Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग तिसरा






शिवरायांचा उदय
शिवाजीराजांचा जन्म :
फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी – शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजांचा जन्म झाला. जेधे शकावलीत म्हटल्याप्रमाणे ‘शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुन वद्य तृतिया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले.’
शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ. स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथींच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.
इ. स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरु झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६ मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६ च्या अखेरीस शहाजीराजांना शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये वाटून देण्यात आला. शहाजीराजांनी आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि ते कर्नाटकात निघून गेले. पुणे जहागीरीची देखरेख करण्यासाठी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजीराजे जरी कर्नाटकात गेले तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ. स. १६४१ च्या सुमारास शिवाजीराजे आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीराजांकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीराजांनी शामराज नीलकंठ यांची शिवाजीराजांचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित यांना मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीराजांच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजीराजे जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे.
शिवाजीराजांचे शिक्षण :
क्षत्रियाच्या मुलास आवश्यक ते शिक्षण शिवाजीराजांस स्वाभाविकपणे मिळाले. अश्र्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण शिवाजीराजांस बालपणी मिळाले. परंतु शिवाजीराजांस लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. आद्य इतिहासकार, ग्रँट डफ याने शिवाजीराजांस अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे. ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकार शिवाजीराजे हे अकबर, हैदअरली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होते असे मत व्यक्त केलेले आहे. शिवाजीराजांच्या हस्ताक्षराचा कागद प्रत्यक्षात सापडलेला नसला तरी शिवाजीराजांना निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे. कारण शिवाजीराजांना लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात. फॅक्टरी रेकॉर्डमध्ये शिवाजीराजांना अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे आणि पुत्र संभाजीराजे हे दोघेही संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’ ‘करण कौस्तुभ’ यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले. शिवभारतकार परमानंद हे तर प्रत्यक्ष शिवाजीराजांच्या दरबारात होते. या साऱ्या पर्श्र्वभूमीवर शिवाजीराजांना निरक्षर ठरविणे हे निश्र्चितपणे अन्यायकारक आहे. शिवभारतमध्ये शिवाजीराजे लीपिग्रहानायोग्य वयाचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे. शिवभारतातील नवव्या अध्यायातील उल्लेखावरून शिवाजीराजे साक्षर होते हे स्पष्ट होते. ९१ कलमी बखरीमध्ये शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे दादोजी कोंडदेवांनी चिरंजीवास म्हणजे शिवाजीराजांस शहाणे केले असा उल्लेख आहे. हा एकच पुरावा शिवाजीराजांच्या साक्षरतेची खात्री पटविण्यास पुरेसा आहे.बारा मावळांवर प्रभुत्व :इ. स. १६४०-४१ मध्ये
बारा मावळांवर प्रभुत्व :इ. स. १६४०-४१ मध्ये शिवाजीराजे आणि राजमाता जिजाबाई शहाजीराजांच्या बोलावण्यावरून बंगलोरला गेले होते. तेथेच निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्याशी शिवाजीराजांचा विवाह झाला. त्यानंतर इ. स. १६४२ मध्ये जिजाबाई व शिवाजीराजे पुण्यास परतले. वर सांगितल्याप्रमाणे त्यांचेबरोबर शामराज निळकंठ, सोनोपंत डबीर वगैरे मंडळी तैनातीसाठी होते. पुण्यास आल्यानंतर शिवाजीराजांच्या कर्तृत्वाला प्रारंभ झाला. या सुमारास शिवाजीराजांचे वय केवळ १२ वर्षांचे होते. दादोजी कोंडदेवांच्या अनुभवाचा लाभ घेऊन या १२ वर्षांच्या मुलाने पुण्याच्या परिसरातील १२ मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले. सभासदाने असे म्हटले आहे की ‘पुण्यास येताच शिवाजीराजांनी १२ मावळे जिंकले’. वास्तविक पाहता हा १२ मावळांचा प्रदेश शहाजीराजांच्या मूळ जहागिरीमध्ये नव्हता. शहाजी महाराजांच्या जहागिरीत इंदापूर, पुणे सुपे, व चाकण एवढे चार परागणे होते. हा मुलूख म्हणजे आजचे इंदापूर, भीमथडी, दौंड, पुरंदर, हवेली हे तालुके आणि भीमेच्या दक्षिणेकडील खेड तालुक्याचा पूर्वभाग यातला मुलूख. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मावळत्या बाजूस डोंगराळ प्रदेश होता. आजचे मुळशी, वेल्हे आणि भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुके व वाई हा सातारा जिल्ह्यातील प्रदेश शहाजीराजांच्या मुळच्या जहागिरीत नव्हते. परंतु दादोजी कोंडदेवांच्या सुभेदारीमध्ये होते. हा प्रदेश मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. त्यातील बारा मावळे म्हणजे अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कोरबारसे मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, गुंजन मावळे, कानद खोरे, वेळवंड खोरे, हिरडस मावळ व रोहिड खोरे. दादोजी कोंडदेव सुभेदार या नात्याने मावळ प्रदेशाची व्यवस्था पहात असत. दादोजींनी शेतकऱ्यांना अभयदान दिले. लावणी-संचणीची उत्कृष्ट व्यवस्था केली. चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मावळ भागातील देशमुखांशी ममतेने वागून त्यांना आपलेसे केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या देशमुखांना कडक शासने केली. अशाप्रकारे मावळ प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्याचे कार्य दादोजी कोंडदेवांनी केले. या काळात बाल शिवाजीराजे दादोजीं बरोबर मावळच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात फिरत होते. या परिसराची अचूक माहिती या काळातच शिवाजीराजांना झाली.  स्वराज्य कार्यास प्रारंभ :१७ एप्रिल रोजी शिवाजीराजांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यांस लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे. परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात. शिवाय शिवाजीराजांच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित १६४५ पासून शिवाजीराजांच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजीराजांचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते.


 शिवरायांचा उदय
स्वराज्य कार्यास प्रारंभ :१७ एप्रिल रोजी शिवाजीराजांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यांस लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे. परंतु राजवाड्यांसारखे  इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात. शिवाय शिवाजीराजांच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित १६४५ पासून शिवाजीराजांच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजीराजांचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते.
प्रतिपच्चंद लेखेव वर्धिष्णुर्विश्र्ववंदिता ||
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||
पत्राच्या अखेरीस ‘मर्यादेंय विराजते’ ही दुसरी मुद्रा दिसून येते.
शिवाजीराजांची उपरोक्त मुद्रा म्हणजे त्यांच्या स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष आहे. अस्सल पुराव्यांची छाननी केल्यास १६४७ पासून शिवाजीराजांनी स्वराज्यकार्य द्रुतगतीने सुरु केलेले आढळते. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजीराजांच्या जहागीरीची संपूर्ण जबाबदारी शिवाजीराजांवर आली. स्वतंत्र वृत्तीच्या शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकीत केले. १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले शिवाजीराजांनी ताब्यात घेतले. १६४७ च्या दिवाळीत पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. याचवर्षी पुण्याच्या हवालदार आणि सिंहगडचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून शिवाजीराजांनी कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. अशाप्रकारे केवळ एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे चार महत्वाचे किल्ले शिवाजीराजांनी ताब्यात घेतले.
शिवाजीराजांचे किल्ले घेण्याचे धोरण आदिलशहास मोठे भयप्रद वाटले. शिवाजीराजांच्या या हालचालीला शहजीराजांची फूस आहे असा संशयही आदिलशहाला आला. तेव्हा आदिलशहाने मुस्ताफा खान व बाजी घोरपडे यांना कर्नाटकात पाठवून शहाजीराजांना कैद केले. आणि त्यानंतर अफजलखानाने शहाजीराजांना पायात बेड्या घालून विजापूरला आणले. शहाजीराजांना पकडल्यानंतर आदिलशहाने शिवाजीराजांविरुद्ध फत्तेखान या सरदारास पाठविले. शिवाजीराजे पुरंदरच्या किल्ल्यावर असल्याचे समजताच फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला. पण शिवाजीराजांच्या मावळ्यांनी असा प्रखर प्रतिकार केला कि फत्तेखानाला पळून जावे लागले. आदिलशहाने शहाजीराजांचा थोरला पुत्र संभाजीराजे यांचेविरुद्धही फऱ्हादखान आणि तानाजी दुरे यांना पाठविले होते. पण हे दोघेही अपयश पदरात घेऊन परत आले. या पराभवामुळे आदिलशहा अधिकच संतप्त झाला. शहाजीराजांना किती दिवस अटकेत ठेवावे हा प्रश्नही आदिलशहानपुढे होता. कारण आदिलशाहीतील मराठा सरदारांमध्ये असंतोष वाढू लागला होता. तेव्हा शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजे व संभाजीराजे यांच्यावर दडपण आणून महत्त्वाचे किल्ले परत मिळवावेत आणि आपली प्रतिष्ठा सांभाळावी असा विचार आदिलशहाने केला. त्याप्रमाणे कोंढाणा, बंगळूर व कंदर्पी हे ३ किल्ले शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी आपल्या ताब्यात द्यावेत म्हणजे शहजीराजांची सुटका करण्यात येईल अशी अट त्याने घातली हे ३ किल्ले ताब्यात घेतल्यावर शिवाजीराजे आणि शहाजीराजे या दोघांच्याही हालचालीवर नियंत्रण करता येईल अशी आदिलशहाची अटकळ होती. शहजीराजांची सुटका महत्त्वपूर्ण असल्यामुळे शिवाजीराजे आणि संभाजीराजेंनी हे तिनही किल्ले आदिलशहास दिले. त्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांची सुटका केली. सुटकेनंतर कर्नाटकात येऊन शहाजीराजांनी पुन्हा आपला दबदबा निर्माण केला.  शिवाजी महाराजांनाही कोंढाणा गेल्याचे विशेष दु:ख झाले नाही. कारण पुरंदरसारखा महत्त्वाचा किल्ला अद्याप शिवाजीराजांच्या ताब्यात होता. तूर्त आदिलशहाच्या वाटेस न जाता जनतेवर जुलूम करणाऱ्या उन्मत्त मराठा सरदारांना वठणीवर आणण्याचे धोरण शिवाजीराजांनी स्विकारले आणि त्याप्रमाणे आपला मोहरा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे वळविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा