Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवचरित्र भाग आठवा




आग्र्याहून परत आल्यावर :
शिवाजीराजे आग्र्याहून परत राजगडला आल्याचे वर्तमान नोव्हेंबर १६६६ च्या अखेरीस सर्वत्र पसरले. शिवाजीराजांच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली. विजापूर दरबारात मोठी खळबळ माजली. वखारवाले इंग्रजांचे धाबे दणाणले. शिवाजीराजांच्या सुटकेचा सर्वात मोठा धक्का दक्षिणेत असलेल्या मिर्झाराजे जयसिंगाला बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की तो आजारी पडला आणि त्यातच २८ ऑगस्ट १६६७ रोजी बऱ्हाणपूर येथे त्याचा मृत्यू झाला. बऱ्हाणपूर येथे तापी नदीचे काठी मिर्झाराजे जयसिंग यांची भव्य समाधी बांधलेली आजही दिसते.
शिवाजीराजे आग्र्याला अडकून पडले असताना त्यांचे लहानसहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेतून सुटले हे समजल्यावर त्यांच्या बहुतेक शत्रूंनी आपले धोरण बदलले. सप्टेंबर १६६६ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तुमजमा याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. त्याने बहलोलखान या सरदाराला मराठ्यांविरुद्ध पाठविण्याचे ठरविले. शिवाजीराजांचा सावत्रभाऊ व्यंकोजी राजे बहलोलखानच्या मदतीला धावून आला आणि त्या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जबरदस्त प्रतिकारामुळे त्यांना यश आले नाही मराठे आपल्याला दाद देत नाहीत, आणि आता तर प्रत्यक्ष शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आले आहेत, हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून शिवाजीराजांशी सलोखा करण्याचे ठरविले. दरसाल दोन लाख होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने शिवाजीराजांशी तह केला. कुतुबशहा हा तर प्रथमपासून सावध होता. शिवाजीराजांशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून शिवाजीराजांशी मैत्रीचा तह केला आणि दरसाल पाच लाख होन खंडणी देण्याचे काबुल केले. यावरून आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजीराजांचा दरारा केवढा निर्माण झाला होता याची कल्पना येते. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी मैत्रीचे तह झाल्यावर मुघालांशिवाय कोणी मोठा शत्रू शिवाजीराजांना उरला नाही. पोर्तुगीज आणि इतर पाश्र्चात्त्य वखारवाले अधून मधून शिवाजीराजांच्या वाटेला जात होते. त्याशिवाय जंजिऱ्याचे सिद्दी हे समुद्रावर सत्ता गाजवत असल्याने त्यांचे आव्हानही शिवाजीराजांसमोर होते. सिद्दी काय, पोर्तुगीज काय किंवा पाश्र्चात्त्य वखारवाले काय, यांना कह्यात आणायचे असेल तर आपले स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार उभारणे आवश्यक आहे, हे शिवाजीराजांनी ओळखले होते.


आरमाराची उभारणी :
जावळीचे खोरे जिंकल्यानंतर रायगडासारखा दुर्गम किल्ला शिवाजीराजांच्या ताब्यात आला आणि त्यांच्या राज्याची सरहद्द समुद्रापर्यंत जाऊन भिडली. इ. स. १६५७ मध्ये कल्याण, भिवंडी जिंकल्यानंतर किनारपट्टीतील आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वतंत्र आरमार उभारले पाहिजे याची जाणिव शिवाजीराजांना झाली होती आणि म्हणून इ. स. १६५७ मध्येच आरमार बांधणीस त्यांनी सुरुवात केली. पोर्तुगीज पत्रव्यवहारावरून असे दिसते की आरमार उभारण्यामध्ये प्रारंभीच्या कालात पोर्तुगीज तंत्रज्ञांनी शिवाजीराजांना मदत केली होती. १६५७ ते १६५९ या दरम्यान शिवाजीराजांनी २० जहाजे तयार केली. १६५९ मध्ये अफझलखानाचा वध झाल्यानंतर किनारपट्टीचा आणखी प्रदेश शिवाजीराजांना मिळाला. इ. स. १६६४ मध्ये चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रावरून शिवाजीराजांचे आरमारी सामर्थ्य बरेच वाढले होते असे दिसते. शिवाजीराजांची राजनीती अशी होती की, किनारपट्टीचा जेवढा-जेवढा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली येईल, तेवढ्या प्रमाणात आरमारी सामर्थ्यामध्ये वाढ झाली पाहिजे असा त्याचा हिशेब होता. आपल्या आरमारी सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी शिवाजीराजांनी इ. स. १६६५ मध्ये बसनूरची स्वारी काढली आणि त्यात ते यशस्वी झाले. थोडक्यात जयसिंगाची स्वारी होण्यापूर्वी आणि शिवाजीराजांची आग्राभेट होण्यापूर्वी मराठ्यांचे आरमार चांगलेच आकाराला आले होते.आग्र्याहून परत आल्यानंतर आरमारी सामर्थ्य अधिक बळकट करण्याचा निर्णय शिवाजीराजांनी घेतला. १६६७ मध्ये शिवाजीराजांनी आपले आरमारी सामर्थ्य एवढे वाढविले की गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरांना एका पत्रात ‘शिवाजीचे आरमार आता भीतीदायक वाटते. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजीने आरमार तर वाढविलेच पण किनाऱ्यावर किल्लेही बांधले.’ असे म्हटलेले आढळते. वरकरणी मात्र पोर्तुगिजांनी शिवाजीराजांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले होते. आग्र्याहून शिवाजीराजे सुखरूप परत आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गोवेकरांनी एक खास वकीलही पाठविला होता. परंतु अंत:स्थपणे पोर्तुगिजांच्या शिवाजीराजांविरुद्ध कारवाया चालू होत्या.


पोर्तुगिजांच्या कारवाया :
शिवाजीराजांनी आरमारी सामर्थ्य वाढविल्यामुळे पोर्तुगिजांना शिवाजीराजांच्या हेतूविषयी संशय वाटू लागला होता. विशेषतः शिवाजीराजांनी सुरत लुटल्यानंतर पोर्तुगिजांना अधिक काळजी वाटू लागली होती. सुरतेची लुट स्वराज्यात आणताना शिवाजीराजांना पोर्तुगिजांनी मदत केली होती, असा निष्कर्ष पोर्तुगीज दप्तरातील पत्रव्यवहारावरून निघतो. शिवाजीराजांच्या सामर्थ्याला पोर्तुगीज वचकून होते. पण त्याचबरोबर शिवाजीराजांची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याची भितीही त्यांना वाटत होती. म्हणूनच वरकरणी पोर्तुगिजांनी शिवाजीराजांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि, शिवाजीराजांच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे हे दुटप्पी वर्तन शिवाजीराजे ओळखून होते. कुडाळचे देसाई शिवाजीराजांना विरोध करण्यामध्ये आघाडीवर होते. वास्तविक पाहाता कुडाळचा लखम सावंत याचा पराभव करून शिवाजीराजांनी त्याला चांगलाच धडा शिकविला होता. त्याने शिवाजीराजांबरोबर तह करून अभयदान मिळविले होते. परंतु शिवाजीराजे आग्र्याकडे गेल्यानंतर लखम सावंताने आपल्या कारवाया पुन्हा सुरु केल्या. विशेषतः पोर्तुगिजांची फूस असल्यामुळे लखम सावंत शिवाजीराजांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास उद्द्युक्त झाला. आग्र्याहून परतल्यानंतर लखम सावंतचे उद्योग आणि पोर्तुगिजांच्या कारवाया शिवाजीराजांच्या लक्षात आल्या. तेव्हा लखम सावंतला धडा शिकविण्यापेक्षा पोर्तुगिजांनाच धडा शिकवावा असे शिवाजीराजांनी ठरविले त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७ च्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगिजांच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून शिवाजीराजांनी पोर्तुगिजांना नामोहरम केले. शिवाजीराजांचा प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आणि प्रतिकार जर केला तर शिवाजीराजे थेट गोव्यापर्यंत येऊ शकतील अशी भिती पोर्तुगिजांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी शिवाजीराजांबरोबर तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंतला पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा आणि कुतुबशहानंतर पोर्तुगिजांनीही शिवाजीराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले.

मुअज्जमची भूमिका :
दक्षिणेचा मुघल सुभेदार म्हणून शाहजादा मुअज्जम मे १६६७ मध्ये औरंगाबादला रुजू झाला. आग्र्याहून सुटका करून शिवाजीराजे दक्षिणेत परत आल्यावर. मुघलांच्या राजकारणात फरक घडून येऊ लागला. शिवाजीराजे आता निसटलेच आहेत, तेव्हा ह्यांच्याशी वैर करण्यापेक्षा शक्यतो समझोता करावा असे खुद्द औरंगजेबाला वाटू लागले होते. विशेषतः मिर्झाराजे जयसिंग मृत्यू पावल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेचे राजकारण आक्रमक स्वरूपाचे करून चालणार नाही असे वाटू लागले. शाहजादा मुअज्जम हा स्वतः ऐषआरामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजीराजांशी लढा देण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे असे त्याचे मत होते. शिवाय संभाजीराजेंना मनसबीच्या जाळ्यात पकडून काही कुरघोडी करता येईल का या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले. संभाजीराजेंना पुन्हा मनसब द्यावी म्हणून त्याने औरंगजेबाचीही परवानगी मिळवली आणि त्याप्रमाणे नोव्हेंबर १६६७ मध्ये संभाजीराजेंना औरंगाबादेला बोलाविले मुअज्जमने समारंभपूर्वक संभाजीराजेंना मनसबदारी बहाल केली. संभाजीराजे वयाने लहान असल्यामुळे त्यांच्यातर्फे मन्सबीची जबाबदारी निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर यांनी सांभाळावी असेही ठरले. अशा प्रकारे मराठ्यांशी सख्य जोडण्यचा उपक्रम मुअज्जमने सुरु केला होता. परंतु दिल्लीत औरंगजेबाला मुअज्जमच्याच हेतूविषयी शंका वाटू लागली. मराठ्यांच्या मायाजालात मुअज्जम जर फसला तर दक्षिणेतील राजकारणाचा धागा तुटून जाईल अशी भीती औरंगजेबाला वाटू लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीराजे निघून गेल्यामुळे तो अत्यंत बेचैन झाला होता. सूड म्हणून हिंदू जमातीवर जिझिया कर बसविण्याचे त्याने ठरविले. वास्तविक पहाता हा जाचक कर अकबराने विचारपूर्वक बंद केला होता. परंतु औरंगजेबाने मात्र हेतुपुरस्सर हिंदुंवर जिझिया कर बसविला. शिवाजीराजे त्यामुळे उव्दिग्न होतील अशी औरंगजेबाची अपेक्षा होती. गरीब सामान्य हिंदू रयतेवरती हा जुलमी कर बादशहाने बसविला ही गोष्ट शिवाजीराजांच्या मनाला क्लेशदायक वाटली. त्यांनी औरंगजेबाला लिहिलेले फारसी भाषेतील एक पत्र उपलब्ध आहे या पत्रावरून शिवाजीराजांच्या उदार धार्मिक धोरणाविषयी आणि त्यांच्या थोरपणाविषयी कल्पना येते. त्यांनी या पत्रात उल्लेख केला आहे की, ‘हिंदू आणि मुसलमान हे दोनही परमेश्वराची लेकरे आहेत. मंदिरामध्ये हिंदू घंटानाद करतात, तर मशिदीमध्ये मुसलमान ईश्वराला बांग देतात. सृष्टी हे परमेश्वराने निर्माण केलेले एक सुंदर चित्र आहे.’ अशा आशयाचा मजकूर लिहून शिवाजीराजांनी औरंगजेबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने मात्र आपली भूमिका अधिक ताठर करून सुरतेच्या हिंदू व्यापाऱ्यांवर अधिक जकात बसविली. हिंदुंना डिवचण्यासाठी १६६९ च्या सुमारास काशी येथील देवालय औरंगजेबाने पाडले. आणि त्या ठिकाणी मशिद उभारली. अशा प्रकारच्या औरंगजेबाच्या ताठर धोरणामुळे उत्तर भातात सर्वसामान्य हिंदूंमध्ये अस्वस्थता पसरली. सुरतेमधील जवळ-जवळ ८००० हिंदू बादशहाकडे दाद मागण्यासाठी दिल्लीकडे गेले, असा उल्लेख एका समकालीन पत्रामध्ये आढळतो.
दक्षिणेत दहशत निर्माण करण्यासाठी औरंगजेबाने मुअज्जमला असे कळविले की, प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी या दोघांनाही कैद करावे. मुअज्जमला मात्र बादशहाच्या या घातकी धोरणाबद्दल चीड आली होती. त्याने कोणालाही कैद वगैरे केले नाही. उलट मराठ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या प्रदेशात जाऊ दिले. वास्तविक पाहता शिवाजीराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर सलोख्याचे राजकारण जर औरंगजेबाने केले असते तर शिवाजीराजांनीही मुघलांबाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारले असते. संभाजीराजांना मन्सब घेण्यासाठी पाठवून शिवाजीराजांनी आपले सामोपचाराचे धोरण स्पष्ट केले होते. औरंगजेबाने हिंदूंवर जिझियाकर लादलेला ऐकून एक सविस्तर पत्र पाठवून सामान्य रयतेची छळवणूक करू नये अशी तळमळीची विनंती शिवाजीराजांनी बादशहाला केली होती. परंतु संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा औरंगजेबाने रचलेला होता आणि म्हणून शिवाजीराजांच्या सामोपचाराच्या धोरणाला त्याने दाद दिली नाही.

शिवाजीराजांची आक्रमक भूमिका :
औरंगजेबाने सामोपचाराचे धोरण सोडून देऊन आपल्याविरुद्ध छुपे राजकारण सुरु केले, आपले निष्ठावंत सरदार निराजी रावजी व प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचला हे पाहून शिवाजीराजांनीही मुघलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले आणि केवळ घाटावर व कोकणातच नव्हे तर बागलाण. खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवाजीराजांनी योजना आखली. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे प्रवेशद्वारच होते. तेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजीराजांनी ठरविले आणि त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजीराजांनी तानाजी मालुसरे यांना पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजींना वीरमरण पत्करावे लागले. पुण्याजवळ घाटमाथ्याच्या तोंडाशी असलेला दुसरा किल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे सिंहगड पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजीराजांनी ठरविले. शिवाजीराजांनी निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठविले. ८ मार्च १६७० रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे शिवाजीराजांनी अवघ्या दोन महिन्यात दोन महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची झोप उडाली. हे किल्ले जिंकण्यापुर्वीच वऱ्हाड प्रदेशात जानेवारी १६७० मध्ये मराठयांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर-नगर पासून थेट औरंगाबादपर्यंत आणि तेथून मराठवाड्यात परिंडा-औसा पर्यंत आक्रमण करून मराठयांनी मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहाप्रमाणे जे २३ किल्ले मुघलांना देण्यात आले होते ते एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठयांनी सपाटा सुरु केला. ३ मे १६७० रोजी लोहगड जिंकून घेतला, तर १६ जून रोजी माहुली जिंकून घेतला. त्यानंतर एकाच आठवडयात २२ जून रोजी कर्नाळा आणि २४ जून रोजी रोहिडा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठयांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे १६७० च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठयांनी पुरंदरच्या तहाचा कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाहीत, तर मुघलांच्या ताब्यात गेलेली महत्त्वाची ठाणीही त्यांनी एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा उद्योग सुरु केला. कल्याण हे कोकणातील महत्त्वाचे ठाणे मराठयांनी जिंकून घेतले. अशाप्रकारे शिवाजीराजांचे हे पराक्रम धोरण पाहून औरंगजेबाला शिवाजीराजांविरुद्ध काहीतरी जालीम राजकारण केले पाहिजे असे वाटू लागल्यास नवल नाही. आदिलशहाला आणि किनारपट्टीवर असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना आपल्या बाजूस वळवून शिवाजीराजांविरुद्ध डावपेच लढविण्यास त्याने सुरुवात केली. त्यानुसार त्याने पाश्चात्य वखारवाल्यांना आणि आदिलशहा यांना फर्माने पाठविली परंतु हे सर्व होईपर्यंत पावसाळा सुरु झाला. मराठयांनी आपले चढाईचे राजकारण स्थगित केले आणि पावसाळ्याच्या दिवसात शिवाजीराजांविरुद्ध हालचाली करणे धोकादायक आहे हे मुघलांना माहित असल्यामुळे तेही स्वस्थ बसले.


सुरतेची दुसरी लूट :
१६७० चा पावसाळा थांबला आणि शिवाजीराजांनी लगेच पुन्हा चढाईचे राजकारण सुरु केले. मुघलांना नामोहरम करण्यासाठी अचानकपणे सुरतेवर छापा घालण्याचे त्यांनी ठरविले. या सुरतेच्या स्वारीपाठीमागे शिवाजीराजांचे प्रमुख दोन उद्देश होते. एक म्हणजे सुरतेवर स्वारी केल्यामुळे औरंगजेबाला जबरदस्त धक्का देता येईल आणि मुघलांची नाचक्की होईल. दुसरा उद्देश म्हणजे आपल्याविरुद्ध मुघलांना मदत करण्यास उद्युक्त असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना धक्का बसेल. याशिवाय तिसरा उद्देश म्हणजे सुरतेची पुन्हा लूट करून संपत्ती आणता येईल. या दुसऱ्या स्वारीच्या वेळी शिवाजीराजांनी किनारपट्टीचा मार्ग निवडला होता. ३ व ४ ऑक्टोबर १६७० रोजी सुरतेवर अचानक हल्ला केला आणि सुमारे ६६ लाख रुपयांची लूट केली. या लुटीच्या वेळी शिवाजीराजांनी डच आणि इंग्रज यांना बहुधा अंतःस्थपणे कौल (संरक्षण) दिला असावा. कारण इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये आणि डचांच्याही पत्रव्यवहारामध्ये ‘शिवाजीराजांनी आम्हाला कसलाही त्रास दिला नाही’ अशा आशयाने उल्लेख आलेले आहेत. हि लूट परत घेऊन जाताना किनारपट्टीच्या ऐवजी खानदेश-बागलाणच्या मार्गाने जाण्याचे शिवाजीराजांनी ठरविले होते.

वणी-दिंडोरीची लढाई :
सुरतेची स्वारी आटोपून आणि बरोबर लुटीची संपत्ती घेऊन शिवाजीराजे खानदेश-बागलाण मार्गाने स्वराज्याकडे मार्गाक्रमण करू लागले. यावेळी खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान पत्री हा होता. शिवाजीराजांशी सामना देण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली. बागलाणातून मार्गाक्रमण करीत असताना शिवाजीराजांना वणी-दिंडोरीच्या परिसरात दाऊदखानाने अडविले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी कंचन-मंचनच्या घाटाजवळ मुघल आणि मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धामध्ये मराठयांनी मुघलांचा दणदणीत पराभव केला. सभासदाने आपल्या बखरीमध्ये वणी-दिंडोरीच्या लढाईचे तपशिलाने वर्णन दिलेले आहे. मराठयांनी या लढाईत शानदार विजय संपादन केला मात्र औरंगजेबाचा दरबारी लेखक भीमसेन सक्सेना याने ‘या लढाईत मराठयांची हार झाली व ते पळून गेले’ असे लिहून ठेवले आहे. दरबारी लेखक औरंगजेबाच्या समजुतीसाठी मुद्दाम खोटे लिहून ठेवत असावेत.


बऱ्हाणपूरपर्यंत मराठे :
वणी-दिंडोरीची लढाई झाल्यानंतर शिवाजीराजांनी मुघलांबरोबरचे आक्रमक धोरण अधिक तीव्र केले. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या बऱ्हाणपूर पर्यंत मजल मारून औरंगजेबाला आणखी एक धक्का देण्याचे शिवाजीराजांनी ठरविले. या योजनेप्रमाणे डिसेंबर १६७० पर्यंत मराठयांनी थेट बऱ्हाणपूरपर्यंत मजल मारली. तेथून साधारणपणे दोन मैल अंतरावर असलेली बहादरपुरा ही पेठ मराठयांनी लुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान याला ती बातमी कळल्यानंतर तो मोठया तयारीनिशी बऱ्हाणपूराकडे निघाला. परंतु मराठयांचा वेग एवढा मोठा होता की बहादूरपूरा लुटून अतिशय शिघ्र गतीने ते बागलाणपर्यंत पोहचले याचा अर्थ दाऊदखान बऱ्हाणपूरपर्यंत पोहचण्याअगोदरच त्याला झुकांडी देऊन मराठे खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुल्हेर किल्ल्याजवळची पेठ त्यांनी लुटली. शिघ्र गतीने तो बागलाणकडे परतला. परंतु दरम्यान ५ जानेवारी १६७१ रोजी मराठयांनी मुल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झालेला होता. शिवाजीराजांचा पुढचा बंदोबस्त करण्यासाठी महाबतखान नावाच्या पराक्रमी सरदारास त्याने दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले.


महाबतखानाची मोहीम :
जानेवारी १६७१ मध्ये बऱ्हाणपूर ओलांडून महाबतखान दक्षिणेत आला. औरंगाबादकडे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्या बरोबर मोहिमेच्या आखणीबाबत त्याने चर्चा केली. नंतर औरंगाबादेत जाऊन शाहजादा मुअज्जम याला तो भेटला. आपल्या मोहिमेमध्ये बागलाण प्रदेशावर प्रथम वर्चस्व निर्माण करण्याचे धोरण त्याने आखले. त्याच्याबरोबर नव्या दमाचे सैन्य होते. त्याचप्रमाणे दिलेरखानही त्याच्या मदतीसाठी मोठे सैन्य घेऊन आला. शिवाय दाऊदखान पत्री याचेही सैन्य त्याच्या दिमतीस होते. दाऊदखानच्या सैन्यास बागलाणमधील किल्ले लढविण्याचा अनुभव होता. अशाप्रकारे मोठी तयारी झाल्यावर महाबतखानाने वेगवेगळ्या तुकडया बागलाणातील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठविल्या. अहिवंत, हातगड आणि मार्कंडा हे किल्ले अल्पावधीत जिंकून घेऊन मुघलांनी बागलाणमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. बागलाणमधील कण्हेरागड या किल्ल्याच्या पायथ्याशी मराठे व मुघल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात रामजी पांगरे या मराठी सरदाराने पराक्रमाची शर्थ केली. सभासद लिहितो, ‘एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले’. त्याचा पराक्रम पाहून दिलेरखानही चकित झाला असा उल्लेख सभासदाने आपल्या बखरीत केलेला आहे. बागलाणमधील महत्त्वाचे किल्ले ताब्यात आल्यानंतर महाबतखानाने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु केला. या योजनेप्रमाणे मराठयांना बागलाणच्या प्रदेशात गुंतवून ठेवायचे आणि दिलेरखानाने शिवाजीराजांचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे शहरावर हल्ला करायचा असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी १६७२ च्या सुमारास दिलेरखानाच्या फौजा पुण्याकडे मार्गक्रमण करू लागल्या. परंतु यावेळी मराठयांनी आत्मसंरक्षणाची कडेकोट तयारी केलेली होती आणि बागलाणमधून मुघलांना माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी चौफेर हल्ले करण्याची योजना मराठयांनी आखली होती. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांचे सैन्य बागलाणमध्ये उतरले. अटीतटीचा प्रसंग आला तर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी बागलाणात जाऊन किल्ले जिंकण्यास मदत करावी असे ठरविण्यात आले. दरम्यान मुघलांतर्फे इखलासखान याने साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी रोमहर्षक युद्ध झाले. मराठयांतर्फे सूर्यराव काकडे याने एवढा पराक्रम गाजविला की मुघलांना माघार घेण्याशिवाय इलाज उरला नाही. तथापि अचानकपणे तोफेचा एक गोळा सूर्यराव काकडयास लागला आणि तो धारातिर्थी पतन पावला. परंतु मराठयांनी धीर सोडला नाही. ठरल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे कोकणातून प्रतापराव गुजराच्या मदतीसाठी बागलाणात आले. आणि या सर्वांनी मिळून मुघलांचा वेढा मोडून काढला. साल्हेरचा वेढा सोडून मुघलांनी माघार घेतली. फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरचा किल्ला जिंकून घेऊन संपूर्ण बागलाणवर मराठयांनी पुन्हा पकड निर्माण केली. मराठयांच्या चौफेर पराक्रमाच्या वार्ता ऐकून दिलेखानालाही पेचात सापडल्यासारखे वाटले. पुण्यापेक्षा बागलाणवरच प्रभाव निर्माण केला पाहिजे कारण तो प्रदेश आपल्या हातचा गेला तर दक्षिणेतील मुघल सत्ता धोक्यात येईल असा विचार करून दिलेरखानाने पुण्याची मोहिम सोडली आणि बागलाणकडे तो परतला. मुघलांची हि पिछेहाट झालेली पाहून औरंगजेब अत्यंत अस्वस्थ झाला. आणि त्याने मुअज्जम व महाबतखान यांना उत्तरेत परत बोलाविले. दिलेरखानाबाबतही तो नाराज झाला होता. मुघल फौजेतील अनेक मराठे सरदार शिवाजीराजांच्या आश्रयाला येऊ लागले होते. सिद्दी हिलाल, जाधवराव इत्यादी सरदार आपापल्या फौजा घेऊन शिवाजीराजांच्या आश्रयास आले. अशाप्रकारे १६७२ च्या प्रारंभी शिवाजीराजांनी मुघलांच्याच प्रदेशात विशेषतः बागलाण भागात आपले प्रभुत्व निर्माण केले आणि बागलाणातील किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची खानदेश बागलाणमार्गे पुण्याकडे होणारी आक्रमणे थोपविणे मराठयांना सहजशक्य झाले.


छत्रसाल आणि शिवाजीराजे :
शिवाजीराजे आग्र्याहून परत आल्यानंतर त्यांच्या पराक्रमाविषयी उत्तर भारतातील लोकांना मोठे कुतूहल वाटू लागले. विशेषतः राजपूतांना शिवाजीराजांच्या धाडसी आणि आक्रमक प्रवृत्तीचे विशेष कौतुक वाटले. चंपतराय बुंदेले यांचा मुलगा छत्रसाल हा औरंगजेबाच्या प्रशासनामध्ये काम करीत होता. शिवाजीराजांचे बाणेदार वर्तन पाहून तो बेहद्द खुश झाला. शिवाजीराजांनी दक्षिणेत ज्याप्रमाणे एक स्वतंत्र राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर भारतात करता येईल का असा एक महत्त्वाकांक्षी विचार त्याच्या मनामध्ये आला. या विचाराने तो एवढा भरला की त्याने मुघलांची मनसबदारी सोडून दिली आणि दक्षिणेत शिवाजीराजांच्या भेटीसाठी तो आला. भीमसेन सक्सेना याने ‘तारिखे दिलकशा’ या ग्रंथामध्ये छत्रसाल आणि शिवाजीराजे यांच्या भेटीचा तपशील दिलेला आहे. छत्रसालने शिवाजीराजांकडून प्रेरणा घेतली आणि उत्तर भारतात जाऊन संधी येताच स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला.
१६७२ पर्यंत शिवाजीराजांनी दक्षिणेतील आपल्या सर्व शत्रूंना नामोहरम करून सोडले. मुघलांशी शिवाजीराजांचा सामना चालू असतांना आदिलशहा, कुतूबशहा, पोर्तुगीज आणि अन्य वखारवाले शिवाजीराजांच्या विरोधात गेले नाहीत. आपले स्वराज्य चारी बाजूंनी सुरक्षित करण्यासाठी शिवाजीराजे कसोशीने प्रयत्न करीत होते. कारण आपली सत्ता निर्वेध झाल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करवून घेण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा