Translate

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

वैषम्याची छाया



          वैषम्याची  छाया



 सौंदर्याची किनार असते "सीमा" भीषण अंधकुपाची |


"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ? || धृ. ||




क्षितीजावर रंगांची धुळवड पहाट स्वप्नाला रंगवते |


अस्तित्वावीण "त्याच्या" परि जिकडे हि "तिचीच" होळी जळते |

तिथे स्वयं तेजाला खेटून असते सत्ता अंधाराची || "माध्यम" युगात || 1 ||




 सुर्याच्या तेजाला ईच्छा जरी अंधाराला गिळण्याची |


 प्रखर तेज धरण्या किरणांचे नसुन ओंजळी "त्या" हातांची |


 तेज रवीचे ईथे जाळते दिप्ती नेत्रातील ज्योतींची || "माध्यम" युगात || 2 ||




अंधकुपागत मिजास "येथे" दगडाच्या ईवल्या छायेला |


 पर्वत , गर्दवनांच्या कुशीत अभयदान परी त्या भुमीला |


तेज विखरूनी रवीचे जिकडे "हुळहुळ" "त्याच्या अस्तित्वाची" | "माध्यम" युगात || 3 ||




"जी" तेजाने न्हाऊन निघते तिचे अंग ते तेज पोळते |


 मगरमिठीतील तिमीराच्या भुमीचा "हिमयुग" श्वास कोंडते |


 ईथे ओढ नसते "त्याच्यावीण" विषमतेस ह्या समानतेची ||
 "माध्यम" युगात || 4 ||




"जळून - गोठणे" भुमीची जणू दिनचर्या त्या ऋतुचक्रावीण |


 नंदनवन "ती" आघातांचे त्याच्या मायेच्या "छत्राविण" |


झेलून अनंत आघातांना करी राख "जे" पाषाणांची || "माध्यम" युगात || 5 ||




ईवलीशी मग ऊल्का पाहते तुच्छपणाने ह्या भुमीला |


 "रान मोकळे" पाहून चढते बळ मग ऊल्केतील क्रौर्याला |


अनंत काळे डाग सांगती जणू कहाणी त्या "वारांची" || "माध्यम" युगात || 6 ||




 आघातांना पचवून आशा भुमीला तरी जणू "ऊद्याची" |


 नभी "शांतीचा" रंग भरे जो वाट पहाता त्या दिवसाची |


"रात ढळे ना परि गगनातील" नभात सत्ता जरी सुर्याची || "माध्यम" युगात || 7 ||




 "कर्करोग" झिरपे तेजातुन कुणा जाण का ह्या सत्याची ?


 संवेदनाच नसता येथे गर्दि "शोभेच्या" दगडांची |


कारण "चांद्रभुमी" हि नसते साथ जिला "वातावरणाची" |


"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ?



- मकरंद सुधाकर पाटोळे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा