स्वराज्याचाविस्तार
जावळीचे चंद्रराव मोरे :
जावळीच्या प्रदेशावर सरदार मोरे यांचा अंमल होता. या मोरे घराण्यातील पुरुषांना चंद्रराव हा पिढीजात किताब होता. शिवाजीराजांनी स्वराज्यकार्यास प्रारंभ केला, त्या सुमारास जावळीवर दौलतराव मोरे (चंद्रराव) यांचा अंमल होता. या दौलतरावच्या मृत्युनंतर वारसाचा प्रश्न निर्माण झाला. कारण दौलतराव निपुत्रीक होता. तेव्हा त्याच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यापैकी यशवंतराव यास दत्तक घेऊन त्याला जाळवीच्या जाहांगीरीची सूत्रे दिली. विशेष म्हणजे या यशवंतरावास शिवाजीराजांनी पाठींबा देऊन आपला प्रभाव जावळी प्रदेशात वाढविण्यास सुरुवात केली. मोरे घराण्यातील काही पुरुष यशवंतरावविरुद्ध बंद करून उठले. त्यामुळे जावळी प्रदेशात एक नवा संघर्ष सुरु झाला. या सुमारास अफजलखान हा वाईचा सुभेदार होता. शिवाजीराजांच्या हालचाली ओळखून खानाने यशवंतरावाची जहागिरी हिसकावून घेण्याचा घाट घातला. परंतु स्वत: यशवंतराव धूर्त असल्यामुळे तो स्वतः आदिलशहाशी अत्यंत नम्रतेने व लीनतेने वागत होता. त्यामुळे खानाला त्याचेविरुद्ध कारवाई करणे अशक्यप्राय वाटू लागले. त्यात आदिलशहाने १६५५ मध्ये अफजलखानाला कर्नाटकच्या कामगिरीवर पाठविले.
आदिलशहाची मर्जी संपादन करण्यासाठी यशवंतराव मोरे शिवाजीराजांच्या प्रवेशावर लहानसहान हल्ले करू लागला. शिवाजीराजांचे सहकारी सिलिंबकर देशमुख यांच्याशी गुंजणमावळच्या देशमुखीवरून यशवंतरावाने भांडण उकरून काढले. सर्वात चीड आणण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवाजीराजांच्या जहागिरीतील गुन्हेगारांना आश्रय देण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. मोसे खोऱ्यातील रंगो त्रिमल या गावकुलकर्ण्याने अनैतिक कृत्य केले होते, त्याला पकडून शिक्षा करण्याची इच्छा होती. या रंगो त्रिमलला यशवंतरावाने आश्रय दिला. तेव्हा जावळीच्या या उन्मत जहागिरदाराला शासन करण्याचे शिवाजीराजांनी ठरविले.
जावळी प्रदेशावर एकाचवेळी चारी बाजूने हल्ला करण्याची योजना शिवाजीराजांनी आखली. त्यासाठी बांदल, सिलिंबकर देशमुख आणि संभाजी कावजी हा महालकरी यांची नेमणूक शिवाजीराजांनी केली. ठरल्याप्रमाणे शिवाजीराजांच्या मावळ्यांनी एकाचवेळी चारी बाजूंची जावळ प्रदेशावर हल्ला केला. यशवंतराव मोरे आपली दोन मुले बाजी व कृष्णाजी यांच्यासह रायगडकडे पळून गेला. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजीराजांनी जावळीचा मुलूख ताब्यात घेतला. शिवाजीराजांचे सैन्य यशवंतरावाचा पाठलाग करीत रायगडापर्यंत गेले. मोऱ्यांनी हा किल्ला ३ महिने लढविला. पण शेवटी शिवाजीराजांना शरण गेला आणि रायगडचा किल्ला त्याने मे इ. स. १६५६ मध्ये शिवाजीराजांच्या ताब्यात दिला. जावळीच्या मोऱ्यांचे प्रकरण येथेच थांबवयास हवे होते. परंतु यशवंतरावाने शिवाजीराजांविरुद्ध कारवाया चालू ठेवल्या. त्याचा राग येऊन शिवाजीराजांनी २७ ऑगस्ट इ. स. १६५६ रोजी यशवंतरावास ठार मारले आणि जावळी खोऱ्यावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. जावळी विजयामुळे शिवाजीराजांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाचा मोठा विस्तार झाला. जावळीवर विजय मिळवून कोंडेनळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, हातलोटचा घाट, पार घाट इ. महत्वाच्या घाटांवर आणि खिंडीवर शिवाजीराजांनी प्रभुत्व संपादन केले. याशिवाय रायगडासारख्या बुलंद किल्ला शिवाजीराजांच्या ताब्यात आला. केवळ प्रदेश जिंकून घेणे आणि सत्ता वाढविणे एवढेच शिवाजीराजांचे धोरणे नव्हते. आपल्या स्वामित्वाखाली आलेल्या नव्या प्रदेशातील लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील रहाणे हाही शिवाजीराजांचा उदात्त हेतू होता. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, ‘जावळी सर केली. मावळे लोकांस कौल देऊन संचणी केली. प्रतापगढ म्हणून नवाच वसविला.’ या प्रतापगडावर शिवाजीराजांनी तुळजा भवानीचे मंदिर बांधले.
जावळीचा विजय हा शिवाजीराजांच्या आयुष्यातील मोठा विजय म्हणावा लागेल. कारण या विजयामुळे शिवाजीराजांच्या मूळ लहान जहागिरीचा मोठा विस्तार झाला आणि स्वतंत्र राज्य स्थापण्यास अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. या विजयामुळे शिवाजीराजांचा आत्मविश्वास वाढला. जुलमी आणि उन्मत जहागिरदारांवर वाचक निर्माण झाला. त्याचप्रमाणे शिवाजीराजांस आपली ताकद आजमाविता आली. आदिलशहालाही शिवाजीराजांचे वाढते बळ पाहून मोठी चिंता वाटू लागली. विशेष म्हणजे जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे घाटमाथ्याप्रमाणे कोकणपट्टीचा काही प्रदेश शिवाजीराजांच्या राज्यात समाविष्ट झाला आणि त्यांच्या राज्याची हद्द थेट समुद्रापर्यंत जाऊन भिडली. त्यामुळे पश्चिमकिनाऱ्यावर सत्ता गाजविणाऱ्या जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज यांनाही शिवाजीराजांच्या सामर्थ्याचा धाक वाटू लागला. इंग्रज,फ्रेंच आणि डच या पाश्चात्य व्यापाऱ्यांच्या वाखारीही पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या बंदरातून होत्या. हे पाश्चात्य व्यापारी शिवाजीराजांचे वाढते सामर्थ्य पाहून सावध झाले. अशाप्रकारे जावळी विजयामुळे शिवाजीराजांचा दरारा महराष्ट्राच्या देश आणि कोकण या दोन्ही भागात निर्माण झाला.
शत्रूला आपल्या पराक्रमाने आश्चर्यचकीत करून त्यांना नामोहरम करावयाचे आणि जोपर्यंत तो बेसावध आहे तोपर्यंत त्याच्या प्रदेशात जास्तीत जास्त घुसखोरी करावयाची हे शिवाजीराजांच्या डावपेचाचे मुख्य सूत्र होते. त्या सूत्राप्रमाणे जावळी ताब्यात आल्यावर फार वेळ न दवडता ९ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहिते यांचेकडून शिवाजीराजांनी वडिलोपार्जित सुपे परगणा ताब्यात घेतला. त्यामुळे आदिलशहाप्रमाणे मुघल सत्ताधिशालाही शिवाजीराजांची दहशत वाटू लागली. शिवाजीराजे एकामागून एक नेत्रदिपक विजय मिळवत होते. या काळात विजापूरचा सुलतान महंमद आदिलशहा हा असाध्य रोगाने आजारी होता. विजापूरच्या दरबारात बचबजपूरी माजली होती. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शिवाजीराजांनी कर्नाटक प्रदेशात आक्रमण सुरु केले. नोव्हेंबर १६५६ मध्ये महंमद आदिलशहा मृत्यू पावला त्यावेळी शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवर होते. विजापूरच्या नव्या सुलतानाने अली आदिलशहाने शिवाजीराजांच्या हालचालींना कर्नाटकात पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. तरीपण १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी कर्नाटकावर लहानमोठ्या स्वाऱ्या केल्या या सुमारास दिल्लीचा बादशहा शहाजहान यांचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. शिवाजीराजांचा आणि त्याचा प्रत्यक्ष संघर्ष झाला नाही. पण ज्यावेळी औरंगजेबाने बिदर आणि कल्याणी या आदिलशाही प्रदेशावर हल्ले केले त्यावेळी जुन्नर या मुघलांच्या महत्वाच्या केंद्रावर हल्ला करून शिवाजीराजांनी औरंगजेबाला चकित केले. शिवाजीराजांचे वाढते वर्चस्व महागात पडेल हे लक्षात घेऊन औरंगजेबाने शिवाजीराजांविरुद्ध सरदार पाठविले. त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशहाला शिवाजीराजांच्या हालचालींना पायबंद घालण्याचा इशारा त्याने दिला. अशा परिस्थितीत औरंगजेबालाच बादशहा आजारी असल्याची वार्ता कळल्यानंतर औरंगजेबाने आपले दक्षिणेतील राजकारण तात्पुरते स्थगीत केले आणि दिल्लीकडे प्रयाण केले. दिल्लीला येताच कुटील डावपेच खेळून शहाजहान बादशहाला त्याने नजरकैदेत ठेवले आणि ५ जून १६५९ रोजी स्वतःला मुघल बादशहा म्हणून जाहीर करून घेतले. शिवाजीराजांनी सोनोपंत वकीलास औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीस पाठविले. औरंगजेबाने जुलै १६५९ मध्ये शिवाजीराजांना मानाची वस्त्रे पाठविली. अशाप्रकारे शिवाजीराजे आपले आक्रमणाचे धोरण कायम ठेऊन कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. तसेच माहुली व इतर काही किल्ले ताब्यात घेतले.
शिवाजीराजांचा दरारा वाढला :
कोकणमध्ये शिवाजीराजांची घोडदौड चालू असतांना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत याची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठविले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केल्याने लखम सावंताची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने ५ मार्च १६५९ रोजी शिवाजीराजांशी तह केला आणि त्यांचे मांडलिकत्व पत्करले. लखम सावंताला मदत करून शिवाजीराजांनी रुस्तुमजमापासून त्याचे रक्षण केले. कोकणातील शिवाजीराजांचे वाढते वर्चस्व पाहून आदिलशहाच्या दरबारात खळबळ निर्माण झाली. शेवटी शिवाजीराजांचा बंदोबस्तासाठी अफजलखान यास पाठविण्याचे विजापूर दरबाराने निश्चित केले.
अफझल प्रसंग :
वविजापूर दरबाराने अफझलाखानाची शिवाजी महाराजांवर हेतुपुरस्सर नेमणूक केली. त्याकाळात आदिलशहाच्या दरबारात जे काही मोजके नामवंत सरदार होते त्यामध्ये अफझलखानाचा क्रमांक वरचा होता. शिवाय अफझलखान हा प्रथमपासून शिवाजी महाराजांचा द्वेष करीत होता. जावळीवर शिवाजी महाराजांनी वर्चस्व निर्माण केले हि गोष्ट खानाला अजिबात आवडली नाही. खान शिवाजी महाराजांचाच नव्हे तर शहाजीराजांचाही द्वेष करीत असे. शहाजीराजांना कर्नाटकातून पायात बेड्या घालून विजापूरच्या दरबारात आणण्यामध्ये खाननेच पुढाकार घेतला होता. कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत शिवाजी महाराजांचा भाऊ संभाजी हा मारला गेला, या घटनेलाही खानची कारवाई कारणीभूत होती. अशाप्रकारे खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. म्हणूनच शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा त्याने विजापूरच्या दरबारात उचलला. सभासदाने आपल्या बखरीत खानच्या तोंडी एक वाक्य घातले आहे, “शिवाजी काय, चढे घोडीयानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो.” ‘तारिखे अली’चा कर्ता रुहुल्ला हा लिहितो की, “बादशहाने अफझलखानाला जातेवेळी सांगितले होते की, शिवाजी महाराजांनी वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकूल न ऐकता त्याचा नाश करावा.” डच पत्रव्यवहारामध्येही शिवाजी महाराजांचा नाश करण्यासाठीच विजापूर दरबार अफझलखानाची नेमणूक केली होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तारिखे अली, डच पत्रव्यवहार, आदिलशाही फर्माने इ. साधनांच्या आधारे असे स्पष्ट दिसून येते की, खानाने शिवाजी महाराजांचा नाश करावा म्हणून त्याची नेमणूक विजापूर दरबाराने केली होती.
शिवाजी महाराजांची सावधगिरी :
विजापूरहून निघताना अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशात दहशत निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचप्रमाणे धर्मस्थळांना इजा करून शिवाजी महाराजांना डीवचण्याचे क्षुद्र राजकारण त्याने केले. तुळजापूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, पंढरपूर इ. धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख अज्ञानदासाच्या पोवाड्यात आढळतो. तुळजापूर आणि पंढरपूर या दोन धर्मक्षेत्रांना खानाने उपद्रव दिल्याचा उल्लेख सभासदाने केला आहे. वाईकडे येताना फलटणजवळ मलवडी या ठिकाणी बजाजी निंबाळकर यास खानाने पकडले आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. परंतु खानाच्या बरोबर असलेले मराठे सरदार नाईकजी राजेपांढरे यांच्या मध्यस्थीमुळे बजाजीची सुटका झाली.
खानच्या साऱ्या हालचाली शिवाजी महाराज अत्यंत सावधपणे पहात होते. आपल्या जनतेमध्ये दहशत निर्माण करून आणि धर्मस्थळांचा उपद्रव देऊन खान आपल्याला अस्वस्थ आणि संतप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखले. खानाची पावले ओळखून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सावधगिरीचा मार्ग शिवाजी महाराजांनी स्वीकारला. १६५९ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्यात आपला मुक्काम हलविला. लष्करी डावपेचाच्या दृष्टीकोनातून जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या दृष्टीने मोठा सोईचा होता. खानानेसुधा जावळीचा प्रदेशच शिवाजी महाराजांची कोंडी करण्यास सोईचा आहे असाच विचार केलेला होता. कारण खानाने वाईची सुभेदारी केलेली होती. त्यामुळे जावळी भागातील दऱ्याखोऱ्यांची त्याला माहिती होती. सुभेदारी करीत असतांना जावळी आणि वाई भागातील देशमुखांना खानाने आपल्या कह्यात आणले होते. शिवाय आदिलशहाच्या फर्मानाप्रमाणे या भागातील देशमुख खानाला मदत करतील अशी अपेक्षा होती. खानाच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा मुद्दा होता. जावळीच्या मोऱ्यांपैकी प्रतापराव मोरे हा खानास येऊन मिळाला होता. जावळीच्या खोऱ्याचा बारीकसारीक तपशील प्रतापरावाला माहित होता. वाई-जावळी या प्रदेशाची निवडही खानाने हेतूपुरस्सरच केली.
खानाजवळ १२,००० अश्वदळ आणि १०,००० पायदळ होते. शिवाय ७५ मोठ्या तोफा आणि सुमारे ४०० लहान पहाडी तोफा खानाजवळ होत्या. शिवाजी महाराजांकडे १०,००० अश्वदळ व १०,००० पायदळ होते. वाईला आल्यानंतर खानाने शिवाजी महाराजांच्या राज्यात धुमाकूळ घालण्यासाठी वेगवेगळ्या भागात शिरवळ भागात पांढरे, तर सुपे भागात जाधव, सासवडकडे खराडे तर पुण्याकडे हिलाल आणि कोकणमध्ये सैदखान या सरदारांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात धुमाकूळ घातला. आपल्या प्रदेशाची नासाडी चाललेली पाहून शिवाजी महाराज नामोहरम होतील असा खानाचा कयास होता. पण खानाच्या सरदारांनी उठविलेल्या या वावटळीकडे शिवाजी महाराजांनी पूर्ण दुर्लक्ष केले. तेव्हा शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय खानाने घेतला. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा प्रथम शिवाजी महाराजांना जाऊन भेटला. शिवाजी महाराजांनी भेटीची अनुकुलता दर्शविली आणि त्यानंतर आपला वकील पंताजी गोपीनाथ याला खानाकडे पाठविले.
वकिलांच्या भेटीगाठी चालू असताना खानाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न चालविला. शहाजीराजांना खानाने दिलेली वागणूक आणि थोरला भाऊ संभाजीराजे याच्या पारीपत्यास कारणीभूत झालेल्या खानाच्या कारवाया शिवाजी महाराजांना माहित होत्या. खान दगाबाजी करण्यात पटाईत आहे याचीही कल्पना शिवाजी महाराजांना होती. कर्नाटकातील शिऱ्याचा राजा कस्तुरीरंग याला भेटीस बोलावून १६३८ मध्ये खानाने त्याला दगाबाजीने मारले होते. शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ यांनी खानाच्या गोटाची चाहूल घेऊन भेट घेण्यापाठीमागे खानाचा अंतस्थ हेतू काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, ‘पंताजी पंताने खानाच्या मनात दृष्टबुद्धी आहे’ असा इशारा शिवाजी महाराजांना दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे ठरविले.
अफझलखानाचा वध :
खान आणि शिवाजी महाराज यांच्या वकीलांनी भेटीगाठी घेऊन भेटीची तारीख १० नोव्हेंबर १६५९ हि निश्चित केली. शिवाजी महाराज आणि खान यांच्या भेटीचा संपूर्ण तपशील दोन्ही वकिलांनी ठरविला. प्रतापगडाच्या माचीवर मार्गशिर्ष शु. || सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्हाच्या वेळी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट होईल असे ठरविण्यात आले आणि त्यावेळी दोघांजवळ प्रत्येकी दोन सेवक राहतील, प्रत्येकाचे १० अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे राहतील, दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरविण्यात आला व तो दोघांनाही मान्य झाला.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी मध्यान्हाच्यावेळी अफझलखान प्रतापगडच्या माचीवर येऊन पोहचला. शिवाजी महाराजांनी खानाच्या भेटीची तयारी केली. स्वसंरक्षणासाठी त्याने चिलखत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात कृपाण अशी दोन शस्त्रे शिवाजीराजांनी घेतली. जिऊमहाला आणि संभाजी कावजी हे दोन हुद्देकरी बरोबर घेतले. खानाच्या बरोबरही दोन हुद्देकरी होते पण त्याशिवाय सय्यद बंडा हा धारकरीही होता. शिवाजीराजांनी हरकत घेतल्यावर सय्यद बंडाला मंडपाबाहेर पाठविण्यात आले.
प्रतापगडाच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता. या शामियान्यातच शिवाजी महाराज व अफझलखान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे भर मध्यान्हाच्या वेळी शिवाजीराजांनी खानाला भेटण्यासाठी शामियान्यात प्रवेश केला. शिवाजी महाराजांना पहाताच खानाने आलिंगन देण्यासाठी हात पसरविले. शिवाजी महाराज अत्यंत सावधपणे पुढे गेले. खानाने शिवाजीराजांना बाहुपाशात घेऊन त्याचे मस्तक काखेत दाबून धरले. त्यानंतर खानाने शिवाजीराजांच्या डाव्या कुशीत जमदाड (खंजीर) खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगात चिलखत असल्यामुळे तो वार शिवाजीराजांना लागला नाही. यावेळी सावधचित्त असलेल्या शिवाजी महाराजांनी मोठ्या चपळाईने आपली मान सोडवून घेतली आणि आपल्या हातात असलेली कृपाण खानाच्या पोटात खुपसून त्याचा वाढ केला. खानाच्या सेवकाने शिवाजीराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा वार चुकवून शिवाजीराजांनी त्याला ठार मारले. खान पडल्याचे लक्षात येताच सय्यद बंडा हा मोठ्या त्वेषाने धावून आला. पण जीऊमहालाने त्याला मध्येच अडवून ठार केले.
खानाचा वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या. पूर्वनियोजित संकेताप्रमाणे शिवाजीराजांनी सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलमय प्रदेशात विखुरलेले होते. इशारतीचे आवाज येताच शिवाजीराजांच्या सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला केला. कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, सिलिंबकर देशमुख इ. सरदारांनी अतुल पराक्रम गाजवून खानाच्या सैन्याची अक्षरशः वाताहत केली. अशाप्रकारे अचानक युद्धाला तोंड द्यावे लागेल असे विजापूरी सैन्याच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे अक्षरशः फजिती झाली. विजापूरी फौज सैरावैरा धावत सुटली. खानाचा मुलगा फाजलखान हा प्रतापराव मोऱ्यांच्या मदतीने निसटून गेला. खानाकडील हत्ती, उंट, घोडी व लाखो रुपयांचे जडजवाहीर मराठयांना लुटीत मिळाले. विजापुरी सैन्यातील अनेक सैनिक व अंमलदार शिवाजीराजांना शरण आले. त्यांना अभय देण्यात आले.युद्ध संपल्यावर युद्धात ज्यांनी बहुमोल कामगिरी बजावली अशा शूर मराठयांना शिवाजीराजांनी भरपूर बक्षिसी दिली. पण त्याचबरोबर ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कडक शासनही केले. खंडोजी खोपडे या देशमुखाने विश्वासघात करून खानाला मदत केली होती. शिक्षा म्हणून त्याचा एक हात व एक पाय तोडण्यात आला. पंताजी गोपीनाथ यांना अलंकार व वस्त्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. १६६० च्या अखेरीस शिवाजीराजांनी जाहीरनामा काढला. त्यान्वये अफझलखानाचा वध होण्यापूर्वी पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती या परगण्यातील ज्या-ज्या हिंदुकडे आणि मुसलमानाकडे इनामे आहेत ती पुढेही तशीच राहतील असे जाहीर करण्यात आले.
मराठयांच्या इतिहासात अफझलप्रसंगाला विशेष महत्त्व आहे. या घटनेनंतर सारा मावळ प्रदेश आणि जाळवी खोऱ्याचा प्रदेश शिवाजीराजांच्या पूर्ण स्वामित्वाखाली आला. पारतंत्र्यात खितपत असलेल्या या भागातील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला. शिवाजी महाराजांविषयी मोठा आदरभाव जनतेमध्ये निर्माण झाला. या भागातील देशमुख, देशपांड्यांसारख्या वतनदारांनाही शिवाजीराजांची महती कळून आली आणि बहुसंख्य वतनदारांनी शिवाजीराजांचे स्वामित्व मान्य केले. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने स्वराज्य आकारास आले. शिवाजीराजांच्या सरदारांतही मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. याचे प्रतिक म्हणजे या घटनेनंतर केवळ १५ दिवसात पन्हाळ्यासारखा दुर्गम किल्ला मराठयांनी जिंकून घेतला. (२८ नोव्हेंबर १६५९) खानाच्या लष्करातील पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल यासारखे अनेक सरदार शिवाजीराजांकडे चाकारीसाठी आले. त्यामुळे शिवाजीराजांच्या सामर्थ्यात भर तर पडतीलच, परंतु आदिलशहासारख्या बलाढ्य शत्रूही भयचकित झाला.
पन्हाळ्यात शिवाजीराजे :
मोठा पराक्रम गाजवून शत्रूला चकीत करायचे आणि शत्रू बेसावध झालेला पाहून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावयाचा हा शिवाजीराजांच्या रणनीतीचा भाग होता. अफझलप्रसंग घडल्यानंतर शिवाजीराजांनी एकदम तीन स्वाऱ्यांची आखणी केली. जानेवारी १६६० मध्येच नेताजी पालकर विजापूरच्या प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. नेताजीने लक्ष्मीश्वरपर्यंत मजल मारून अनेक ठिकाणी खंडण्या वसूल केल्या. याच महिन्यात एक तुकडी शिवाजीराजांनी कोकणमध्ये पाठविली. राजापूर बंदरात खानाची काही जहाजे होती. ती ताब्यात घेण्यासाठी या तुकडीची रवानगी करण्यात आली होती. तिसरी स्वारी शिवाजीराजांनी स्वतःच्या नेतृत्त्वाखाली काढली. मिरजेपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून विजापूर दरबारात मोठी खळबळ शिवाजीराजांनी उडवली. तेव्हा आदिलशहाने सिद्दी जौहर या बलाढ्य सरदाराची शिवाजीराजांविरुद्ध नेमणूक केली. प्रचंड तयारीनिशी सिद्दी जौहर शिवाजीराजांशी सामना करण्यासाठी निघाला. ती बातमी कळताच शिवाजीराजांनी पन्हाळा किल्लाचा आश्रय घेतला. तेव्हा मार्च १६६० च्या प्रारंभी सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला.
सिद्दी जौहारबरोबर सिद्दी मसऊद, भाईखान आणि अफझलखानाचा मुलगा फाजलखान तसेच घोरपडे हे नावाजलेले सरदार होते. जौहरचे एकूण सैन्य १५,००० असल्याचा उल्लेख समकालीन इंग्रजी पत्रामध्ये सापडतो. विशेष म्हणजे इंग्रज वखारवाल्यांनी हेन्री रेव्हिंगटन याला तोफा व दारुगोळा देऊन जौहरच्या मदतीसाठी पाठविले. पन्हाळा किल्ल्यात शिवाजीराजांसमवेत ५-६ हजार एवढे सैन्य होते. किल्ल्याला वेढा घालून ३ महिने झाले तरी प्रत्यक्ष चढाई जौहरकडून होत नव्हती. पावसाळा तोंडाशी आल्यामुळे सिद्दी जौहर वेढा काढून घेईल असे शिवाजीराजांना वाटत होते. परंतु पावसाळ्यातही वेढा चालू राहिल अशी तजवीज सिद्दी जौहरने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवाजीराजांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन मुघलांतर्फे बलाढ्य सरदार शायिस्तेखान हा प्रचंड फौज घेऊन शिवाजीराजांच्या प्रदेशात धुमाकूळ घालून पुण्यापर्यंत येऊन थडकला होता. अशाप्रकारे दुहेरी संकटात शिवाजीराजे सापडला होते. राजमाता जिजाबाईंच्या आज्ञेप्रमाणे नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल यांनी बाहेरून जौहरचा वेढा मोडून काढण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आले नाही.
पन्हाळयातून सुटका :
सिद्दी जौहरशी तहाची बोलणी सुरु केल्यावर वेढ्याला शिथिलता येईल अशी शिवाजीराजांची अटकळ होती आणि वेढ्याला शिथिलता प्राप्त झाल्यावर एखादे अलौकीक साहस करून आपली सुटका करून घेता येईल असा बेत शिवाजीराजांनी आखला, जून १६६० च्या अखेरीस शिवाजीराजांनी जौहारशी तहाची बोलणी सुरु केली. शिवाजीराजांच्या अपेक्षेप्रमाणे वेढ्याला काहीशी शिथिलता प्राप्त झाली. ते पावसाळ्याचे दिवस होते. आषाढ महिन्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे तर वेढ्याला अधिकच शिथिलता आली. या संधीचा फायदा घेऊन पन्हाळ्याहून निसटून जाण्याचे शिवाजीराजांनी ठरविले. आषाढ वद्य प्रतिपदा शके १५८२ म्हणजे १२ जुलै १६६० रोजी गुरुवारी मध्यरात्री निवडक लोकांसह गस्तवाल्यांची नजर चुकवत शिवाजीराजांनी पन्हाळ्याहून सुटका करून घेतली.
काळीकुट्ट रात्र, वादळी हवा, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस अशा या निसर्गाच्या रौद्र तांडवाला तोंड देत आडवाटेने शिवाजी राजेंनी विशालगडाकडे कूच केली. काही वेळाने शिवाजीराजे गडावरून निसटल्याचे सिद्दी जौहरच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब सिद्दी मसऊद यांना मोठी फौज देऊन शिवाजीराजांच्या पाठलागावर पाठविले. पन्हाळा ते विशालगड हे अंतर ४० मैलांचे होते. जवळजवळ ३५ मैल अंतर कापून शिवाजीराजे गजापूरच्या खिंडीपर्यंत पोहचले. अद्याप ५-६ मैल अंतर तोडावयाचे होते. तेवढ्यात सिद्दी मसऊदच्या फौजेची चाहूल लागली. प्रसंग मोठा बाका होता. अशा या अवघड प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना निर्धास्तपणे विशालगडाकडे जाण्यास सांगितले आणि निवडक लोकांनिशी मोठ्या गतीने विशालगडाकडे निघाले. पण विशालगडाच्या पायथ्याशी आणखी एक मोठे संकट शिवाजीराजांपुढे उभे राहिले. आदिलाशहातर्फे जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे या दोन मराठे सरदारांनी विशालगडाला अगोदरच वेढा घालून ठेवला होता. या दोन्ही मराठा सरदारांबरोबर शिवाजीराजांनी निकराचे युद्ध केले. तिकडे बाजीप्रभूंनी पराक्रमाची शिकस्त करून गजापूरची खिंड रोखून धरली. त्यांच्या समवेत बांदल देशमुखाचे निधडया छातीचे सैन्य होते. ९१ कलमी बखरीत म्हटल्याप्रमाणे, प्रहर दीडप्रहर हे युद्ध चालले याचा अर्थ शिवाजीराजे विशालगडावर पोहचेपर्यंत बाजी प्रभू शर्थीने लढत राहिले. त्यांना अनेक जखमा झाल्या. एक घाव मर्मी लागून ते कोसळले. त्याचवेळी गडावर पोहोचल्याची खूण म्हणून शिवाजीराजांनी इशारतीचे आवाज केले. राजे गडावर पोहचले या आनंदात बाजीप्रभूंनी प्राण सोडले.
सिद्दी मसऊद गजापूर खिंड ओलांडून विशालगडावर पोहोचला. परंतु गड अवघड असल्यामुळे आणि मराठयांनी निकराने विरोध केल्याने त्याला हताश होऊन परत जावे लागले. विशालगडाहून नंतर शिवाजीराजांनी राजगडकडे प्रयाण केले या सुमारास मुघालांतर्फे शायिस्तेखान पुण्यात शिवाजीराजांच्याच वाडयात मुक्काम ठोकून बसला होता. त्याचे संकट दूर करणे अत्यंत निकडीचे होते म्हणून सप्टेंबर १६६० मध्ये सिद्दी जौहरशी तह करून पन्हाळा किल्ला शिवाजीराजांनी आदिलशहाच्या हवाली केला.
पन्हाळ्याहून सुटका हे शिवाजीराजांच्या अदभूत साहस, अप्रतिम बुद्धीकौशल्य, विलक्षण पराक्रम, प्रचंड आत्मविश्वास याचे प्रतिक होते. शिवाजीराजांच्या या अदभूत साहसानंतर आदिलशहाची दैना उडाली तर दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजे शायिस्तेखानाला शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्याने फर्माविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा