधराव्या शतकाच्या अखेरीस एकसंघी बहमनी साम्राज्याची शकले होऊन पाच शाही राजवटी उदयाला आल्या त्या म्हणजे बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि अहमदनगरची निजामशाही. यापैकी दोन शाही राजवटी स्थानिक मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. उरलेल्या तीन राजवटी पैकी एक राजवट जॉर्जियामधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी आणि दोन राजवटी तुर्कस्थानमधून आलेल्या मुसलमान नेत्यांनी स्थापन केल्या होत्या. शेवटच्या दोन शाही राजवटीचे संस्थापक हे मूलतः हिंदू होते. आणि स्थानिक जनतेला त्यांचेविषयी आपुलकी वाटत होती. या पाचही राजवटीत आपापसात संघर्ष करीत राहिल्या आणि अशा या संघर्षमय कालात सोळाव्या शतकाच्या अखेरीस बलाढ्य मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केला. तेव्हा आपापसात लढणाऱ्या शाही राजवटींना आणखी एक बलाढ्य शत्रूशी लढा देणे क्रमप्राप्त झाले. आपापले सामर्थ्य वाढविण्यासाठी शाही राज्यकर्त्यांनी स्थानिक हिंदूंची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच महाराष्ट्रात मराठ्यांचा उदय झाला. शाही राज्यकर्त्यांच्या लष्करातही मराठ्यांना स्थान प्राप्त झाले. इ. स. १६२६ मध्ये आदिलशहाने बिदरची बरीदशाही खालसा केली. त्यापूर्वीच इ. स. १५७४ मध्ये मुर्तजा निजामशाह याने वऱ्हाडची इमादशाही नष्ट करून तो प्रदेश आपल्या राज्यास जोडला होता. अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारतात आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या तीन शाही राजवटी अस्तित्वात होत्या. मुघलांशी या राजवटींचे संघर्ष चालू होते. मराठ्यांच्या उदय आणि उत्कर्ष होण्यास ही परिस्थिती कारणीभूत ठरली.
मराठ्यांचा उदय :
मराठ्यांचा उदय :
बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदूंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच. मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदुंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते. ‘बुरहाने मासीर’ या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हू नरसी, साबाजी इत्यादी हिंदू व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकारपदे भूषविली होती असे दिसून येते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदुंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते. आदिलशाही प्रमाणे निजामशाहीतही मराठ्यांना लष्करात प्रवेश तर मिळालाच, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या. प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मुर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला. आदिलशाही मध्ये चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला. निजामशाही मध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो.
अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील सिंदखेड या गावाचे होते. देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते. त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीराजांची पत्नी आणि शिवाजीराजांची आई होय.
निजामशाहीध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याच्या संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्र्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ. स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष ‘राणा’ एवजी ‘राजा’ ही पदवी धारण करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यांस मिळाली. पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजींजवळ असल्यामुळे निजामशहाने त्यांना ही जहागिरी दिली असावी. बाबाजी हे चार-पाच गावांचे मोकदम आणि दोन गावांचे देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती निश्र्चितच चांगली होती. बाबाजींची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले. इ. स. १५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. बुऱ्हाण निजामशहाने या दोन्हीही भावांना दीड-दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला.
बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु झाले. मालिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिकंअबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हे मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये ते वास्तव्य करत होते. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यांनतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारले गेले. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांचा मुलगा शहाजी हे केवळ पाच-सहा वर्षाचे होते. मालोजींच्या मागे विठोजींनी १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्यांच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजींकडे आली. मालोजींच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून त्यांचे नाव दीपाबाई होते. त्यांना शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा