// विकृती अन प्रकृती \\
दोन अंश हे वसुंधरेचे
रूप स्वार्थ अन ऊदारतेचे |
मुळे "सांधता" भुमातेसी
प्रेम कुणाला का "शकलांचे ?" ||धृ.||
"स्तुती सुमनांच्या" हिमवृष्टीहून
वळवा पर्णरूपी हे कर्ण |
मानाचा हा भारच गिळेल तुम्हां
सांगतो जणू सुचिपर्ण |
अहंकार हा कारण मोडून जाईल
नकळत रोप यशाचे | मुळे ...||1||
समाजात ह्या "ऊतरण" तीव्र
बीज रूजवता बंधुत्वाचे |
मुळेच "गुंफुन" समाजास मग
नसेल भय "वाहून जाण्याचे"|
शिखरांवरचे वृक्ष पाजती
जणू अमृत हे अनुभवाचे | मुळे …||2||
आतंकीत करणार्या लाटा
दिसता गिळण्या ह्या देशाला |
निर्भयतेने भिडूनी त्यांना
गिळाच त्यांच्या अस्तित्वाला |
खारफुटीची तळमळ सांगे
जणू वार झेलत लाटांचे | मुळे …||3||
कुणी जळून कोरडे कुणाला
खारट अनुभव रे दु:खाचा |
तुम्ही गोडवा द्या ईतरांना
गिळूनी हुंदका परि अश्रूंचा |
झाड नारळाचे जणू सांगे
ऊन्हात करपून अन खजुराचे |
मुळे …||4||
त्या आशेच्या ओलाव्यावीण
जीर्ण तरूगत वाळून जीवन |
"तुझी प्रतिक्षा रे बहराला"
जणू गुलमोहर सांगे बहरून |
"दूत अरे चटके दु:खाचे
शीतल आशेच्या धारांचे"| मुळे …||5||
संजीवनरस फळातूनी देते
करूणा प्रेमळ झाडांची |
करूणेसव जणू "आशीर्वचने"
अनंत अर्पुन हि बिजांची |
"रूजूनी" कल्पवृक्ष मग त्यातून
अविचल पुतळे जे विनयाचे | मुळे …||6||
कडे "स्मृतींचे" वळूनी
जपूनी ठेवे जणू प्रतिवर्षी ठेवा |
प्रेमळ आठवणी वर्षेच्या
कधी जीर्ण दुष्काळी घावा |
"भविष्य" दावत त्या रेषांतुन
जणू वृक्ष हे गतकाळाचे | मुळे …||6||
कर्ब जाळतो आज ऋतुंना
ऊद्गम ज्याचा स्वार्थामध्ये |
वृक्ष गिळून ते कर्ब हलाहल
पानांतूनी स्वदेहामध्ये |
आमरणान्त जखडून त्याला
पांग फेडतो वसुंधरेचे | मुळे …||7||
गिळूनहि अपुल्या दुष्कर्माला
बळी वृक्ष अपुल्या स्वार्थाला |
कुर्हाड ना वापरता मानव
सोडे जंगलावर आगीला |
"अर्थ" साधुनी "वणव्याआडून"
रचतो ईमले जो "अर्थाचे" |
मुळे सांधता भूमातेसी
प्रेम कुणाला का शकलांचे ? ||8||
- मकरंद सुधाकर पाटोळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा