// नश्वरता \\
सुर्य ऊगवतो अन मावळतो ठेवून साक्षी त्या क्षितीजाला |
कारण दोघे सदैव जाणून समृध्दीतील नश्वरतेला ||धृ.||
रंगमंच हा फुलतो ज्याचा त्या मेघांच्या कलाकृतीतून |
अभ्रांच्या कलशातील सागर कणाकणाला ज्याच्या भिजवून |
समृध्दीच्या डोहि तरीहि "अहंकार" नसतो गगनाला | कारण...||1||
भूमीच्याहि कवेत असतो विशाल रत्नाकर खळखळता |
समृध्दीचा थेंब थेंब तो परी "खार्या कर्जातुन" बुडता |
अशी कोरडी धरणी तरीहि नसे 'दिन' त्या आकाशाला | कारण...||2||
नसते खारेपण डोळ्यातुन "जीवनात" हरवूनी गोडवा |
समृध्दी अंबरात तरीहि भुमीच्या अंतरी गारवा |
कारण "ना कुरवाळे" धरणी अवर्षणाच्या खोल व्रणाला | कारण...||3||
ऋतु वर्षेचा मग अवतरूनी चटक्यांवर त्या शीतल पाखर |
धरणी फुलुनी हिरवाईने गगनातील ऊडतो रत्नाकर |
"रिक्त" होऊनी "विरक्त" नभ जे शुष्कपणा ना जाळे त्याला | कारण...||4||
विशाल हृद्यी आकाशाच्या नसते मत्सर वृत्ती त्रोटक |
भुमी म्हणते रिक्त जरी हे जाणून मी नभ विशाल व्यापक |
"अलिप्त राहून हिंदोळ्यांवर" मिळे "स्थैर्य" नभ अन भुमीला | कारण...||5||
शांती हृद्यातील दोघांच्या श्वास पुरवूनी ऋतुचक्राला |
बरसुन जीवनधारा कोरून साकारत गेल्या सृष्टीला |
आज हि अर्वाचीन पाण्यातुन तेज नवे ह्या वसुंधरेला | कारण...||6||
खळखळते जे विश्वातुन अन धरून श्वास अपुल्या रक्तातुन
मळकट खारेपण सृष्टीतील पिऊनी कसे गोड ते जीवन ?
भूमी अंबर नाहि जखडून ठेवत कारण त्या पाण्याला |
कारण दोघे सदैव जाणून समृध्दीतील नश्वरतेला ||7||
- मकरंद सुधाकर पाटोळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा