शिवरायांच्या कार्याचे स्वरूप
इ. स. १६८० च्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी आपल्या बहुतेक शत्रूंना नामोहरम केल्याचे आढळून येते. फेब्रुवारीमध्ये मुघलांचा पराभव करण्यामध्ये महाराजांना यश आले. इंग्रज लोक सिद्दींना मदत करत आहेत हे लक्षात आल्यावर महाराजांनी इंग्रजांनाही धडा शिकविला. आपला निभाव लागणार नाही हे ओळखून इंग्रजांनी जानेवारी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला व यापुढे सिद्दींना मदत करणार नाही असे आश्वासन दिले. सिद्दी कासीम मात्र मुघलांच्या मदतीमुळे समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. खांदेरीवर शिवाजी महाराज तटबंदी बांधत आहेत हे पाहून तेथून जवळच असलेले उंदेरी हे बेट सिद्दी कासीमने जिंकून घेतले. त्यामुळे सिद्दी आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष १६८० च्या उन्हाळ्यातही चालू राहिला. एक सिद्दी जर सोडला तर महाराजांचे बाकीचे सर्व शत्रू एकतर नामोहरम झाले होते किंवा महाराजांशी तह करून सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे आपल्या सर्व शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर फेब्रुवारी १६८० मध्ये शिवाजी महाराज रायगडावर परतले. ७ मार्च १६८० रोजी राजारामाचा उपनयनविधी करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च रोजी राजारामाचा विवाह प्रतापराव गुजराच्या मुलीबरोबर करण्यात आला. अशाप्रकारे मंगल कार्यामुळे रायगडावर मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अचानकपणे शिवाजी महाराज रक्तातिसाराने आजारी पडले आणि हे दुखणे विकोपास जाऊन चैत्र शुद्ध पोर्णिमा शके १६०२ म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्यावर मोठा आघात झाला. रायगडावर शोकसागर उसळला. ऐन उमेदीच्या वयात झालेला महाराजांचा मृत्यू म्हणजे चौफेर विस्ताराची वाटचाल करणाऱ्या स्वराज्यावर मोठा आघात होता.
शिवाजी महाराजांचे कार्य :
शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे अलौकिक कार्य शिवाजी महाराजांनी करून दाखविले. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे मोठे वैशिष्ठ्य असे होते की हे राज्य भोसले वंशाचे राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले राज्य होते. लोककल्याणाचा विचार करणारा राज्यकर्ता त्याकाळामध्ये जगात इतरत्र झालेला आढळत नाही. म्हणूनच १७ व्या शतकातील महान राजा या दृष्टीने शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या काव्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केलेले आढळते. फक्त एकाच ओवीमध्ये महाराज कसे होते ते रामदास स्वामींनी स्पष्ट केले आहे,
निश्चयाचा महामेरू । बहूत जनासि आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा