....... शंकाग्रस्त बीज .........
जीवनदायी "रक्षणकर्त्यांचा" जर घातच "प्रघात" इथला |
"ईतरांसाठी विशाल होऊ का मी कवटाळून मृत्युला ?" || धृ. ||
क्षितीजाचेही नसते बंधन "शापित" भूमी अथांग एैशी |
"रक्त जळून" छायेवीण जिकडे "सांगाड्यांच्या" अगणित राशी |
अनंत वर्षे "शाप" भोगुनी फुटे पालवी त्या धरणीला | ईतरांसाठी...|| 1||
"करुणामयी" मग रोप ऊगवते "हिमालयाचे धैर्य" अंतरी |
"वार" झेलुनीही सृष्टीचे रोप पसरते "परोपकारी" |
विश्व पाहूनी तडफडणारे रोप घडविते वटवृक्षाला | ईतरांसाठी ...||2||
छाया ह्याची बनते घरकुल जणू श्वास हा प्रत्येकाचा |
मरुभूमीतील तृष्णेसाठी जणू निर्झर हा चैतन्याचा |
कल्पवृक्ष हा आनंदाचा का खुपतो मग त्या दैवाला ? | ईतरांसाठी...||3||
झंझावाती काळी छाया एके दिवशी नभास गिळूनी |
कंपित होती दहादिशाही तिथे दामिनींच्या नृत्यानी |
ढाल बनवूनी तरु 'स्वत:सी' धरतो ह्रद्यी प्रत्येकाला | ईतरांसाठी...||4||
"निर्भय" ऊंच तरु हा पाहून "अहं" ठेंगणा नभी विजेचा |
नखशिखान्त पेटूनी दामिनी प्राण जाळूनी जाते ह्याचा |
बीजही जळते जमिनीमध्ये प्रश्न विचारून हाचा स्वत:ला |
"ईतरांसाठी विशाल होऊ का मी कवटाळून मृत्युला ?" ||5|| -
मकरंद सुधाकर पाटोळे कदम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा