Translate

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

शिवरायांचे मावळे येसाजी कंक


              येसाजी कंक

येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.

शिवाजीराजें नंतर शंभूराजें सोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.

पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

कोंडाजी फर्जंद

             कोंडाजी फर्जंद

अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.

यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.

फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

शिवरायांचे मावळे दत्ताजी शिंदे

               दत्ताजी शिंदे

गुरुवार १० जानेवारी १७६१ रोजी संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती.    सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले.  बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.

दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"

कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.

रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

शिवरायांचे मावळे बहिर्जी नाईक

             बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ  रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.

बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे  प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त आदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता.

    त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वा‍र्‍याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्या ठिकाणची  खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत. शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये  ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग  परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक  प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.ब‍र्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके.

राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण  शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

शिवरायांचे मावळे कान्होजी आंग्रे

             कान्होजी आंग्रे

सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमारप्रमुख’!

स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्याधूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यु पर्यंत त्यांच्याकडे होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.

कान्होजी आंग्रे पुढे समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखले जाऊ लागले.

कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणीताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता.

कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूरसरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक ! दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

शिवरायांचे मावळे हिरोजी ईंदलकर

           हिरोजी इंदलकर

हिरोजी इंदलकर नावाचे बांधकाम प्रमुख महाराजांकडे होता रायगड सारखा किल्ला बांधण्याची जवाबदारी शिवरायांनी त्यांच्यावर सोपवून महाराज स्वारीवर गेले. हिरोजींनी रायगड निम्या पर्यंत बांधत आणला.आणि पैसा संपला हिरोजीला कळेना काय करावं.  शिवरायानी जवाबदारी तर टाकलीये किल्ला तर बांधला पाहिजे पैसा तर शिल्लक नाही.

ह्या हिरोजींनी अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा आपली सगळी जमीन विकली बायकोला घेऊन रायगडला आला पैशासह झोपडी बांधून राहिला राहू लागले.आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली .

शिवरायांना आल्यावर कळलं हिरोजीने काय केले...? राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजींना वाटलं ह्या हिरोजिंचा सत्कार करावा.राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजी म्हणाले हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात बोला तुम्हाला काय हवयं....?

त्यावेळी हिरोजींनी मान झुकवून म्हणाला महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरांत टाकलाय आम्हाला आणिखी काय हवयं महाराज म्हणाले नाही हिरोजी आहो तुम्ही काही तरी मागितले पाहिजे त्यावेळी हिरोजी म्हणाले महाराज एक विनंती आहे या रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधलय त्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरण्याची अनुमती हवी आहे.

हिरोजी यावर सांगतायत राजे जेव्हा रायगडावर असाल तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल जेव्हा जेव्हा दर्शनाला याल तेव्हा तुमची पाउले त्या पायऱ्यावर पडतील आणि महाराज त्यातल्याच एका पायरीवर जर माझे नाव असेल तर तुमची पायधूळ सतत माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील रे एवढे भाग्य फक्त पदरात टाका कि तुमच्या पाउलांची पायधूळ सतत माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहू देत.

शिवरायांचे मावळे रामजी पांगेरा

             रामजी पांगेरा

रामजी पांगेरा शिवरायांचा पराक्रमी मावळा

१६७२ च्या दरम्यान मुघली सरदार दिलेरखान पुण्याच्या दिशेने निघाला. महाराजांनी मुघलांशी झालेला तह मोडून जी मुसंडी बादशाही मुलुखात मारली होती त्याला शह देण्यासाठी दिलेर पठाणाची ही खेळी होती. वाटेत येईल ते जिंकायचे असा त्याचा बेत होता. खानाकडे प्रचंड सैन्य आणि दारूगोळा होता. दिलेरखानाने वाटेतला कणेरगड घेण्याचे ठरविले, त्याने गडाला वेढा घातला. कणेरगडावर मराठी शिबंदी फारच थोडी होती, पण जे होते ते निर्भीड आणि निधड्या छातीचे वीर होते आणि त्यांचे नेतृत्व करीत होते रामजी पांगेरे.

रामजी पांगेरे यांनी याआधी प्रतापगडच्या युद्धात मर्दुमकी दाखविली होती. रामजी पांगेरे यांना कळले होते की, खान लवकरच गड काबीज करणार. पण त्यांनी ठरविले की गड सहजासहजी खानाला द्यायचा नाही आणि अवघ्या सातशे मावळ्यांना घेऊन एका सकाळी रामजी मोघली फौजेवर तुटून पडले. हत्यारांच्या आणि 'हर हर महादेव' च्या सिंहगर्जनेने अवघा आसमंत दणाणून उठला. पाच-पाच पठाणांना एक-एक मावळा भिडत होता आणि शरीरावर असंख्य वार झेलत होता. त्यादिवशी जणू कणेरगडाच्या पायथ्याशी रुद्र अवतार धारण केलेले अनेक शिवशंकर तांडव करीत होते. मुघल सैन्याला अचंबित करून सोडणारा मराठ्यांचा आवेश होता. या युद्धात बाराशे हून अधिक मुघली सैन्य कापले गेले तर बहुतेक मराठे आपले कार्य सिद्धीस नेऊन धारातीर्थी पडले. कणेरगडाचे किल्लेदार रामजी पांगेरे या युद्धात कामी आले.

त्यांचा युद्धातील आवेश पाहून नक्कीच दिलेर खानाला पुरंदरच्या 'त्या' वीराची आठवण झाली असणार.

शिवरायांचे मावळे जिवबा महाला

        
                जिवबा महाला

जिवबा महाला यांचे संपुर्ण नाव जीवा महाला संकपाळ.महाबळेश्वराच्या पायथ्याशी असलेले कोंडवळी हे त्यांचे गाव होय.जातीने जीवा न्हावी होते.प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी छत्रपती शिवरायांचे ते अंगरक्षक होते.

सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.इतक्यांत सैदबंडा पटाईत धावला.त्यानें राजे जवळ केले.पट्याचे वार राजियावरि चालविले.तो राजियांने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन,पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.पांचवे हाताने राजियास मारावें तो इतकियांत जिऊ महाला याणे फिरंगेनें खांद्यावरि सैदबंडियासि वार केला.तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला.आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरि जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.

यावरून 'होता जिवा,वाचला शिवा' ही उक्ती झाली.पुढे हुकूमाची अवज्ञा केल्याबद्दल छत्रपतींनी जीवा महालास दुर केले.सन १७०९ साली जीवा महाला मरण पावला.

शिवरायांचे मावळे दर्यावीर मायनाक भंडारी

        दर्यावीर मायनाक भंडारी

छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी कोकणातून अमुल्य अशी रत्ने मिळाली. स्वराज्यासाठी जीव देणारी ही मंडळी होती.दौलतखान, इब्राहीमखान, लायजी पाटील, तुकोजी आंग्रे,मायनाक भंडारी आदी दर्यावीर राजेंना कोकणातून मिळाले.

दर्यावीर मायनाक भंडारी हे मराठी आरमाराचे सुभेदार होते.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात छत्रपतींनी मायनाक भंडारीला मुंबईच्या जवळ असलेल्या खांदेरी-उंदेरी बेटांवर धाडून किल्ला बांधण्याचे ठरविले.कारण या किल्ल्यामुळे इंग्रजांना कोकणात हालचाल करणे दुरापास्त होणार होते.त्याकाळी राजेंनी इंग्रजाचा धोका ओळखला होता.मायनाक भंडारी किल्ला बांधत असताना इंग्रजानी त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला.कॅप्टन विल्यम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी आदी नामांकीत सागरी सेनानींना पाठवून खांदेरी-उंदेरीला हल्ला केला.मायनाक भंडारीनी व मावळ्यांनी दिवसा युध्द व रात्री गडाची बांधणी असे दिवसरात्र काम करून मोठ्या पराक्रमाने,चिवटपणे लढून इंग्रजांचा पराभव केला व गडाची उभारणी केली.

सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारल्या गेलेल्या या जलदुर्गामुळे सिद्दी आणि इंग्रज या दोघांचीही कोंडी झाली.सिद्दीला मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखले गेले,तर मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची टांगती तलवार राहिली.दर्यावीर मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात कायमचे अजरामर झाले.

शिवरायांचे मावळे संभाजी कावजी

             संभाजी  कावजी

छत्रपती शिवाजी राजेंचा हा अंगरक्षक होता.संभाजी कावजीने प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी पळून जाणार्‍या अफजलखानाचे शीर कापले होते.अंगाने धिप्पाड व मजबूत असलेल्या कावजीने घोड्यास चार पायावर उचलले होते.हणमंतराव मोर्‍याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालण्याचे निमित्त करून कावजीने त्यास ठार मारिले.अफजलखानाचे भेटीवेळी छत्रपतींनी संभाजी कावजी व जीवा महाला यांना अंगरक्षक म्हणून नेले होते.

सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.'खाण याणी गलबला केला की मारीले मारीले,दगा जाहला,जलदीने धावा असे बोलीले मग भोई याणी जलदीने पालखी आणुन खानास पालखीस घालुन उचलोन चालिले तो इतकियात संभाजी कावजी हुद्देकरी याणे भोयाच्या पायाच्या पट्ट्याने ढोण सिरा तोडुन पालखी भुईस पाडली आणी खानाचे डोचके कापुन हाती घेऊन राजियाजवळ आला.'

पुढे शायिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजीचा मित्र बाबाजी राम हा खानास मिळाला,त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघाडणी केली.ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजी सुध्दा खानास मिळाला.तेथे कावजीने घोड्यास चार पायावर उचलुन आपल्या ताकतीचे प्रदर्शन केले,'जोरावर होता,घोडा चहूं पाई धरून उचलला.'हे त्याचे शौर्य पाहून खानाने त्यास मौजे मलकर या ठाण्यास पाचशे स्वारांसह सलाबतखान दखनी याच्या तैनातीस ठेविले.पुढे प्रतापराव गुजर यांस,छत्रपतींनी त्याजवर पाठवून त्यास इ.स. १६६१ मध्ये ठार मारिले.