राज्याभिषेकाचे प्रयोजन :
शिवाजीराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची कोणतीही घोषणा केली नव्हती. १६३६ मध्ये आदिलशहाची नोकरी पत्करून शहाजीराजे जेव्हा कर्नाटकाकडे गेले त्यावेळी पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी बालशिवाजीराजांकडे सोपविला होता. या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली. शिवाजीराजांच्या जहागिरीचा म्हणजे राज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल शिवाजीराजांच्या हेतूविषयी साशंक झाले. शिवाजीराजे केवळ जहागिरीचा विस्तार करीत नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहे याची खात्री १६६५ पर्यंत मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, पुर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली. विशेषतः औरंगजेबाला शिवाजीराजांचा हेतू धोकादायक असल्याचे लक्षात आले आणि म्हणून मिर्झाराजे जयसिंगाला पाठवून त्याने शिवाजीराजांचे राज्यच नष्टप्राय करण्याची योजना आखली. ती यशस्वी झाली नाही, तेव्हा शिवाजीराजांना उत्तरेत बोलावून घेऊन त्यांना कैदेत टाकण्याचा डाव औरंगजेबाने साधला. पण त्यातूनही शिवाजीराजे सहीसलामत निसटले आणि दक्षिणेत परत येऊन त्यांनी आपल्या राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलासहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला. पाश्चात्य वखारवाल्यांना नामोहरम केले. आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्वेध झाले आहे अशी खात्री पटल्यावर शिवाजीराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य स्थापन करणे शिवाजीराजांना आवश्यक होते. मोठया चतुराईने आणि कौशल्याने, तसेच अप्रतिम पराक्रमाने, प्रसंगी जीवघेणे धाडस करून किंवा जीवाची बाजी लावून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली होती. या कार्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद मिळवून देशावरील व कोकणातील देसाई, देशमुखांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनाही स्वराज्यकार्यात सहभागी करून घेतले. आपल्या राज्यातील रयतेला सुखी करण्यासाठी संकल्प शिवाजीराजांनी सोडला होता. परकीयांच्या राज्यात, विशेषतः मुघलांच्या राज्यात गोरगरीब जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची विटंबना होत होती आणि सज्जन साधुसंतांची अवहेलना होत होती. हा सर्व अन्याय निपटून काढण्यासाठी शिवाजीराजांनी स्वराज्य उभारण्याचा खटाटोप केलेला होता. आता हे राज्य स्थिर झाल्यामुळे भावी काळात राज्याचा वारस निश्चित होण्यासाठी शिवाजीराजांना स्वतंत्र म्हणून जाहिर करून घेणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग शिवाजी महाराजांपुढे होता.
राजमाता जिजाबाई आणि शिवाजीराजांचे सर्व सहकारी यासर्वांना मिळून मराठा राजवंश स्थापन करण्यासाठी शिवाजीराजांना राज्याभिषेक करवून घेण्यासाठी उद्युक्त केले असावे. मराठा साम्राज्याच्या छोटया बखरीमध्ये म्हटले आहे की, ‘महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणेन छत्र सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदयजाहला’ राज्याभिषेक करून घेण्यामागे शिवाजीराजांचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वतंत्र राजा म्हणून त्यांना अभिषेकने मान्यता मिळणार होती आणि त्यानंतर त्यांच्या शत्रूंनाही त्यांना राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाय जे अन्य शाही दरबारात नोकरीला होते ते मराठे सरदार शिवाजीराजांना आपल्या बरोबरीचे किंवा कमीप्रतीचे मानत असत. अभिषेकानंतर त्यांनाही शिवाजीराजांना स्वतंत्र राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाजीराजांचा दुसरा उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील वतने, इनामे, वृत्ती देण्याचा अधिकार त्यांना अभिषेकाने प्राप्त होणार होता. शिवाय मध्ययुगीन राज्याप्रशासन पद्धतीप्रमाणे शिवाजीराजांचे राज्यही वंशपरंपरेने चालणार होते. राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर किल्ले रायगड हे ठिकाण राजधानीसाठी शिवाजीराजांनी निवडले. हिरोजी इंदुलकर या स्थापत्यविशारदाकडे रायगडावर राजमहाल, राण्यांचे व राजपुत्रांचे महाल, मंत्र्यांचे वाडे आणि इतर इमारती बांधण्याचे काम दिले. या मोठया इमारतींशिवाय पाण्यासाठी प्रशस्त तलाव, लहानमोठया अधिकाऱ्यांसाठी घरे, बाजारपेठ, दारूची कोठारे, गजशाळा, अंबरखाना इत्यादी इमारती उभारून राजधानीचे वैभव वाढविण्यात आले. त्याचप्रमाणे जगदिश्वराचे मंदिर शिवाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे हिरोजी इंदुलकरांनी उभारले. अशाप्रकारे राजधानी सजविली. राज्याभिषेकाचा मुहूर्त गागाभट्टांनी काढला. ‘राज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘तुलापुरुषदानविधी’ या दोन पोथ्या गागाभट्टांनी मुद्दाम तयार केल्या. १६७४ च्या प्रारंभी राजधानी रायगडावर राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरु झाली.
काही दुर्दैवी घटना :
राज्याभिषेकाची तयारी चालू असताना काही दुर्दैवी आणि दुःखद घटना घडल्या. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजर मारले गेले. शिवाजीराजांना त्यामुळे विलक्षण दुःख झाले. आपले शब्द प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतापरावांनी प्राणाची आहुती दिली हे शिवाजीराजांच्या मनास फार लागले. या दुःखातून सावरतो न सावरतो तोच शिवाजीराजांना आणखी एका शोककारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. १६ मार्च १६७४ रोजी शिवाजी महाराजांची एक पत्नी काशीबाई ह्यांचा रायगडावर मृत्यू झाला. अशा या घटनांमुळे शिवाजीराजांची मनःस्थिती विचलित झाली. परंतु राज्याभिषेकाचा विधी चातुर्मास सुरु होण्यापूर्वी होणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ५-६ महिने अभिषेकाला मुहूर्त नव्हता. शेवटी जेष्ठ शुद्ध १३ शके १५९६ हा दिवस राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यात आला. तिथी निश्चित झाल्यावर समारंभाची तयारी जलद गतीने सुरु झाली. एप्रिल १६७४ मध्ये कर्नाटकाची स्वारी उरकून शिवाजीराजे रायगडला परतले. त्यासुमारास राज्याभिषेकाची कडेकोट तयारी झाली होती. या भव्य दिव्य प्रसंगाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून शिवाजीराजांनी सीमेवरील सैनिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. मे १६७४ मध्ये शिवाजीराजांनी पुन्हा एकदा चिपळूणच्या लष्करी तळाची पहाणी केली. रायगडावरील समारंभ निर्वेध पार पडण्यासाठी लष्करी तळाची पाहणी केली. रायगडावरील समारंभ निर्वेध पार पडण्यासाठी चिपळूणच्या लष्करी तळाकडे महत्त्वाची जबाबदारी होती. यथासांग तयारी झाल्यानंतर १९ मे १६७४ रोजी शिवाजीराजे प्रतापगडावर गेले आणि आपली कुलदेवता तुळजाभवानी हिचे दर्शन घेऊन तिचे आशिर्वाद मागितले. तुळजादेवीला सोन्याचे छत्र विधीपूर्वक अर्पण केले. त्यानंतर २१ मे रोजी शिवाजीराजे रायगडला परतले.
राज्याभिषेक सोहळा :
२९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. अभिषेक होण्यापूर्वी शिवाजीराजांचा व्रतबंध होणे आवश्यक होते. म्हणून २९ मे रोजी शुक्रवारी शिवाजीराजांची मुंज करण्यात आली. प्रायश्चित विधी म्हणून तुलापुरुषदान करण्यात आले. डच कागदपत्रांमध्ये या तुलादानाविषयी माहिती आढळते. शिवाजीराजांचे वजन १७,००० पगोडे म्हणजे सुमारे १६० पौंड भरले असा उल्लेख डचांनी केलेला आहे. शिवाजीराजांची प्रथम सुवर्णतुला करण्यात आली. त्यानंतर चांदीची व तांब्याचीही तुला करण्यात आली. मौल्यवान धातूंच्या तुला संपल्यानंतर विविधप्रकारची फळे, साखर इत्यादींचीही तुला करण्यात आली. अशाप्रकारे हा तुलापुरुषदानविधी मोठया उत्साहाने पार पडला. या समारंभासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे ११,००० लोक रायगडवर उपस्थित झाले होते. अशी माहिती डच रेकॉर्डमध्ये मिळते.
३० मे शनिवार रोजी शिवाजीराजांचे समंत्रक विवाह झाले. २९ला मुंज झाल्यामुळे पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. त्यामुळे ३० तारखेस शिवाजीराजांना स्त्रियांशी पुन्हा विवाह करावे लागले. हेन्ऱी ऑक्झिंडेन हा इंग्रज प्रतिनिधी या प्रसंगी रायगडावर हजर होता. त्याला या धार्मिक विधीचा नीटसा अर्थ न कळल्यामुळे शिवाजीराजांनी राज्याभिषेकापूर्वी काही स्त्रियांशी विवाह केले असे त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेले आढळते. त्यामुळे अनेक इतिहासकारांचाही गैरसमज झालेला होता. समंत्रक विवाहप्रसंगी पट्टराणी म्हणून शिवाजीराजांनी सोयराबाई ह्यांना स्थान दिले. या विधीमुळे अभिषेकासाठी लागणारे सर्व हक्क शिवाजीराजे व राणी सोयराबाई यांना धर्मशास्त्रपद्धतीने प्राप्त झाले.३१ मे रोजी रविवार होता. ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त यादिवशी होता. त्यासाठी अग्निप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा करण्यात आली आणि अनुषंगिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. सोमवारी १ जून १६७४ रोजी ग्रहयज्ञ करण्यात आला. त्याचप्रमाणे नक्षत्रहोम हा विधीही करण्यात आला. २ जून रोजी म्हणजे मंगळवारी कोणताही मुहूर्त नसल्यामुळे कसलाही विधी यादिवशी झाला नाही. बुधवारी नक्षत्रयज्ञ करण्यात आला. ४ जूनला म्हणजे गुरुवारी रात्री निऋतियाग यज्ञ झाला. त्याप्रसंगी मांस, मत्स्य आणि मदिरा यांची आहुती देण्यात आली. त्यानंतर शिवाजीराजे व राणी सोयराबाई स्नान करून पुण्याहवाचनासाठी बसले.
शुक्रवार ५ जून हा राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी मोठया थाटामाटात पार पडला. शिवाजीराजे सिंहासनावर बसले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व आणि अलौकिक असा दिवस उजाडला. शिवाजी राजे झाले आणि केवळ महाराष्ट्र नव्हे तर सारा भारतखंड धन्य झाला. या समारंभाचे वर्णन सभासदाने आपल्या बखरीत करून ठेवले आहे. “....सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर-थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलशप्राती अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळींस नमस्कार करून सिंहासनावर बसले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती झाला. हि गोष्ट काही सामान्य झाली नाही.”
शिवाजीराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी इंग्रज प्रतिनिधी हेन्ऱी ऑक्झिंडेन हा रायगडावर हजर होता, त्याने आपल्या रोजनिशीमध्ये राज्याभिषेक समारंभाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला, गडाचा मार्ग याविषयी त्याने नोंद करून ठेवली आहे. ६ जून रोजी झालेल्या समारंभाविषयी तो लिहितो, ‘या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाला. संभाजी राजे पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राम्हण सिंहासनाखाली एका ओट्यावर बसले होते.’ सिंहासनाचे वर्णन करताना तो लिहितो, ‘सिंहासनाच्या दोन्ही बाजूंस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला २ मोठी मोठया दाताच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.’ या शुभचिन्हांचा अनेक प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केलेला आढळतो. साधारणपणे असे मानले जाते की मत्स्यचिन्ह हे समुद्रवर्चस्वाचे प्रतिक आहे. अश्वपुच्छ हे सर्वांगसज्ज अशा अश्वदलाचे प्रतिक आहे आणि तराजू हे निःपक्षपाती न्यायव्यवस्थेचे प्रतिक आहे. या ३ प्रतिकांवरून शिवाजी महाराजांचे सामर्थ्य तर स्पष्ट होतेच पण त्याचबरोबर जनतेला न्याय देण्यासाठी आपण सिंहासनरूढ आहोत याची जाणीवही शिवाजीराजांनी तराजूच्या चिन्हाद्वारे करून दिली.
राज्यारोहणप्रसंगी शिवाजी महाराजांनी नव शक किंवा कालगणना सुरु केली. या शकाला ‘राज्याभिषेक शक’ किंवा ‘राजशक’ असेही म्हणतात. मध्ययुगातील शककर्ता राजा म्हणून शिवाजीराजांचा गौरवाने उल्लेख केला जातो. ही कालगणना शिवाजीराजांचे सार्वभौमत्व सूचित करणारी आहे. शिवाजीराजे सिंहासनावर बसले आणि नवे युग सुरु झाले. म्हणून या प्रसंगी महाराजांनी शिवराई होन हे सोन्याचे नाणे पाडले. तसेच शिवराई म्हणून तांब्याचे नाणेही पाडले. या नाण्यावर ‘श्री राजा शिवछत्रपति’ अशी अक्षरे कोरलेली आढळतात. राज्याभिषेक झाला त्या घटकेपासून शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपति’ हे नवे बिरूद धारण केले शिवाजी महाराजांना केवळ नवे राज्य स्थापन करावयाचे नव्हते तर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे ‘नूतन सृष्टी निर्माण करावयाची होती.’ शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर मराठी शब्द जवळजवळ हद्दपार झालेले होते. व्यवहारातही मोठया प्रमाणात उर्दूमिश्रित मराठी भाषा प्रचारामध्ये आलेली होती. अशाप्रकारे मराठी भाषा, संस्कृती यांना अवकळा प्राप्त झालेली होती. संस्कृत भाषा समजेनाशी झाली होती. आपल्या राज्यातील हे मरगळलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विविध प्रकारच्या योजना कार्यवाहित आणण्याचा निश्चय केला. परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी रघुनाथ पंडीत या विद्वानास ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची आज्ञा शिवाजीराजांनी दिली. परंपरागत पंचांगपद्धतीमध्ये कालपरत्वे अनेक दोष शिरलेले होते. ते दूर करण्यासाठी ‘करणकौत्सुभ’ नावाचा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा शिवाजीराजांनी कृष्ण ज्योतिषी यांना केली. या प्रसंगी शिवाजीराजांनी मुलकी, लष्करी त्याचप्रमाणे धर्मविषयक नवे कायदे केले. त्यांना ‘प्रशस्ती’ असे म्हणत. राजकीय पत्रव्यवहार कसा करावा या पद्धतीला ‘लेखनप्रशस्ती’ असे म्हणत. शिवाजीराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांना नवी लेखनप्रशस्ती तयार करण्यास सांगितली आणि राजकीय पत्रव्यवहारामध्ये मराठी शब्दांचे प्रमाण अधिकाधिक वाढावे म्हणून या प्रशास्तीमध्ये अनेक प्रकारचे मराठी तर्जुमे करण्यास सांगितले. बाळाजी आवजी चिटणीस यांची लेखनप्रशस्ती अद्यापही उपलब्ध नाही. परंतु त्यांनी तयार केलेले फुटकळ तर्जुमे पहावयास मिळतात. त्यावरून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी कसा केला याची माहिती मिळते.
राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानमंडळाची रचना केली. मंत्र्यांच्या आपल्या मंडळाला अष्टप्रधानमंडळ असे नामाभिधान करण्यात आले. हा भव्य राज्याभिषेक समारंभ पहाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक साधुपुरुष, संन्यासी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम असे विविध प्रकारचे उपासक जमलेले होते. त्यांना यशोचित दान देण्यात आले.
नवे युग सुरु झाले :
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७व्या शतकामध्ये जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्वात नव्हती. दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील प्रबळ मुघल सत्तेलाही आव्हान केले. पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनीही नामोहरम केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम मराठा राज्य उदयास आणले याची ग्वाही दिली. या घटनेमुळे शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाल्या. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता-पहाता बहरले, कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रुपांतर मराठा साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शिवराज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे. एका वाक्यात सांगावयाचे झाले तर ‘शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.’
दुसरा राज्याभिषेक :
राज्याभिषेकाचा मोठा सोहळा पार पडल्यानंतर काही तंत्रमार्गी ब्राह्मणांच्या आणि साधूंच्या आग्रहामुळे शिवाजीराजांना दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती इतर कोणत्याही साधनात उपलब्ध नाही. जेष्ठ महिन्यात झालेल्या मोठया अभिषेकानंतर शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने आश्विन शुद्ध पंचमी २४ सप्टेंबर १६७४ रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरुपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘गागाभट्टांनी केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजरांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, शिवाजी महाराजांची पत्नी काशीबाई ह्यांचा मृत्यू तसेच राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाबाई ह्यांचा झालेला मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असे अनुमान निघते की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधीपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मनात असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांना पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. गागाभट्टांच्या अभिषेकाने काही तांत्रिक चुका दर्शविल्या. त्यामुळे दुर्दैवी घटना घडत आहेत असा निष्कर्ष या पुरोहितांनी काढला असावा. धार्मिक विधीविषयी अशा प्रकारचे मतभेद नसावेत म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेकाला मान्यता दिली असली पाहिजे. त्याचप्रमाणे २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. परंतु या राज्याभिषेकाचा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्य वखारवाल्यांनी किंवा फारसी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाचा ओझारताही उल्लेख केलेला आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वसनीय अशा सभासद बखरीमध्ये किंवा ९१ कलमी बखरींतही या दुसऱ्या राज्याभिषेकाचे वर्णन नाही. शिवचरित्रातील अनेक घटना अचूक पद्धतीने जेधे शकावलीमध्ये नोंदविलेल्या आढळतात. त्यातही या दुसऱ्या राज्याभिषेकाची तिथी दिलेली नाही किंवा ओझरता उल्लेखही नाही. थोडक्यात हा दुसरा राज्याभिषेक तंत्रमार्गी पुरोहितांच्या समाधानासाठी शिवाजी महाराजांनी करवून घेतला ही गोष्ट स्पष्ट होते. आपल्या मुलाने- शिवाजीराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून आपले राज्य हे सार्वभौम राज्य आहे हे सिद्ध केले या गोष्टीचा सर्वात मोठा आनंद राजमाता जिजाबाईंना होणे साहजिक आहे. या सुमारास जिजामातेचे वय ७० च्या घरात होते. आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर या माऊलीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही. राज्याभिषेकानंतर केवळ १२च दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा पाचाड येथे रहात्या घरी मृत्यू झाला. या शोककारक घटनेमुळे रायगडवरील उत्साहाचे वातावरण संपुष्टात झाले. संभाजी राजांची मुंज पुढे ढकलण्यात आली.
राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर शिवाजी महाराजांनी मातृवियोगामुळे दुःख झाले. पण थोर पुरुषाला आपले मन घट्ट करून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि आपण स्वतंत्र, सार्वभौम राजे आहोत असे जाहीर केले ही गोष्ट महराजांच्या शत्रूंना सहन होण्यासारखी नव्हती. मुघल आदिलशहा आणि इतर शत्रूंनी महाराजांविरोधी कारवाया सुरु केल्या. अर्थात या गोष्टींची शिवाजी महाराजांना कल्पना होतीच. म्हणून १६७४च्या भर पावसाळ्यात त्यांनी आपल्या शत्रूविरुद्ध मोहिमा आखण्यास प्रारंभ केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा