Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग बारावा




या पहिल्या संघर्षानंतर सिद्दी आणि मराठे यांच्यामधील वैमनस्य वाढत चालले. कोकणामध्ये दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून लहान मोठया चकमकी घडू लागल्या. या चकमकीचे उल्लेख बखरीमधून आणि समकालीन साधनांमधून आढळत जरी असले तरी याचा नेमका कालखंड समजू शकत नाही, सिद्धीचे उपद्व्याप वाढल्यानंतर शिवाजी महाराजांनी रघुनाथपंथ बल्लाळ यांना कोकणामध्ये पाठविले. त्यांनी कोकणातील मोक्याचे किल्ले घेऊन दंडाराजपुरीवर वर्चस्व निर्माण केले आणि तेथून जंजिऱ्याच्या किल्ल्यावर तोफांचा भडीमार सुरु केला. तेव्हा सिद्दी शरण आले आणि त्यांनी पंतांबरोबर तह केला. हा तह नेमका केव्हा झाला आणि तहाचा तपशील काय होता याची माहिती मिळू शकत नाही. हा तह झाल्यावर काही काळ सिद्दीकडून मराठयांना कोणताच उपद्रव झाला नाही. परंतु लवकरच सिद्दींनी आपले सामर्थ्य एकवटले. दरम्यान रघुनाथ बल्लाळचा मृत्यू झाल्यामुळे कोकणातल्या प्रदेशावर मराठयांची पकड काही प्रमाणात सैल झाली. त्याचा फायदा घेऊन सिद्दींनी मराठयांच्या प्रदेशावर हल्ले सुरु केले. सिद्दींचा वाढता उपद्रव पाहून शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो याला सिद्दींचे पारिपत्य करण्यास पाठविले. कोकणात शिरून व्यंकोजी दत्तोने सिद्दींबरोबर युद्ध सुरु केले. या युद्धात अनेक हबशी मारले गेले. खुद्द व्यंकोजी दत्तोने पराक्रमाची शर्थ केली. युद्धात त्याला अनेक जखमा झाल्या. सिद्दींनी शेवटी माघार घेऊन तहाची बोलणी सुरु केली. परंतु सिद्दींची कायमची खोडकी मोडल्याशिवाय तह करावयाचा नाही असा निर्धार महाराजांनी केला होता. सिद्दींचे मुख्य म्हणजे जंजिरा, हा किल्ला जिंकून घेतल्यावर सिद्दींचे सामर्थ्य पूर्णतः खच्ची होईल अशी शिवाजी महाराजांची खात्री होती. म्हणून सिद्दीशी पहिला संघर्ष झाला तेव्हापासून जंजिरा जिंकण्याचे शिवाजी महाराजांचा प्रयत्न चालू होते. आग्ऱ्याहून परत आल्यानंतर सिद्दींचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोकणात हालचाली सुरु केल्या. १६६९ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी दंडाराजपुरी हे ठिकाण मराठयांनी वर्चस्वाखाली आणले आणि तेथून जंजिऱ्यावर हल्ला करण्याची तयारी केली. ऑक्टोबर १६६९ मध्ये मराठयांनी सिद्दींची रसद तोडून अक्षरशः कोंडी केली. सिद्दीच्या सैनिकांची उपासमार सुरु झाली. तरीपण सिद्दींनी माघार घेतली नाही उलट मुघलांकडून शिवाजी महाराजांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मध्येच सिद्दी प्रमुखाने एक शक्कल लढविली. मुंबईकर इंग्रजांनी दंडाराजपुरी विकत घ्यावी म्हणून त्याने निकराचे प्रयत्न केले. पण शिवाजी महाराजांशी वैर करण्याची अजिबात इच्छा नसल्याने इंग्रजांनी सिद्दी प्रमुखांच्या या प्रस्तावास मान्यता दिली नाही. मुघल आणि आदिलशहा या दोघांकडूनही सिद्दींना मदत मिळेनासी झाली. अशाप्रकारे सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर सिद्दी प्रमुख फत्तेखान याने जंजिरा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात देण्याचा निश्चय केला. त्याने तहाची बोलणी सुरु केली. जंजीरा किल्ल्याच्या मोबदल्यात मोठी जहागिरी देण्याचे शिवाजी महाराजांनी आमिष दाखविले. परंतु जंजिऱ्यातच अंतर्गत वाद निर्माण होऊन फत्तेखानाविरुद्ध बंड झाले.
फत्तेखान शिवाजी महाराजांबरोबर तह करीत आहे ही कल्पना तीन प्रमुख सिद्दी सरदारांना अजिबात मान्य नव्हती. हे तीन सरदार म्हणजे सिद्दी संबूळ, सिद्दी कासीम आणि सिद्दी खैरियात. या तिन्ही सरदारांनी फत्तेखानाला विरोध तर केलाच, पण त्याला कैद करून जंजिऱ्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. सिद्दी संबुळ हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला. मुघल सरदार औरंगजेबानेही त्याला तातडीने मान्यता दिली आणि शिवाजी महाराजांविरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले. जंजिऱ्याची पूर्ण सत्ता हाती आल्यावर आक्रमक धोरण स्वीकारून दंडाराजपूरी मराठयांकडून परत घेण्याचा सिद्दी संबूळने निश्चय केला.
फेब्रुवारी १६७१ मध्ये दंडाराजपुरी येथे होळीचा उत्सव चालू होता. या उत्सवामध्ये मराठे दंग होते. ही संधी साधून सिद्दी संबूळ याने दंडाराजपुरीवर हल्ला करण्याचे ठरविले. सिद्दी खैरियत जमिनीच्या मार्गाने तर सिद्दी कासीम समुद्रमार्गाने दंडाराजपुरी किल्ल्याजवळ पोहचले. मराठे बेसावध असताना त्यांनी अचानक हल्ला केला. मराठयांनी आपला बचाव करण्याचा शर्थीने प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. शेवटी दंडाराजपुरी सिद्दींनी ताब्यात घेतली. दंडाराजपुरी सिद्दींकडे गेल्यामुळे जंजिऱ्यावर हल्ला करण्याची कल्पना काही काळ शिवाजी महाराजांना सोडून द्यावी लागली. सिद्दींनी दंडाराजपुरी घेतल्यावर औरंगजेबाने सढळ हाताने सिद्दींना मदत सुरु केली. त्यांचे आरमारी सामर्थ्य वाढावे म्हणून ३६ जहाजे दिली. या सुमारास मराठयांचेही आरमारी सामर्थ्य वाढू लागले. सिद्दी संबूळने मराठयांच्या आरमारावर हल्ले सुरु केले. त्यातून सिद्दी व मराठे यांच्यामध्ये आरमारी लढाया सुरु झाल्या. विशेष  विशेष म्हणजे इंग्रजांनी शिवाजी महाराजांविरुद्ध सिद्दींना मदत सुरु केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबूळने सातवली नदीत असलेल्या मराठयांच्या आरमारावर जोरदार हल्ला केला. त्यावेळी दौलतखान हा मराठयांचा आरमारप्रमुख होता. त्याने मोठा पराक्रम गाजवून सिद्दींचा हल्ला परतावून लावला. स्वतः दौलतखान व सिद्दी संबूळ दोघेही जखमी झाले. मराठयांनी आपल्या आरमाराचा बचाव केला. सिद्दी विरोधी लढा देण्यात आपले लोक कमी पडणार नाही हे ओळखून १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर हल्ला करण्याची पुन्हा तयारी केली. ५७ जहाजांचे जंगी आरमार घेऊन शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याला वेढा घातला. परंतु किल्ल्यावरून तोफांचा जबरदस्त मारा करून आणि समुद्रातून लढाऊ जहाजांच्या सहाय्याने हल्ला करून सिद्दी संबूळने शिवाजी महाराजांचा वेढा मोडून काढला. जंजिरा जिंकणे हे शिवाजी महाराजांचे एक स्वप्न होते. पण ते साकार होण्याची चिन्हे दिसेनात. पुढील वर्षी म्हणजे १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना १०,००० फौज घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी पाठविले. किल्ल्याला वेढा देऊन मोरोपंतांनी तोफांचा भडीमार सुरु केला. या प्रसंगी लाय पाटील नावाचा एका सामान्य मराठयाने रात्रीतून किल्ल्याचा तट चढून जाण्यासाठी शिड्या लावण्याची करामत केली. परंतु ऐनवेळी ही योजना फसली. मराठे तटापर्यंत चढू शकले नाहीत. मुघलांकडून ऐनवेळी सिद्दीना कुमक मिळाली आणि मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. त्यानंतरही दौलतखानाला पाठवून जंजिरा जिंकण्याचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. शेवटी शिवाजी महाराजांचे हे स्वप्न अपुरेच राहिले.


खांदेरी-उंदेरी :
१६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली तेव्हा सिद्दी संबूळने शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्याने सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उदभवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरु केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरु केला. मराठयांचा आरमार प्रमुख दौलतखान याने २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखानाला माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठयांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखानाचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठयांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला.


पोर्तुगीज आणि शिवाजी महाराज :
पोर्तुगिजांनी गोव्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवाय कोकणातील वसई हे मोक्याचे केंद्र ही त्यांच्या ताब्यात होते. आधुनिक सुसज्ज आरमार पोर्तुगिजांकडे असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यांवर त्यांचे वर्चस्व होते. मुघलांनी पोर्तुगिजांच्या समुद्र वर्चस्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली होती. शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी प्रारंभी पोर्तुगिजांचीच मदत घेतली होती. परंतु जेव्हा शिवाजी महाराजांचे आरमार तुल्यबळ होऊ लागले, तेव्हा पोर्तुगिजांना शिवाजी महाराजांच्या हेतूविषयी शंका वाटू लागली. आपले लहानसे राज्य सुरक्षित राखण्यासाठी एतद्देशीय राज्यकर्त्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे पोर्तुगिजांचे धोरण होते. त्यामुळे कधी-कधी त्यांना दुटप्पी वर्तन करावे लागे. मुघल आणि आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध असताना पोर्तुगिजांनी शिवाजी महाराजांबरोबरही वरकरणी मित्रत्वाचे संबंध जोडले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या शत्रूंना आपल्या प्रदेशात आश्रय देऊन त्यांना मराठयाच्या विरुद्ध चिथावणे शिवाजी महाराजांविरुद्ध अप्रत्यक्षपणे सिद्दींना मदत करणे, त्यांना शस्त्रात्रे पुरविणे यासारख्या कारवाया पोर्तुगीज करीत असत. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी दंडाराजपुरीस वेढा घातला होता, त्यावेळी पोर्तुगिजांनी धान्य आणि दारुगोळा यांची मदत सिद्दींना केली. पोर्तुगिजांच्या या दुटप्पी धोरणाचा शिवाजी महाराजांना चांगलाच अनुभव आलेला होता. मुळातच विदेशी व्यापाऱ्याविषयी मुळातच विदेशी व्यापाऱ्याविषयी शिवाजी महाराजांचे मत प्रतिकूल होते. संधी येताच हे विदेशी व्यापारी ताब्यात आलेल्या प्रदेशावर घट्ट पाय रोवून बसतील आणि पुढे कोणत्याही परिस्थितीत हाती आलेले ठाणे सोडणार नाही अशी शिवाजी महाराजांची धारणा होती. त्यामुळे पोर्तुगिजांवर शिवाजी महाराजांचा अजिबात विश्वास नव्हता तरीपण प्रसंगी पोर्तुगीजांना चुचकारून त्यांची मदत घेण्याचे राजकारणही शिवाजी महाराजांना करावे लागत असे आणि म्हणून त्यांनी पोर्तुगीजांशी उघड शत्रुत्व कधीच स्वीकारले नाही. सुरतेची लुट, स्वराज्यात आणतांना पोर्तुगिजांनी शिवाजी महाराजांना अप्रत्यक्ष मदत केली. १६६६ मध्ये जेव्हा शिवाजी महाराज आग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आले तेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि सिझर यांच्याबरोबर केली होती आणि शिवाजी महाराजांचे मनःपूर्वक अभिनंदन केले होते. वरकरणी मैत्रीचा देखावा चालू असतांना शिवाजी महाराजांच्या विरोधकांना आश्रय देण्याचे धोरणही पोर्तुगिजांनी अंगिकारले होते. लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू इत्यादींना आश्रय देऊन शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास पोर्तुगीज त्यांना उत्तेजन देत होते. या गोष्टीची शिवाजी महाराजांना विलक्षण चीड आली होती. शिवाय बारदेश भागातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्नही पोर्तुगीज करीत होते. त्याचाही शिवाजी महाराजांना अतिशय राग आलेला होता. म्हणून नोव्हेंबर १६६७ मध्ये शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली. या स्वारीमध्ये मराठयांनी बारदेशमधील अनेक गावे लुटली. लखम सावंत, केशव नाईक वगैरे सुरक्षित ठिकाणी पळून गेले. पोर्तुगिजांनी पराभव कबूल करून शिवाजी महाराजांशी तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंत आणि केशव नाईक यांना पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे या दोन्ही देसायांना गोव्याबाहेर हाकलून देण्यात आले.एक धाडसी योजना :
प्रत्यक्ष गोव्यामध्येच उठाव करून पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचा शिवाजी महाराजांनी निश्चय केला. नोव्हेंबर १६६८ मध्ये सुमारे चार-पाचशे लोक शिवाजी महाराजांनी गोव्यात पाठवून दिले त्यानंतरही आणखी काही लोक पाठविले. ही संख्या बरीच वाढल्यानंतर या लोकांनी अचानकपणे गोव्यात उठाव करावा आणि पोर्तुगिजांची सत्ता उध्वस्त करावी अशी योजना शिवाजी महाराजांनी आखली होती. परंतु शिवाजी महाराजांच्या या योजनेचा सुगावा गोव्याच्या व्हाइसरॉयला लागला. त्याने बारकाईने तपास करून शिवाजी महाराजांचे लोक शोधून काढले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या वकिलाला भर दरबारात बोलावून त्याची नालस्ती केली आणि त्याला हाकलून दिले. शिवाजी महाराजांच्या सर्व लोकांनाही गोव्याबाहेर काढून दिले. अशाप्रकारे ही धाडसी योजना फसली. त्यानंतरही प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी करण्याचा शिवाजी महाराजांचा मानस होता. परंतु मुघलांबरोबर संघर्ष चालू असल्यामुळे त्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले आणि फेब्रुवारी १६७० मध्ये पोर्तुगिजांशी सलोख्याचा तह केला.
फेब्रुवारी १६७० मध्ये सलोख्याचा तह झाल्यानंतर काही काळ पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात कोणताही तणाव नव्हता पण १६७४ मध्ये एका विशिष्ट घटनेमुळे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तणाव निर्माण झाला. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी रामनगरच्या कोळी राजावर स्वारी करून त्याचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले. हा रामनगरचा कोळी राजा दमण भागात पोर्तुगिजांकडून चौथाई घेत होता. तो हक्क आपल्याला मिळावा म्हणून पोर्तुगिजांकडून शिवाजी महाराजांनी मागणी केली. नाईलाजाने पोर्तुगिजांनी हा अधिकार मान्य केला. पण १६६९ मध्ये रामनगरच्या राजाने आपला गेलेला प्रदेश मराठयांकडून जिंकून घेतला. तेव्हा पोर्तुगीजांनी दमण मधील चौथाईचे हक्क रामनगरच्या राजाला दिले. तेव्हापासून शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. हा तणाव पुन्हा संपलाच नाही. शिवाजी महाराजांची भिती पोर्तुगिजांना शेवटपर्यंत वाटत होती. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर पोर्तुगीज व्हाइसरॉयने लिहून ठेवले की, ‘हे राज्य आता काळजातून मुक्त झाले. युद्धापेक्षा शांततेच्या प्रसंगी शिवाजी महाराज अधिक भितीदायक होते.’ वाक्यावरून पोर्तुगीज शिवाजी महाराजांची दहशत बाळगून कसे होते याची चांगली कल्पना येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा