// रवि \\
"विधायक असते ती शक्ती" सत्य हेच सुर्यातुन दडले |
ह्या तार्यांचे वंशज आपण ज्यातील ऊर्जेला हे कळले ||धृ.||
दूर दूर विस्कटला असता हायड्रोजन ह्या ब्रम्हांडातुन |
"गुरूत्वीय बळ" झाले जागृत नवसृजनाची ओढ चेतवून |
विश्वाकरता बळ वायुच्या "अस्तित्वाला" जमवू लागले | ह्या ...||1||
फुलू लागले हे बळ वायु "एकत्रित" होण्याने अजुनी |
दडली ठिणगी त्या सृजनाची "एकसंधतेमध्ये" ऊमगुनी |
एकसंध करण्या मग त्याला अविरत बळ हे झटत राहिले | ह्या ...||2||
शर्थ प्रयत्नांची अन होळी होऊन कोट्यावधी वर्षांची |
धगधगणार्या वायुमधल्या अणूंस ना ईच्छा जुळण्याची |
"प्रतिकर्षण" विद्युतभाराचे कारण त्यांना रोखत गेले | ह्या ...||3||
किंवा अद्वैताने अपुल्या "ओळख" बदलू नये स्वत:ची |
परस्परांना दूर लोटणे म्हणूनी असे का चाल अणूंची ?
बने कोळसा की हिरा ऊत्तर "अणूसंरचनेतुन" दडले | ह्या ...||4||
अखेर धगधगत्या वायुतील ऊर्जा तो अंगार चेतवून |
"सीमोल्लंघन" वायुचे होऊन एकतेच्याच बळातून |
"परस्परांतुन स्वभाव मिटवू" जेंव्हा परमाणूंस वाटले | ह्या ...||5||
स्वत:स झोकून दिले अणूंनी परस्परांवर ऐक्याकरता |
"अद्वैतातुन"घडले नविन मुलद्रव्य ह्या विश्वाकरता |
"फ्युजन" म्हणूनी ह्या सृजनाला विज्ञानाने आज वंदिले | ह्या ...||6||
हायड्रोजनच्या अणूंपासूनी त्या हिलीयमचे अणू घडूनी |
"वस्तुमान" ह्या नव्या अणूंचे किंचित मग "ऊर्जेत" बदलूनी |
"ईवल्या त्यागातुनी" ह्या अणू "अनंत ऊर्जा" फुलवून गेले | ह्या ...||7||
वायुच्या कोषातुन प्रकटे तारा किरणे गर्भी ज्याच्या |
किरणांचा हा प्रवास तेथुन ऊजळे राशी जो तिमीराच्या |
"माज न यावा पण तार्याला ह्या ऊर्जेचा" बळास कळले | ह्या ...||8||
"गुरूत्व बळ" हसले तार्यातील ऊर्जेशी साधुन "संतुलन" |
"विश्व बांधण्या" कटिबध्दच करूनी तार्याला त्या सृजनातुन |
मुलद्रव्य नवनविन घडवून विश्व प्रकाशित ज्याने केले | ह्या ...||9||
कोट्यावधी वर्षे हा "ध्यास" तेवूनी तार्याच्या गर्भाशी |
लोहतत्व बनले ज्यामधले अणू "न जुळूनी परस्परांशी" |
"अडखळूनी मग सृजनप्रक्रिया" ऊर्जेचे अवसानहि गळले | ह्या ...||10||
"ढासळते" संतुलन म्हणाले मग तार्याला "मिटव स्वत:ला" |
सज्ज जाहला करण्या विलीन मग तारा "स्वत:त अपुल्याला"|
"आहूतीविण सृजन रखडले पुढचे" की तार्याला कळले ? ह्या ...||11||
स्वगर्भातच स्वत:तल्या विश्वासह स्वत:स दिले झोकूनी |
"अस्तित्वच भरडूनी स्वत:चे" महास्फोट घडविला त्यातूनी |
अनंत तार्यातील तेजाला तेज ईथे "हे" दिपवून गेले | ह्या ...||12||
विध्वंसक आघाती लहरी वाटे गिळतील ब्रम्हांडाला |
"सुपरनोव्हा" तो ठरला पण जो कारण "पुढच्या सृजनाला"|
धुळीस तार्याच्या स्फोटाच्या रूपात ह्याने दूर विखुरले | ह्या ...||13||
मुलद्रव्य मग पुढची घडली "महास्फोटाच्या ह्या भट्टीतून" |
जीवसृष्टीला घडवण्यास आवश्यक ती तार्याला ऊमगून |
"विश्वनिर्मिती मृत्युतून माझ्या" जणू हे बलिदान म्हणाले | ह्या ...||14||
तार्यांची हि राखच कारण त्या सृजनाची बीज रूजवून |
तारा घडवून ज्या तत्वांना "त्यातून" त्या मेघांना बनवून |
ज्या मेघांतून नवनविन ग्रह-तारे "त्यांच्या कुशीत" घडले | ह्या ...||15||
ह्याच "निरंतर" प्रक्रियेतूनी सौरमाला अपुली घडली |
सुर्याच्या ऊर्जेने वसुंधरेवर परी जी सृष्टी फुलली |
"तार्यांच्या बलिदानातुन घडलो आपण" का तिने जाणले ? | ह्या ...||16||
"अणू-रेणूतून ह्या सृष्टीतील गुणसुत्रच राखेचे ज्याच्या |
तो तारा मृत मायच अपुली आशा जगवून जी सृजनाच्या |
आईच्या पोकळीस रवीने बहिणीच्या मायेगत भरले |
ह्या तार्यांचे वंशज आपण ज्यातील ऊर्जेला हे कळले"||17||
- मकरंद सुधाकर पाटोळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा