Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग पाचवा





उंबरखिंड :

शायिस्तेखान चाकणच्या विजयामुळे मोठ्या आनंदात होता. त्याचा हा आनंद आणखी एका कारणामुळे वृद्धिंगत झाला. मुघल सरदार कारतलबखान यास शायिस्तेखानाने मराठवाड्यातील परिंडा हा किल्ला जिंकण्यासाठी पाठविले होते. नोव्हेंबर १६६० मध्ये कारतलबखानाने परिंडा जिंकून घेतला आणि मोठ्या दिमाखाने हा विजय मिळवून तो शायिस्तेखानाकडे आला. पुणे परिसरात प्रभाव वाढविल्यानंतर शायिस्तेखानाची नजर कोकण भागाकडे वळेल याची शिवाजीराजांना खात्री होती आणि म्हणून कोकणच्या रक्षणासाठी शिवाजीराजांनी मोक्याच्या मार्गावर संरक्षण यंत्रणा उभारल्या. कारतलबखान परतल्यावर शायिस्तेखानाने त्याची पाठ थोपटली आणि त्याला कोकणच्या मोहिमेवर पाठविले. त्याच्या समवेत चव्हाण, गडे, कोकाटे, जाधव इ. मराठे सरदार तसेच माहूरचे देशमुख स्त्री रायबागीण ही देखील कारतलबखानाच्या स्वरीमध्ये सामील झाली. पराक्रमी स्त्री म्हणून रायबागीणचा नावलौकीक होता.
कारतलबखानाने घाटमाथा ओलांडून तळकोकणाकडे जाण्यासाठी नेहमीचा हमरस्ता स्वीकारला. या मार्गावर शिवाजीराजांचे अनेक किल्ले होते. एखाद्या किल्ल्यातून शिवाजीराजांच्या लोकांनी प्रतिकार केला तर तो सहज जिंकून घेता येईल अशी घमेंड कारतलबखानात होती. घाटमाथ्याहून जात असतांना लोहगड, तुंग, तिकोणा इत्यादी किल्ले ओलांडून मुघल फौज पुढे गेली. परंतु मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांतून कोणताही प्रतिकार झाला नाही तेव्हा मराठे आपल्याला घाबरले असा समाज करून घेऊन मोठ्या उन्मादाने कारतलबखान आंबेनळीच्या घाटापर्यंत पोहचला. आंबेनळीच्या घाटातून कोकणात उतरण्यासाठी घनदाट जंगलातून जावे लागते. या घनदाट अरण्यात मोघल फौज घुसताच चारी बाजूंनी हल्ला करण्याची योजना शिवाजीराजांनी आखली होती. या घनदाट अरण्यालाच उंबरखिंड या नावाने ओळखले जात होते. शिवभारतामध्ये परमानंदाने उंबरखिंडीच्या लढाईचे तपशिलवार वर्णन केलेले आहे. कारतलबखानाची फौज उंबरखिंडीत घुसल्यानंतर शिवाजीराजांच्या योजनेप्रमाणे मराठ्यांनी चारी बाजूंनी एकदम हल्ला चढविला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुघलांची दाणादाण उडाली. कारतलबखान व रायबागीण दोघेही नामोहरम झाले. दोघेही शिवाजीराजांना शरण आले. मुघल सरदाराकडून खंडण्या वसूल करून शिवाजीराजांनी सर्वांना पुण्याकडे परतवून लावले. अशाप्रकारे उंबरखिंडीच्या लढाईत मुघलांची फजिती झाली.इंग्रजांना धडा :
सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती. हे शल्य शिवाजीराजांच्या मनात डाचत होते. शिवाय विशालगडाजवळ पालवणचा राजा जसवंतसिंह दळवी आणि शृंगारपुरचा राजा सूर्यराव सुर्वे ह्यांनी शिवाजीराजांच्या मार्गात विघ्न आणले होते. त्याचा रागही शिवाजीराजांच्या मनामध्ये होता. उंबरखिंडीची लढाई झाल्यानंतर शिवाजीराजांनी थेट दक्षिण कोकणकडे कूच केली. संगमेश्र्वरच्या ठाण्यावर पिलाजी निळकंठराव आणि तानाजी मालुसरे यांना सूर्यराव सुर्वे याचा बंदोबस्त करण्यासाठी ठेवले. राजापूरला पोहचल्यानंतर शिवाजीराजांनी सर्व स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्र्चात्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करण्यास सुरुवात केली. इंग्रज व्यापाऱ्यांनी खंडणी देण्याची टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीस आलेला हेन्री रेव्हिंगटन हा त्या वेळी राजापूर येथे होता. शिवाजीराजांनी त्याला व आणखी ७ इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वखार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य शिवाजीराजांनी प्राप्त करून घेतले. कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडच्या किल्ल्यावर पाठविण्यात आले. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजीराजांच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट अॅण्ड्रयुज याने या इंग्रज कैद्यांना कळविले की तुम्ही शिवाजीराजांविरुद्ध जौहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. या सर्व इंग्रजांची मोठी दयनीय अवस्था झाली. दोघे तर कैदेतच मेले. बाकीच्यांची १६६३ च्या जानेवारीत सुटका झाली. शिवाजीराजांच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रजवखारवाले इतके धास्तवले की पुढे त्यांनी शिवाजीराजांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला.
राजापूरच्या इंग्रजांना धडा शिकवून शिवाजीराजे परत संगमेश्वराकडे आले. जसवंतसिंग दळवीला नामोहरम करून पालवणचे राज्य त्यांनी जिंकून घेतले. त्याचप्रमाणे सूर्यराव सुर्वे याचेही पारिपत्य केले. अशाप्रकारे आपल्या मार्गात विघ्न आणणाऱ्या मराठे सरदारांनाही शिवाजीराजांनी धडा शिकविला. शिवाजीराजांचा हा पराक्रम पाहून आदिलशहा एवढा नामोहरम झाला की मे १६६१ मध्ये त्याने मराठ्यांबरोबर मित्रत्वाचा तह केला. आता शायिस्तेखानाला धडा शिकविणे बाकी होते.


शायिस्तेखानाची फजिती :
उंबरखिंडीच्या लढाईत मोठा पराभव पाहून कारतलबखान पुण्यास परतला. त्या लढाईत मुघलांची तारांबळ उडालेली ऐकून शायिस्तेखानाचा राग अनावर झाला. आणखी काही मुघल सरदार त्याने शिवाजीराजांच्या पाठलागावर कोकणात पाठविले. त्यापैकी सरदार बुलाखी याने पेणजवळ असलेल्या देईरी गडास वेढा घातला. परंतु मराठा सरदारकावजी कोंढाळकर याने हा वेढा मोडून काढला. मे १६६२ मध्ये नामदारखान नावाच्या सरदारास शायिस्तेखानाने उत्तरकोकणच्या मोहिमेवर पाठविले. नामदारखान जेव्हा पेणजवळ येऊन पोहचला तेव्हा अचानकपणे शिवाजीराजांनी मिरे डोंगराच्या बाजूने त्याचेवर जबरदस्त हल्ला केला. तरीपण नामदारखानने आपला बचाव केला तेव्हा मोरोपंत पिंगळे व मोरो सोनदेव यांना नामदारखानाचा बिमोड करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठविले. परंतु नेमक्या याच सुमारास सिंहगडावर काही फंदफितुरी झाल्यामुळे या दोघांनाही सिंहगडकडे जाणे भाग पडले.इकडे पुण्यामध्ये शायिस्तेखानाने दहशत निर्माण केली होती. शिवाजीराजांचे लोक फोडण्यासाठी आणि किल्ले ताब्यात घेण्यासाठी लाचलुचपतीच्या मार्गाचा त्याने अवलंब सुरु केला होता. त्याचेच एक प्रतिक म्हणजे सिंहगडावर फंदफितुरी झाली होती. शायिस्तेखानाचा पुण्यातील मुक्काम शिवाजीराजांना धोकादायक वाटू लागला. काहीतरी विलक्षण साहस करून शायिस्तेखानाला पळवून लावायचे असे शिवाजीराजांनी ठरविले.
५ एप्रिल १६६३ रोजी मध्यरात्री निवडक लोक बरोबर घेऊन शिवाजीराजांनी अचानकपणे लाल महालात प्रवेश केला. ते दिवस रमजान महिन्याचे असल्यामुळे दिवसभराचा उपवास सोडून शायिस्तेखान, त्याच्या कुटुंबातील सर्व मंडळी, नोकरचाकर निद्राधीन झालेले होते. शिवाजीराजांनी लालमहालात म्हणजे आपल्याच वाड्यात प्रवेश केला होता. त्यांना वाड्याचे सर्व दरवाजे आणि दालने माहित होती. अंधारातून शिवाजीराजांची माणसे चालत असल्यामुळे त्यांची चाहूल शायिस्तेखानाच्या लोकांना लागली. मग एकच गडबड उडाली. सर्वजण जागे झाले. पळापळ सुरु झाली. स्वतः शायिस्तेखान याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती खानाची एका हाताची बोटे तुटण्यामध्ये झाली. जो तो जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळू लागला. काही जण  मराठ्यांच्या हल्ल्यात बळी पडले, काहीजण शिताफीने निसटले. बघता-बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमके काय झाले हे समजलेच नाही. शिवाजीराजांनी हल्ला केला हे समजल्यावर ‘गनिम कोठे आहे?’ अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी आणि  त्यांचे  लोकही ‘गनिम कोठे आहे?’ असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले. फजित झालेल्या शायिस्तेखानाने शेवटी आपल्या लोकांसह अहमदनगरची वाट पकडली. या संदर्भात शिवाजीराजांचे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नमूद केले आहे, ‘फते होऊन आलो. शास्ताखानास शास्त केली. पातशहाने नाव ठेविले परंतु नाव यथार्थ ठेविले नाही. ते नाव आपण शास्त करून नाव रुजू केले.’ पुण्याहून परतल्यावर शायिस्तेखान नगरलाही थांबला नाही. त्याने थेट दिल्लीचा रस्ता पकडला. औरंगजेबाला त्याच्या फजितीची हकिकत समजली होतीच. त्याने खानाला भेटण्यास नकार दिला आणि बंगालच्या सुभेदारीवर त्याची नेमणूक केली. शायिस्तेखानाच्या पराभवामुळे दक्षिणेत शिवाजीराजे एक बलाढ्य शत्रू निर्माण झाला याची औरंगजेबाला खात्री पटली. औरंगजेबाने शाहजादा मुअज्जम याला शायिस्तेखानाच्या जागी दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले.
विलक्षण साहस आणि अदभूत पराक्रम गाजवून आपल्या शत्रूंना चकित करावयाचे आणि स्वतः यशाच्या धुंदीत न राहता गोंधळून गेलेल्या शत्रूच्या प्रदेशात सतत हल्ले करावयाचे हे शिवाजीराजांचे खास तंत्र होते. शायिस्तेखान दिल्लीच्या रस्त्याला लागल्याबरोबरच शिवाजीराजांनी कोकणभागावर स्वारी केली आणि कुडाळ, वेंगुर्ला इ. ठाणी जिंकून घेतली.

सुरतेची पहिली लुट :
सुरत हे व्यापारी पेठ म्हणून सोळाव्या ते सतराव्या शतकात गाजलेले शहर होते. आर्थिक व्यवहारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतातील पेढीसंबंधीचेव्यवहार या शहरातून चालत असत. शिवाय मुघल साम्राज्यातील वाहतुकीचे बंदर या दृष्टीने सुरत प्रसिद्ध होते.त्यामुळे डच, इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्र्चात्यांच्या वखारी सुरत बंदरामध्ये होत्या. मुघलांच्या आश्रयामुळे हे पाश्र्चात्त्य वखारवाले उन्मत्तपणे वागत असत. या वखारवाल्यांना धडा शिकवला तर मुघलांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल आणि आपले महत्त्व त्यांना कळून चुकेल अशी शिवाजीराजांची अटकळ होती. शिवाय सुरतेसारख्या समृद्ध शहरावर हल्ला करून आपल्याला चांगल्यापैकी लूट मिळेल याचीही शिवाजीराजांना खात्री होती.
मुघल सुभेदार शायिस्तेखान फजित होऊन दिल्लीकडे परतल्यावर मुघल सरदार जसवंतसिंग याने आपली बहादूरी दर्शविण्यासाठी सिंहगडला वेढा घातला होता. जसवंतसिंगाच्या वेढ्याला कोणतीही किंमत न देता शिवाजीराजांनी अचानकपणे सुरतेवर हल्ला केला. हा अचानक झालेला हल्ला पाहून मुघल सेनेची दाणादाण उडाली. पाश्र्चात्य वखारवाले भयभयीत झाले आणि सधन पेढीवाले आपली मालमत्ता कडेकोट बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. ६ जानेवारी ते १० जानेवारी १६६४ असे तब्बल ४ दिवस सुरत शहर शिवाजीराजांच्या ताब्यात होते. या स्वारीमध्ये शिवाजीराजांनी प्रचंड लुट केली.
शिवाजीराजांनी केलेल्या लुटीची तपशीलवार माहिती समकालीन डच व इंग्रज यांच्या पत्रातून आढळते. या लुटीला इंग्रज प्रतिनिधी अॅटनी स्मिथ याने थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मराठ्यांनी त्याला पकडले आणि ३०० रुपये दंड घेऊन त्याची मुक्तता केली. शिवाजीराजांच्या सुरतेवरील हल्ल्यामुळे नेमके कोणते नुकसान झाले याचा अंदाज समकालीन साधनांवरून येतो. पाश्र्चात्य वखारवाल्यांचे नेमके किती नुकसान झाले हे पाहण्यासारखे आहे. डच कंपनीचे नुकसान सुमारे २०,००० रुपये झाले. तर इंग्रज कंपनीचे नुकसान केवळ १००० पौंड झाले. हे आकडे लक्षात घेतल्यास परकीय वखारवाल्यांनी शिवाजीराजांनी केलेल्या लुटीचा वृत्तांत देतांना किती कांगावा केला होता हे लक्षात येते. चार दिवस शहरामध्ये मुक्काम ठोकून १० जानेवारी १६६४ रोजी शिवाजीराजे स्वराज्याकडे परतले. परत जातांना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात सापडतो.
शिवाजीराजांच्या स्वारीच्या संदर्भात वखारवाल्यांनी बराच मनोरंजक मजकूर लिहून ठेवला आहे. शिवाजीराजांच्या लष्करी तळाविषयी डचांनी लिहिले आहे की, “शिवाजीराजे सुरतेबाहेर दोन कोसांवर उतरले होते. त्यांचाच फक्त शामियाना होता. इतर सर्व अधिकारी उघड्यावर रहात होते. ”शिवाजीराजांची छावणी अत्यंत सुटसुटीत व तात्पुरती असून लष्करातील लोकांपेक्षाही मजूर, बैल आणि रिकामे घोडे यांचा भरणा अधिक आहे अशी नोंद डचांनी केलेली आढळते. शिवाजीराजांनी सुरतेची लुट केली त्यावेळी औरंगजेब दिल्लीला नव्हता हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.


सुरतेच्या लुटीचे परिणाम :
औरंगजेब ज्यावेळी दिल्लीला परतला त्यावेळी त्याला सुरतेच्या लुटीची हकिकत समजली. सुरतेवर आपली सत्ता असतांना शिवाजीराजांनी आपले शहर लुटावे आणि आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या पाश्र्चात्त्य वखारवाल्यांना उपद्रव द्यावा याचा विलक्षण संताप औरंगजेबाला झाला. सुरत शहराला तटबंदी बांधण्याचा त्याने हुकुम दिला. पाश्र्चात्यव्यापारांना एक वर्षाची जकात औरंगजेबाने माफ केली. शिवाय पुढील वर्षापासून अडीच टक्के जकाती ऐवजी दोन टक्के, जकात घेतली जाईल असा हुकुमही त्याने काढला. इंग्रज वखारवाल्यांनी तर शिवाजीराजांची फार मोठी दहशत घेतली. आपली मुख्य व्यापारी पेठ सुरतेहून मुंबईला हलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १६६४ मध्येच पोर्तुगीजांकडून मुंबई बेट इंग्रजांना मिळाले होते. मुंबईला कचेरी हलविल्यानंतर शिवाजीराजांकडून आपल्याला संरक्षण मिळेल असा इंग्रजांचा कयास होता. शिवाजीराजांनी अलौकिक साहस करून शीघ्र गतीने सुरतेवर हल्ला केला, लूट केली आणि तितक्याच शीघ्र गतीने ते स्वराज्याला परतले. या घटनेचा पाश्र्चात्य वखारीतील सर्वसामान्य कामगारावरही मोठा परिणाम झाला. शिवाजीराजांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. ‘शिवाजीराजांचे शरीर हवामय असून त्यांना पंखही आहेत’ असा अदभूत उल्लेख एका पत्रात आलेला आढळतो. थोडक्यात मुघल प्रदेशात सर्वसामान्य अधिकारीही भयभीत झाले. मुघल प्रदेशात दहशत निर्माण करण्याचा शिवाजीराजांचा हेतू तडीस गेला.
५ फेब्रुवारी १६६४ रोजी शिवाजीराजे रायगडावर परतले. कर्नाटकात शहाजीराजांचा हुद्देगिरी येथे घोड्यावरून पडल्यामुळे २३ जानेवारी १६६४ रोजी मृत्यू झाला होता. शिवाजीराजे रायगडावर पोहचले त्यावेळी राजमाता जिजाबाई सती जाण्याच्या तयारीत होत्या. परंतु शिवाजीराजांनी सती जाण्यापासून राजमातेला परावृत्त केले.


खवासखानाचा बंदोबस्त :
शिवाजीराजांचे मुघलांबरोबर संघर्ष चालू असताना आदिलशाही सरदारांनी कोकण भागात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सरदारांना मुघलांची फूस होती. कुडाळच्या लखम सावंताला शिवाजीराजांवर सूड उगवून आपले राज्य ताब्यात घ्यावयाचे होते. लहान मोठ्या चकमकी घडू लागल्या. प्रथम बचावात्मक भूमिका घेऊन मराठ्यांनी लखम सावंतशी तह केला आणि कुडाळची सत्ता त्याला दिली. विजापूरकरांनीकेवळ मुघलांना खुश करण्यासाठी कोकणातल्या चढाईचा देखावा केला होता परंतु शिवाजीराजांबरोबर लढण्याची विजापूर दरबारची मनापासून इच्छाच नव्हती. पण अचानकपणे १६६४ मध्ये विजापूरकरांच्या धोरणात बदल झाला. शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी खवासखान नावाच्या सरदाराची विजापुरकरांनी नेमणूक केली. त्याच्या समवेत बाजी घोरपडे, लखम सावंत, खेम सावंत हे मराठे सरदारही मोठ्या तयारीनिशी निघाले. खवासखानाबरोबर बाजी घोरपडे येत आहे हे समजताच शिवाजीराजांचा संताप अनावर झाला. याच बाजी घोरपड्याने शहाजीराजांना बेड्या घालून विजापूर दरबारात हजार केले होते. शिवाय लखम सावंतने पुन्हा दगा दिला याचीही शिवाजीराजांना चीड आली होती. ऑक्टोबर १६६४ मध्ये स्वतः कोकणची स्वारी काढून शिवाजीराजांनी वेंगुर्ला आणि कुडाळ या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर थेट मुधोळपर्यंत धडक मारली. बाजी घोरपड्याबरोबर निकराचे युद्ध केले. त्या युद्धात बाजी मारला गेला. त्याचा मुलगा मालोजी शिवाजीराजांना शरण आला. मुधोळचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाला. या गोष्टीचा राग येऊन खवासखानाने प्रचंड तयारीनिशी शिवाजीराजांवर स्वारी केली. परंतु मराठ्यांनी आदिलशाही फौजेची एवढी दाणादाण उडवली की खवासखानाला पळून जावे लागले. त्यानंतर फोंड्यापर्यंत स्वारी करून खेम सावंताला ही शिवाजीराजांनी चांगला धडा शिकविला. शिवाजीराजे फोंड्यापर्यंत आलेला पाहून पोर्तुगीजांनी आपल्या बचावासाठी नजराणा पाठवून शिवाजीराजांशी स्नेह जोडला.


शिवाजीराजांची पहिली आरमारी स्वारी :
आदिलशहा आणि मुघल यांच्याबरोबर सतत लढाया चालू असताना शिवाजीराजांनी आपले आरमारी सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष दिले होते. एखादी आरमारी स्वारी काढून समुद्रातील आपल्या शत्रूंना भयचकित करावे आणि आपल्या आरमारी सामर्थ्याची चुणूक दाखवावी अशी शिवाजीराजांची इच्छा होती. आदिलशाही सरदारांचा बंदोबस्त केल्यानंतर ८ फेब्रुवारी १६६५ रोजी ८५ जहाजे आणि ३ मोठी गलबते घेऊन शिवाजीराजांनी आपली पहिली आरमारी स्वारी काढली. शिवाजीराजांच्या स्वारीला पोर्तुगीजांकडून कोणताही अडथळा आला नाही. मालवणहून त्यांनी मोहीम सुरु केली ते थेट कर्नाटकातील बसनूर या बंदरापर्यंत शिवाजीराजांनी मजल मारली. बसनूरला पोहचल्यावर ते बंदर मराठ्यांनी यथेच्छ लुटले. बसनूर नंतर गोकर्ण अंकोला या मार्गाने शिवाजीराजे स्वराज्याकडे परतले. शिवाजीराजांच्या या आरमारी स्वारीने पश्र्चिम किनाऱ्यावरही शिवाजीराजांचे वर्चस्व वाढू लागले. सिद्दी, इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज या सर्वांनाच शिवाजीराजांचे भय वाटू लागले. थोडक्यात १६६५ हे कोकण विजयाचे आणि किनारपट्टीच्या विजयाचे वर्ष ठरले. तिकडे दिल्लीत औरंगजेब बादशहा अतिशय अस्वस्थ झाला होता. शायिस्तेखानाप्रमाणे जसवंतसिंग पराभूत होऊन परतला होता. तेव्हा शिवाजीराजांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने मिर्झाराजे जयसिंग याला प्रचंड फौज देऊन दक्षिणेत पाठविण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा